Ground Report : रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत मोजतेय अखेरच्या घटका

राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. अशीच एखादी भयंकर दुर्घटना रायगड जिल्ह्यातही घडण्याची भीती व्यक्त होते आहे. पाहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2021-02-17 14:55 GMT

राज्यात हॉस्पिटलमधील दुर्घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जर्जर झाली असून केव्हाही या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची भीती असल्याने जीवघेण्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सण 1982 साली करण्यात आले होते. आजघडीला या बांधकामाला तब्बल 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2012 मध्ये इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यावेळी पुढील 10 वर्ष ही इमारत वापरण्याची मुभा देण्यात आली होती.

Full View

मात्र सद्यस्थितीत ही इमारत अखेरची घटका मोजताना दिसत आहे. येथील लिफ्ट बंद असल्याने गर्भवती महिला, आबाल वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. इमारतीबरोबरच या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने येथील मशनरी धूळखात पडली आहे. रुग्णालयात जनरल सर्जनही नाहीये. तसेच दवाखान्यात भुलतज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ नसल्याने जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कमकुवत झाली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. एकूणच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे समोर आले आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना जिव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. अनेक ठिकाणी स्लॅब कोसळत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील मागच्या बाजूला असलेल्या रेलिंगवरील स्लॅब कोसळून तो खाली उभा असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाच्या अंगावर पडताना वाचला आहे.

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंतररुग्ण विभाग असलेल्या इमारतीची पुरती दुर्दशा झाली आहे. या विभागात ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी विभाग, नवजात बालक कक्ष, सिटी स्कॅन अपघात कक्ष, अतिदक्षता विभाग असल्याने येथे रुग्ण, नातेवाईक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची सतत वर्दळ सुरू असते. अशातच येथील स्लॅब सतत कोसळत असल्याने मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.


महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटना व निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी मिळावा याकरीता पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. आता तरी सरकारने या इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Tags:    

Similar News