लॉकडाऊनमध्येही सुरू असलेली जिल्हा परिषद समडोळीची शाळा…
लॉकडाऊनमध्ये शाळा. जरा आश्चर्य वाटतंय ना? मात्र, हे खरं आहे. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशातील शाळा बंद असताना देशातील एकमेव शाळा सुरु होती... कशी सुरु होती ही शाळा? कोरोना विरोधात त्यांनी नक्की काय उपाययोजना केल्या. हाच पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त होऊ शकतो का? वाचा जिल्हापरिषद समडोळीची शाळेची गोष्ट
डोक्यात घट्ट बांधलेल्या दोन वेण्या आणि त्यात रीबिन गुंफून वरती काढलेले टुमदार गुलाबी फुल, अंगावर निळा पांढरा युनिफॉर्म आणि पाठीवर दफ्तर. शाळा भरण्याअगोदर निळ्या पांढऱ्या कपड्यातील विद्यार्थ्यांचे हे थवेच्या थवे रस्ता भरून दिसायचे. सकाळची घंटा, त्यानंतर प्रार्थना मग सुरू व्हायचा विद्यार्थ्यांचा दिनक्रम. गेल्या अनेक वर्षापासून ही शैक्षणिक परंपरा अखंडित चालत आली होती.
भारतात लॉक डाऊन सुरू झाला आणि या परंपरेमध्ये खंड पडला. शाळांचे दरवाजे बंद झाले. शाळेची घंटा वाजायची बंद झाली. शाळेच्या आवारातील प्रार्थना बंद झाली. शिकवणी ऑनलाईन सुरू झाली.
जिल्हा परिषद प्रा. शाळा नं. २ समडोळी या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातयेणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे हे शाळा बंद असल्याने ऑनलाईन लेक्चर घेत होते. एकूण १०२ विद्यार्थी असलेल्या या शाळेतील केवळ २७ विद्यार्थी ऑनलाइन क्लास ला उपस्थित होते.
शिक्षण न घेणाऱ्या उर्वरित ७५ विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?
हा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला. यातील अनेक कुटुंबांमध्ये मोबाईल ची सोय नव्हती. घरात शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठी टी व्ही देखील नव्हता. विद्यार्थ्यांच्या या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीवर शिक्षक म्हणून ते अस्वस्थ झाले. याच अस्वस्थतेतून जन्मास आला 'घरीच राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरवू' हा भारतातील एक पथदर्शी शैक्षणिक उपक्रम.
कृष्णात पाटोळे यांच्या डोक्यात आकार घेतलेल्या या उपक्रमास त्यांनी कागदावर उतरवले.
त्यांनी आपली ही कल्पना शिक्षकांच्या कानावर घातली. त्यानुसार शिक्षिका प्रतीक्षा देवळेकर, दिपाली मगदूम, संतोष गुरव यांना ही कल्पना आवडली. या सर्व टीमने हा उपक्रम तडीस नेण्याचा निश्चय केला. असा होता प्रकल्प घरातील शाळेचे वेळापत्रक शिक्षकांच्या टीमने तयार करणे.
वेळापत्रकातील विषयानुसार शिकविणाऱ्या पालकांना प्रशिक्षण देणे. एका घरात एकाच इयत्तेतील चार विद्यार्थ्यांची शाळा सुरू करणे.
या घरातील एका शिक्षित पालकाची गट समन्वयक म्हणून नेमणूक करणे आणि विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे.
ज्या विद्यार्थिनीच्या घरात शाळा भरत आहे तिची गटप्रमुख म्हणून नेमणूक करणे. शाळेतील शैक्षणिक साहित्य, पुस्तके या घरातील शाळेस उपलब्ध करून देणे.
घरातील शाळेत घंटा, शैक्षणिक साहित्य, पताका पोस्टर्स लाऊन शाळेचे वातावरण तयार करणे. शिक्षकांनी या उपक्रमाचे वेळोवेळी monitoring करणे.
सदर प्रकल्पाची केंद्रप्रमुख आणि इतर शाळेतील शिक्षकांकडून तठस्थपणे तपासणी करणे. पालकांना मार्गदर्शन करून प्रश्नपत्रिका काढायला लावणे. परीक्षा घेऊन उत्तरपत्रिकांची पालकांकडून तपासणी करणे.
घरातील शाळेत सांस्कृतीक उपक्रम खेळ लेखकांच्या भेटी जयंती पुण्यतिथी हे कार्यक्रम घेणे. कागदावर असलेला हा उपक्रम प्रत्यक्षात उतरविण्यासाठी यामध्ये पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा होता. त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रकल्प पुढे जाणेच शक्य नव्हते. यासाठी शिक्षक पालक बैठक आयोजित करण्यात आली. कोरोनाचे वातावरण असल्याने अनेक पालकांनी याला विरोध केला. परंतु कालांतराने विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात आल्यावर एकाएकाने याला प्रतिसाद द्यायला सुरवात केली.
याबाबत पालक सुमया मुजावर सांगतात...
मला पहिल्यांदा यामध्ये मुलांची काळजी वाटली. त्यामुळे या घरातील शाळेसाठी मी माझ्या मुली पाठविण्यास नकार दिला. परंतु घरी त्या अभ्यास करत नव्हत्या. त्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून मी स्वतःहुन या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. आज मी अभिमानाने सांगते की, माझ्या मुलांनी गेले शैक्षणिक वर्ष अभ्यास करून पूर्ण केले.
समडोळी गावातील वीस घरांमध्ये ही शाळा सुरू झाली. ही शाळा म्हणजे घरातील एक खोली. जिच्या भिंतींवर पाढे, शब्द तसेच इतर शैक्षणिक साहित्य चिकटलेले आहे. या शाळेत घंटा देखील बसविलेली आहे.
सकाळी १० वाजता शाळा सुरू होते व दुपारी १.४५ मिनिटांनी सुटते. या दरम्यान परीपाठ, हजेरी, सकाळी टी व्ही वरील टीलीमीली हा शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, वाचन, लेखन, अभ्यास यांसह इतर अनुभवावर आधारित शिक्षण देखील देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आवडीने या सर्व विषयांचे अध्ययन केले.
याबाबत शिक्षिका प्रतीक्षा देवळेकर सांगतात
"आमची शाळा बंद होती पण आम्ही मुलांच्या घरीच शाळा नेली. या शाळेमध्ये मुलांचा शैक्षणिक अभ्यासक्रम तर पूर्ण केलाच पण शाला बाह्य उपक्रम देखील मुलांकडून करून घेतले. गावातील दहा घरात असलेल्या शाळांमध्ये कलादर्पण हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. शाळेच्या बाहेर असणारा जनावरांचा गोठा, फळांची, पिकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आज आम्ही अभिमानाने सांगतो की, आमच्या मुलांच्या शाळेतील सर्व अभ्यासक्रम पूर्ण होऊन मुले पुढच्या वर्गात गेली.
याच शाळेतील शिक्षक असलेल्या संतोष गुरव यांना अगोदर या उपक्रमाविषयी साशंकता होती. परंतु पालक आणि मुलांचा प्रतिसाद पाहून त्यांना देखील हुरूप आला. ते सांगतात आम्ही वेळापत्रकात शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ, गाणी, कथा, कविता हे उपक्रम घेतले.
ज्यांच्या घरात यातील एक शाळा भरते. त्या चांगदेव कांबळेना स्वप्नात देखील वाटले नव्हते की, गावात असलेली शाळा चक्क आपल्या घरात भरेल. त्यांचं घर अगोदर अतिशय साधे होते. या उपक्रमात विद्यार्थी येऊ लागले. यासाठी त्यांनी घराच रूपच पालटवलं.
आज सकाळी प्रार्थनेपासून सर्व शालेय दिनक्रम त्यांच्या घरातील शाळेत होतो. पाहुणे आणि इतर मित्रांमुळे शाळा डिस्टर्ब होऊ नये. म्हणून पाहुण्यांनी फोन करूनच घरी यावे. असा बोर्ड त्यांनी घरातील दरवाजावर लावला आहे.
यामध्ये त्यांची मुलगी सुर्यानी कांबळे गटप्रमुख म्हणून उत्साहाने काम करते. पहिल्यांदाच प्रवेश घेतलेल्या पहीलीतील मुलांनी पहिल्यांदा घरातील शाळेतच पाऊल ठेवले. या काळात पहिली या वर्गात २७ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. मुख्य शाळेत त्या एकदाही गेल्या नाहीत. घरातील शाळेतच यातील पंचवीस मुली खडखडीत वाचायला तसेच लिहायला शिकल्या.
मॅक्स महाराष्ट्र टीमसमोरच यातील विद्यार्थिनींनी वाचन लेखन करून दाखवले. याच बरोबर नव्याने देखील विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेले आहेत.
या शाळेमध्ये लेखक आपल्या घरी असा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये साहित्यिक नामदेव माळी भुपाळ ते भैरवी या कार्यक्रमाचे निर्माते संपत कदम यांच्याकडून या शाळांना भेटी देण्यात आल्या.
गावात सुरू असलेल्या या शाळांचे मूल्यमापन केंद्रप्रमुख तसेच इतर शाळेतील शिक्षकांकडून करण्यात आले.
घरातील शाळेत झाल्या भयमुक्त परीक्षा...
परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. ही भीती दूर करण्यासाठी घरातील परीक्षा केंद्र फुग्यांनी सजविण्यात आले होते. सॉफ्ट संगीताच्या आवाजात विद्यार्थी परीक्षाना सामोरे गेले.
विशेष म्हणजे शिक्षकांच्या मार्गदर्शनात पालकांनी प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. त्यांचे मूल्यमापन देखील पालकांनी केले.
मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांनी पाहिलेले घरातील शाळेचे स्वप्न आज पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल त्यांच्यासह त्यांच्या सर्व स्टाफचे या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख असलेल्या सुनीता वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी या पथदर्शी प्रकल्पाचे कौतुक करत वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलेले आहे. या कामात गट शिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर विस्तार अधिकारी गणेश भांबुरे तसेच या गावचे सरपंच विलास अडसूळ यांनी महत्त्वाची साथ दिली आहे.
समडोळी गावातील या शिक्षक तसेच पालकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने त्यांनी कोरोनाच्या शैक्षणिक दुष्परिणामांवर मात केली आहे. ज्या ज्या घरात ही शाळा सुरू आहे त्या घरांमध्ये या विद्यार्थिनींनी कोरोनाची इतकी जनजागृती केली आहे की, यातील एकाही घरात रुग्ण नाही. हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.