खालापूर - (२८ जुलै) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाळवाडीच्या दुर्घटनेला आज दहा दिवस झाले आहे. बेघर झाल्यानंतर जे एम. म्हात्रे यांच्या चॅरिटेबल संस्थेच्या पंचायतन मंदिरात पहिले काही दिवस आदिवासी बांधवांना निवारा देण्यात आला होता. त्यानंतर चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कॉलनीमध्ये सर्वांना आणले गेले. त्या कॉलनीची उभारणी करताना रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन, पीडब्ल्यूडी विभाग, पोलीस प्रशासन, आणि इतर सरकारी यंत्रणांनी अनेक सामाजिक संस्थाना सोबत घेऊन सोयी आणि सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. आज नव्हे तर अद्याप पर्यंत त्या कॉलनीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी बांधव दुःखातून सावरून हळू हळू सावरत आहेत.
आज दहावा दिवस, त्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांचा दहावा विधी परंपरेप्रमाणे सार्वजनिक रित्या करण्याच्या उद्देशाने सर्व तयारी सुरू आहे. हार - फुले आणि विधी पूजेच्या सामानापासून मृत व्यक्तींचे फोटो फ्रेम, विधीसाठी जंगम व्यवस्था करण्यात प्रशासनाची अक्षरशः धावपळ सुरू आहे. मुंडण करण्यासाठी नाभिक समाजाची मदत, वाहतुकीसाठी वाहनं, विधी नंतर भोजन इत्यादी व्यवस्था करतांना आपल्याच नात्यातल्या कोणाचा विधी असल्या प्रमाणे प्रशासनातले सर्वजण रात्रंदिवस झटत आहे.
दिवसा मागून दिवस जातील, कदाचित काळाच्या आड सगळं विस्मृतीत निघून जाईल मात्र ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांच्या मनपटलावरून ते विदारक क्षण कधीच पुसले जाणार नाहीत.