water issue : त्यांना ढुंगण धुवायला फिल्टरचं पाणी मिळतं, पण आम्हाला प्यायला पाणी नाही
त्यांना ढुंगण धुवायला फिल्टरच पाणी मिळतं. पण आम्हा आदिवासींना प्यायला पाणी मिळत नाही. आम्ही आदिवासी माणसं आहोत का जनावरं ? असा संतप्त आणि चीड आणणारा सवाल उपस्थित केलाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी गावातील नागरिकांनी. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट पाहिल्यावर आपल्याला चीड आल्याशिवाय राहणार नाही…;
“लोकांना ढुंगण धुवायला फिल्टरचे पाणी मिळतं, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही. ती माणसं आहेत मग आम्ही माणसं नाहीत का? आम्ही आदिवासी जनावरं आहोत का? तुम्ही तरी हे घाणीचे पाणी प्याल का? तुमच्या सारखे लोक आमच्या वाडीत आले तर आम्ही तुम्हाला प्यायला हे घाण पाणी कसं देणार”? हा प्रश्न विचारलाय रायगड जिल्ह्यातील आय.एस. ओ. मानांकन प्राप्त दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या खैरासवाडी या आदिवासी गावातील रंजना वाघमारे यांनी. येथील नागरीकांची पाचवी पिढी आज पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करत आहे. मोलमजुरी करणे, लाकूडफाटा गोळा करणे हे या आदिवासी वाडीतील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. पण गावातील स्त्रियांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो. मग मजुरी करायची कधी? लाकूडफाटा गोळा करायचा कधी? आणि मुलाबाळांना खाऊ घालायचे काय? याची चिंता त्यांना दररोजच सतावत असते.
नैसर्गिक झऱ्यातून पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेऊन जाणारी एक आदिवासी महिला आम्हाला या रस्त्यातच भेटली. पाण्याबाबत विचारताच संतापून त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती वाचा त्यांच्याच शब्दात “त्यांना गां* धुवायले नळाचा पाणी, कपडा धुवायला पाणी, वापरायला पाणी आणि आम्हाला पेवायला ह्यो खड्ड्यातला पाणी. या आदिवासीला तुम्ही नळाचा पाणी द्या, टँकर बिंकर आम्हाला काही नको. आम्हाला गावातच पाणी द्या. या पाण्यातच आमची जिंदगी गेली. आता मुली बाळीवर देखील तीच वेळ आली आहे. दिवसभर पाणी भरून आम्ही पोट कशी भरायची”? असा सवाल यावेळी महिलेने विचारला.
खैरासवाडी या गावातील आदिवासींचा हा संघर्ष आजचाच नाही. त्यांच्या पाच पिढ्या पाणी मागून मागून या मातीत गेल्या. पण त्यांना अद्यापही पाणी मिळाले नाही. विशेष म्हणजे हे गाव ज्या दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतीत येते त्या ग्रामपंचायतीला आय. एस. ओ. मानांकन देण्यात आले आहे.
निवडणुका आल्या की या गावातील नागरिकांना वर्षानुवर्षापासून पाणी देण्याचे आश्वासन मिळते. पण निवडणुकीतील जाहीरनाम्याच्या कागदावरून हे आश्वासन पाणी होऊन या गावात मात्र पोहचतच नाही. रायगड जिल्ह्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा मोठा गाजावाजा झाला. या निधीबाबत अनेकांनी आपली पाठ देखील थोपटून घेतली. पण कोसो दूर अंतरावरून पाणी भरून कुणा आदिवासी महिलेची कंबर मोडलीय तर कुणाला मानेचा त्रास सुरु झाला आहे. अशुद्ध पाणी पिऊन गावात आजारांनी घर केले आहे. रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी गावात साधी वाहतुकीची देखील सोय नाही.
वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या या समस्यांची शरम ना लोकप्रतिनिधींना वाटते ना प्रशासनाला. या परिस्थितीत या गावातील आदिवासी नागरिक सरकारला एकच सवाल करत आहेत. तुम्ही आदिवासीना माणूस समजता की जनावर? या प्रश्नाचे उत्तर या भागातील लोकप्रतिनिधींना तसेच गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला द्यावेच लागेल.