गांजाची शेती करावं म्हणलं तर पोलीस पकडतात, टोमॅटो उत्पादक शेतकरी संतापला...
सोलापूर : शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राब-राबून टोमॅटो या पिकाची लागवड केली परंतु त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केट मधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत.
शेतकऱ्यांचे कष्ठ वाया...
टोमॅटोची लागवड करीत असताना शेतकऱ्यांना त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी लागते. त्यानंतर योग्य अंतरावर रोपांची लागवड केली जाते. रोप वाढत असताना काही महिन्यात त्याचा वेल तयार होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना या टोमॅटोची बांधणी करावी लागते. त्यासाठी बांबू व तारांचा वापर केला जातो. या तारांच्या सहाय्याने टोमॅटोची रोपे वाढू लागतात. याची वाढ होत असताना त्याला टोमॅटोचे फळ येऊ लागते. हे टोमॅटोचे फळ लाल झाल्यानंतर त्याची बाजारात विक्री करण्यासाठी तोडणी केली जाते. टोमॅटोची लागवड ते काढणी या दरम्यान शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च येतो.
टोमॅटोचे दर कोसळले...
बाजारात टोमॅटोची विक्री प्रति किलो ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.पंढरपूर येथील बाजार समितीच्या लिलावात १५ रुपयाला तीन टोमॅटोची कॅरेट विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. टोमॅटोची अगदी कमी दरात विक्री होत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन टोमॅटोची लागवड केली होती त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शेतातून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना मालवाहू टेम्पोच्या भाड्या एवढे ही पैसे शेतकऱ्यांना मिळेना गेले आहेत. टोमॅटो तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जगावे की मरावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे बाजारपेठ बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊन ने शेतकरी अडचणीत आले असताना टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सुकून गायकवाड या शेतकऱ्याने बातचीत करताना सांगितले की, मोहोळ-बार्शी रोडला माझी शेती असून एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी मला सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. बाजारात टोमॅटोची ३ ते ४ रुपये दराने विक्री होत असल्याने ती जागेवर नासुन चालली आहेत. आमच्याकडे टोमॅटो तोडणाऱ्या मजुरांना पैसे देण्यासाठी नाहीत. काय करावं शेतकऱ्याने? असा सवाल चेहऱ्यावर सुरकत्या पडलेले सुकून गायकवाड सांगतात.
घरची लहान मुले व महिलांना घेऊन टोमॅटोची तोडणी करीत आहे. रात्र-दिवस शेतात कष्ट करूनही शेतकऱ्यांना फळ मिळत नाही. शेतकऱ्यांना वालीच उरला नाही. व्यापाऱ्यांच्या एका कॅरेटला १० रुपये भाडे आहे. आम्ही शेतात केलेले कष्ट वायफळ मातीत चालले आहे. लाख-सव्वा लाख रुपये मातीत गेले आहेत. नुसता भाव आला-आला म्हणतात पण ऊस, केळी, द्राक्ष याही पिकात तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे कोणते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांजाची शेती करावे म्हटले तर पोलीस लगेच पकडायला येतात. ते त्यांना परवडते.
शेतकऱ्यांनी आता काय करावे असा प्रश्न उपस्थित करून शेवटी इलाज नाही. शेती सोडून द्यायची पाळी आली आहे. सर्व भारत शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. माझे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांनी ही लक्ष द्यावे. भारताचा शेतकरी जर मेला तर ही लोक अन्न-अन्न करून मरतील.
सरकारने व्यापाऱ्यावर सुध्दा बंधने आणली पाहिजेत. आमच्याकडून ३ ते ५ रुपये दराने टोमॅटो खरेदी करून तिकडे दिल्ली येथे माल नेहून व्यापारी प्रति किलो ४० रुपये दराने विकतात. शेतकऱ्याला काय परवडतं? टोमॅटोला कमी भाव मिळाला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो नदीत फेकून दिली आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्याकडेला फेकून दिली आहेत. याची नुकसानभरपाई कोण देणार. एकरा-एकरचा टोमॅटोचा फलाट आहे. सरकार नुसते नुकसान भरपाई देतो म्हणते परंतु एक रुपया सुध्दा देत नाही. असं शेतकरी सांगतात.
शेतकऱ्याच्या मळ्यात टोमॅटो तोडण्यासाठी आलेल्या मजुराला 200 ते 250 रुपये रोज द्यावा लागतो. दिवसाला पाच मजूर जरी कामाला असतील तर 1000 ते 1200 रुपये लागतात. तसंच कॅरेटला पण भाडं शेतकऱ्यालाच द्यावं लागतं.
सध्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं शेतकऱ्याची मालवाहतूक वाढली आहे. अशा परिस्थिती पुर्वी बाजारात जाण्यासाठी 500 रुपये लागत होते. तिथं आता हजार रुपये द्यावे लागतात. दिवसाला 2 हजार रुपये खर्च करुन टोमॅटो विकण्यासाठी नेले असता, कॅरेटला 15 रुपये भाव मिळतो. त्यातून गड्याला किती द्यायचे? भाडं किती द्यायचं? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो.
त्यातच दुकानदाराकडून बी बियाणं उधारीवर आणलेले असेल तर शेतकऱ्याने ते कशाच्या जीवावर परत करायचे? आणि घरादारातील सगळ्या लोकांनी काय खायचे? असा सवाल आता या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
व्यापाऱ्यांना भाव पडण्याचं कारण विचारलं असता, ते आवक वाढली असल्याचं सांगत आहे. वारंवार होणारं लॉकडाऊन त्यामुळं टोमॅटो कोणी खरेदी करत नाही. कारण टोमॅटो लवकर खराब होतो. या काळात जास्त पैसा कोणीही गुंतवणूक करत नाहीत. सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढला की लगेच लॉकडाऊन लागतं. व्यापारी देखील शेतकऱ्यांप्रमाणे अडचणीत आहे. त्यामुळे कोणीही रिस्क घेऊन बाहेर माल पाठवत नाही. त्यामुळं बाजारात माल खरेदी केला जात नाही.