शरद पवार यांच्या वक्तव्याचा काहीही परिणाम होणार नाही: राजदीप सरदेसाई

Update: 2021-09-10 12:21 GMT
शरद पवार यांच्या वक्तव्याचा काहीही परिणाम होणार नाही: राजदीप सरदेसाई
  • whatsapp icon

राजदीप सरदेसाई यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीने देशात चर्चेचं वातावरण आहे. अशा परिस्थिती शरद पवार यांच्या वक्तव्याचा देशातील राजकारणावर काही परिणाम होईल का? या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचं नक्की काय मत आहे... नक्की वाचा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसवर टीका केल्यानं आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्षाची तुलना उत्तर प्रदेशमधील जमीनदाराशी केली आहे. जो स्वत:च्या हवेलीचे (वाड्याचे) व्यवस्थापन करू शकत नाहीत. कॉंग्रेस पक्ष असा जमीनदार आहे. जो भूतकाळाच्या वैभवात विचलित असतो. Congress is like old landlords reminiscing about past glory)



पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सत्याला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. ते इंडिया टुडे ग्रुपच्या मराठी डिजीटल प्लॅटफॉर्म 'मुंबई तक' ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राजदीप सरदेसाई Rajdeep Sardesai आणि साहिल जोशी Sahil Joshi यांनी ही मुलाखत घेतली.

पवारांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पवार यांनी नक्की काय म्हटलंय?



'मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.'

विरोधी पक्षाचा चेहरा कोण?

मोदी विरोधात आघाडीचा चेहरा कोण असेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, ते म्हणाले...

विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतातकाँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.'

असं म्हणत पवार यांनी विरोधी पक्षाच्या चेहऱ्याबाबत गुगली टाकली. पवारांच्या या गुगलीने आता वातावरण तापलं आहे. पवारांच्या या विधानाने राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. (Nana patole On sharad Pawar)



काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलं आहे.

अशा शब्दात नाना पटोले यांनी पवार यांना उत्तर दिलं आहे.

दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis on Sharad Pawar)



"काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय".

अशा शब्दात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

दरम्यान एकीकडे पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना देशातील विरोधकांची मोठ बांधणाऱ्या शरद पवार यांचं हे वक्तव्य विरोधी पक्षांच्या आघाडीत बिघाडी करेल का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. या संदर्भात आम्ही काही राजकीय विश्लेषकांशी बातचीत केली.

दरम्यान ही मुलाखत घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी आम्ही बातचीत केली.



ते म्हणाले शरद पवार यांच्या या वक्तव्याचा काही परिणाम होणार नाही. ते कॉंग्रेसला सल्ला देत आहेत. कॉंग्रेसवर टीका करत नाहीत. कॉंग्रेसचा Mind set बदलावा म्हणून ते सांगत आहे. या वक्तव्याचा राष्ट्रीय परिणाम होणार नाही. ही खूप लिमिटेड गोष्ट आहे. त्यामुळं कुठलाही परिणाम होणार नाही.

असं मत राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात...



पवारांनी आज जे वक्तव्य केलं आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य त्यांनी यापुर्वी देखील केलं होतं. यात विशेष असं काही नाही. पवार यांनी जेव्हा काही पक्षांतील नेत्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये देखील त्यांनी कॉंग्रेस शिवाय विरोधी पक्षांची आघाडी होऊ शकत नाही. असं मत व्यक्त केलं होतं. राहुल गांधी यांनी त्यांच्या राजकारणात सातत्य ठेवायला हवं. मला वाटतं पवारांच्या सल्ल्यामध्ये गैर असं काही नाही. कॉंग्रेस च्या अनेक नेत्यांना देखील हे मान्य आहे. पवार यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होईल. असं मला वाटत नाही. तसंच केंद्रातील आघाडीवर देखील कोणताही परिणाम होणार नाही. असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात झी 24 तासचे संपादक निलेश खरे सांगतात...



कॉंग्रेस सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करत आली आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष हाच आपला खरा राजकीय शत्रू असल्याचंही कॉंग्रेस च्या राज्यातील नेत्यांनी बोलून दाखवले आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून शरद पवार यांच्या वक्त्यव्याकडे आपण पाहू शकतो. काही प्रमाणात पवार यांच्या या वक्तव्याचा दोनही पक्षावर परिणाम होऊ शकतो. असं मत झी 24 तास चे संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केलं आहे.

दिल्लीत शरद पवार यांच्या वक्तव्याचे नक्की काय पडसाद पडतील या संदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले...



दिल्लीमध्येच काय राज्याच्या राजकारणात कुठलाही आणि काहीही परिणाम होणार नाही. शरद पवार यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य या अगोदर देखील केले आहेत. मात्र, जे शरद पवार कॉंग्रेसला उत्तर प्रदेशचा जहागिरदार आहे. म्हणतात. तेच पवार या जहागिरदाराचे मुनिम आहे. गेली अनेक वर्ष पवार याच मुनिमासोबत काम करत आलं आहे. शरद पवार नेहमी बोलतात एक आणि करतात एक. ज्या राजदीप सरदेसाई यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्याच राजदीप यांनी शरद पवार युपीएचे अध्यक्ष होतील. असं ट्वीट केलं होतं. राजदीप यांना हे ट्वीट कोणी करायला सांगितलं होतं का? हे पाहायला हवं. राजकारणात कमी जास्त होतं असते.

भाजप 2 वरून 300 च्या वर गेली. पार्ट्या येतात जातात. शेकाप, डावे यासारखे मोठ्या पक्षाचं काय झालं हे आपण पाहिलं आहे. शरद पवार यांना जर कॉंग्रेस जहागिरदार पक्ष वाटतो तर त्यांनी कॉंग्रेस शिवाय थर्ड फ्रंट उभं करायला हवं. मात्र, शरद पवार यांचं ATM बंद आहे. कारण महाराष्ट्र सोडता पवार यांचा पक्ष इतर राज्यात नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेसला महाराष्ट्रातील सरकार गेल्याने फारसा फरक पडणार नाही. मात्र,पवारांना फरक पडेल. त्यामुळं पवार यांच्या वक्तव्याचा फारसा परिणाम होणार नाही. किंबहुना अजिबात परिणाम होणार नाही. असं मत अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरीत सर्व राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतल्यानंतर पवार यांच्या वक्तव्याचा राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News