'रोहयो' मध्ये बोगस कामं? तक्रार दाखल होताच फाईल्स गायब !

सरकारी कार्यालयातील फाईल्सना पाय फुटतात हे आपण ऐकले आहे...पण बीड जिल्ह्यात सरकारी कार्यालयातील फक्त जुन्या फाईल्सची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. आता चोरांनी सर्व काही सोडून केवळ या जुन्या फाईल्स का चोरी केल्या आहेत, याची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत....आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट....;

Update: 2022-07-09 10:13 GMT

बीड शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत तयार होताच पंचायत समितीचे जुने कार्यालय या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. पण जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमधील महत्त्वाची कागदपत्रे मात्र नवीन इमारतीमध्ये आणण्याचा मुहूर्तच अधिकाऱ्यांना तीन महिन्यात मिळाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जुन्या कार्यालयातील रोजगार हमी योजनेशी संबंधित महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. पण ही चोरी आताच कशी झाली, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.




 


जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे कागदोपत्री करून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतो आहे. या योजने अंतर्गत झालेल्या कामांचे ऑडिट होणार असल्याची चर्चा सुरू होताच या कामाशी संबंधित फाईल्सची चोरी झाल्याने यामागे काही तरी कारस्थान असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केला आहे.




 

बीड पंचायत समिती अंतर्गत गेल्या दोन वर्षांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामं झाली. या कामांच्या सर्व फाईल्स जुन्या इमारतींमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. पण आता फाईल्सची चोरी झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तसेच अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण घोटाळ्याचा आरोप मात्र अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.




 

बीड पंचायत समितीच्या कार्यालयातून फाईल चोरीला गेल्यामुळे रोजगार हमी योजनेतील कामातील भ्रष्टाचार आणि त्या संदर्भातील चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या चोरीचा तपास करतील, मात्र नोकरशाहीमधील बेजबाबदारपणा, त्यामुळे शासकीय निधीचा होणारा अपहार आणि नष्ट केले जाणारे पुरावे याबद्दल ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Full View

Tags:    

Similar News