मुंबईतील गाव शौचासाठी उघड्यावर जातं राव
मुंबईतील एका गावात अजून महापालिकेचं पाणी पोहचलंच नाही. काय आहे मायानगरीतील गावाचं डोळ्यात अंजन घालणारं भीषण वास्तव? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा जनतेचा जाहीरनामा...
मुंबईतील लोक उघड्यावर शौचासाठी जातात, असं कुणी म्हणालं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण याच झगमगाटी मुंबईत चारकोप भागातील महावीर नगर झोपडपट्टीत नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागातील नागरिकांना शौचासाठी उघड्यावर जावं लागत आहे. हे भीषण वास्तव मॅक्स महाराष्ट्रने समोर आणले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मुंबईतील चारकोप येथील महावीर नगर झोपडपट्टीत अजूनही मुंबई महापालिकेचे पाणी पोहचलेले नाही. त्यामुळे नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागत आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला चारशे रुपयांचा भर्दंड नागरिकांना बसतो.
या भागात महापालिकेचे शौचालय नाहीत. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर जंगलात शौचास जावे लागते. त्यामुळे रात्री-अपरात्री शौचास जातांना साप, विंचू यांच्या भीतीच्या छायेत वावरावं लागतं. तसंच आम्हाला बाकी काही नको फक्त पाणी आणि शौचालयाची सोय करा, असं मत या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या भागात शुभदा गाडेकर या नगरसेविका आहेत. मात्र त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची आणि महापालिकेच्या शौचालयाची वारंवार मागणी केल्यानंतरही आमच्या पदरी निराशाच येते, अशी माहिती यावेळी महिलांनी दिली.त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असताना या नागरिकांच्या व्यथेची दखल घेतली जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.