उन्हाने नागली करपली, आदिवासींनी जगावे कसे ?
आदिवासी नागलीला देव मानतात. या पिकावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. पावसाने दडी मारल्याने नागलीचे पीक करपून गेले आहे. त्यामुळे आदिवासींवर मोठे संकट कोसळले आहे. आदिवासींच्या या समस्योबतच नागली पिकाचे महत्त्व स्पष्ट करणारा रवींद्र साळवे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट नक्की वाचा…;
पालघर : मुंबई राजधानी पासून शंभर किमी अंतरावर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका आहे. येथील आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष पारंपारिक पद्धतीने शेतीतून उपजीविका करतो. या परिसरात प्रामुख्याने नागली वरई भात व अन्य पिके घेतली जातात. ही शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. पाऊस असेल तरच उत्पादन मिळते. मागील दहा ते पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने येथील नागली पिक संकटात सापडले असुन कडक उन्हाने अक्षरश: रोवणी केलेल्या नागलीचा पेंडा झाला आहे. त्यामुळे जगायचं कसं ? खायचं काय ? उदरनिर्वाह कसा करायचा ? असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे.
मोखाडा तालुक्यापासून २५ किमी अंतरावर वसलेल्या आसे ग्रामपंचायत मधील भोवाडी येथील नागलीची शेती करणाऱ्या २५ ते ३० शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भोवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी शांताराम बुध्या दिघा यांचा चार लहान मुले पत्नी असा परिवार शेतीवर अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने नागली पीक पूर्णपणे करपून गेलं आहे, पुन्हा नंतर पाऊस पडला तरी पीक येणार नाही आता जगायचं कसं असा सवाल त्यांना पडला आहे. सरकारने नुकसान भरपाई देऊन आम्हाला आधार द्यावा अशी मागणी ते मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना करतात.
चांगल्या आरोग्यासाठी भाज्या आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणे ही तितकेच गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवत असते. अशा या धान्यापैकी नाचणी हे एक धान्य होय ग्रामीण भागात नाचणी या धान्यालाच नागली किंवा रागी असेही म्हणतात तर याच नागली पिकांचे ग्रामीण भागात कणसरी च्या रुपाने पुजन सुध्दा केले जाते. नागली ची लावणी अंतिम टप्प्यात आलेली असताना वरुणराजा रुसल्याने अनेक शेतकरी नागली लावण्यापासून मुकले आहेत तर काही शेतकऱ्यांनी घाई घाईत लागवड केलेली नागली ची रोपे कडक उन्हाने वाळून गेली आहेत.
यामुळे प्रशासन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे.
९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात भात पिकांसह नाचणी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चवीला मधूर, तुरट व कडवट असलेल्या नागली मध्ये अ, ब१, जीवनसत्व आणि निकोटिनिक आम्ल असतात या नागली धान्यांचे दोन प्रकार असुन एक लालसर रंगाची नाचणी व दुसरी शितोळी ( सफेद ) रंगाची नाचणी या पिकांची रोप तयार करण्यासाठी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा, गवत एकत्र केले जाते व सुकलेल्या शेणखतावर पसरवून पेटवून दिले जाते अशा तयार केलेल्या रोपांवर पावसाळ्यात नाचणी पिकांच्या बियांची पेरणी केली जाते व पावसाळ्यात काळ्याभोर जमीनीची नांगराच्या साहाय्याने मशागत करून नागलीच्या रोपांची लागवड केली जाते.परंतू वर्षभर मेहनत करूनही नागली लागवड करायच्या वेळीच वरुणराजा रुसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी सध्यातरी नागली लागवड करण्यापासून वंचित राहीले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी घाई घाईत लागवड केली अशा अनेक शेतकऱ्यांची नागलीची रोपे कडक उन्हामुळे पुर्णपणे वाळून गेली आहेत. त्यामुळे वर्षभर नागली लावणीसाठी मेहनत करायची आणि वेळप्रसंगी पाऊस पडला नाही तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही.अशा दुहेरी संकटात आयुष्यभर बळीराजाला जीवन व्यतीत करण्याची वेळ येत असते..
आदिवासींच्या जीवनात नागलीला अनन्यसाधारण महत्त्व
आदिवासी भागात पूर्वी नाचणी हे मुख्य पीक होतं. तेव्हा स्थानिक लोक नाचणी हे मुख्य अन्न म्हणून त्याला देव मानत. ही परंपरा आजही टिकून आहे. ‘कणसरी देव’ म्हणून या धान्याची पूजा केली जाते. त्यामुळे या धान्याशी जोडलेल्या लोकांच्या श्रद्धाही आहेत. हे पीक मुख्यतः खरिपात घेतलं जातं.
आदिवासीं बांधव बोलतांना सांगतात.. "नाचणी आमचा देव आहे. आम्ही शेतात कापणी, मळणी करायला जातो तेव्हा पूजा करतो. पूर्वी जात्यावर बसताना नाचणीची गाणीही म्हणायचो.नाचणी ला आदिवासी लोकांच्या जीवनात मोठे महत्त्व असुन कणसरी या नावाने सुध्दा ओळखले जाते.या कणसरी देवाची पाच ते दहा वर्षांतुन एकदा रात्रभर जागरण करीत पुजा अर्चा केली जाते व पहाटे कोंबडी बकरांचा बळी देऊन नैवेद्य दाखवला जातो.तर जुने जाणते लोकांच्या म्हणण्यानुसार कणसरी चा नाश केला तर घरात आजारपण येते त्यामुळे नाचणी ला आदिवासी लोकांच्या जिवनात अन्य साधारण महत्व आहे..नाचणी या मिलेट म्हणजेच भरडधान्यात उत्तम प्रतिचं प्रोटीन, व्हिटामिन, मिनरल्स, फायबर म्हणजेच तंतूमय पदार्थ, आणि उर्जा असते. असं हे सुपरफुड लोकांच्या आहारात असणं ही काळाची गरज मानली जातेय.
नागली पिकात दिवसेंदिवस घट…....
गेल्या तीन दशकांमध्ये भारतीय आहारात गहू आणि तांदूळ या धान्यांचा वापर वाढला. आणि भरडधान्यं आहारातून कमी होत गेली. एकसुरी पिकांचं (Mono-crop) प्रमाणही साहजिकच त्याचा परिणाम इतर पिकांच्या उत्पादनांवर झाला. 1965मध्ये भरडधान्यांच्या लागवडीखालील जमीन 72.6 लाख हेक्टर होती ती 2011 मध्ये साधारणपणे 19 लाख हेक्टरवर आली.
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार देशात नाचणीची लागवड 1965 च्या तुलनेत 2011 मध्ये निम्मी म्हणजेच 56.4 टक्के इतकी कमी झाली.25 जानेवारी 2023
भारतात 2018 हे वर्ष भारतात मिलेट वर्षं म्हणून साजरं केलं गेलं होतं. त्यानंतर भारताचा प्रस्ताव स्वीकारत संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्षं आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षं जाहीर केल आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान बदलात आश्वासक पीक म्हणून भरडधान्यांकडे पाहिलं जातंय. परंतु सध्या स्थितीला आदिवासी भागातील नागली पिक धोक्यात आहे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे