तृतीयपंथींना समाजाचा मुख्य प्रवाहात घेण्याच्या चर्चा खूप होतात, पण त्यावर प्रत्यक्ष कृती होत नाही. पण नवी मुंबईत एक अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. तृतीयपंथींनी सादर केलेल्या पथनाट्यातून नवी मुंबईतील नागरिकांना,ओला आणि सुका कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. नवी मुंबईतील रहिवासी सोसायटी, ट्रॅफिक सिग्नल,गर्दीच्या ठिकाणी जाऊन पथनाट्य सादर करून नागरिकांना आवाहन केले जाते आहे. लेट्स सेलीब्रेट फिटनेस फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रयोग करण्यात येतो आहे.
नवी मुंबई महानगपालिका जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवते. मात्र नागरिकांमध्ये हवी तेवढी जागृती होत नसल्याने आता किन्नरांना स्वच्छतादूत करण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेनशनच्या रीचा यांनी दिली. आपण पहिल्यांदाच असे काम करत असून, खूप समाधान मिळत आहे, अशी प्रतिक्रिया तृतीपंथींनी दिली आहे. "आम्हाला नागरिक गलिच्छ समजतात, मात्र आज आम्ही त्याच नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत असल्याने आम्हाला समाधान मिळत आहे. नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत आमचाही हातभार लागत असल्याने नवी मुंबई पुढील सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर येईल" असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.