श्वास घेणारा हा 'तारपा' आमचा देव...
एका वाद्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या जगप्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा यांची रोमहर्षक कहाणी पहा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांच्या या ग्राउंड रिपोर्ट....;
"पहिला आमचा आजोबा तारपा वाजवायचा,नवश्या वाजवायचा मग त्याचा मुलगा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा आणि लाडक्याचा मुलगा मी भिकल्या आता तारपा वाजवतु. हे आमचे पारंपारिक वाद्य आहे. या तारप्यालाच आम्ही देव मानतो".
तारपा या वाद्यालाच देव मानणारे भिकल्या धिंडा त्यांच्या घराण्याने जपलेला तारपा वादनाचा समृद्ध इतिहासच मॅकस महाराष्ट्र सोबत बोलताना उलगडतात. या वाद्याला श्वास दिल्यावरच त्यातून आवाज येतो. यामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार बसवलेले आहेत. तोंडाने श्वास देऊन वाजविणाऱ्या वाद्यांची निर्मिती आदिवासींनी केल्याचा त्यांना अभिमान वाटतो. आदिम कालापासून आदिवासी अशा प्रकारची वाद्ये वाजवत असल्याचे ते सांगतात.
भिकल्या धिंडा हे आज वयाच्या नव्वदिकडे झुकलेले आहेत. या वयातही अजून त्यांच्या शरीराला ताप म्हणजे काय हे माहित नसल्याचे ते सांगतात. ते आजही एक एक तास उभे राहून नृत्य करत तारपा वाजवतात.पण आजची नवी पिढी या कलेच्या क्षेत्रात येत नसल्याची खंत त्यांना वाटते.
पालघर सारख्या जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात येणाऱ्या वाळवंडा या गावात ते राहतात. भिकल्या धिंडा यांच्याकडे रोजगाराचे साधन उपलब्ध नव्हते. आपल्या कलेच्या जीवावर उदरनिर्वाह करण्यासाठी ते तारपा घेऊन विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले. सुरवातीला त्यांना मंदिरात प्रवेश देखील दिला जात नसल्याची आठवण ते सांगतात, "माझ्या खांद्यावरील तारपा बघितल्यावर काही लोक मला देवळात एंट्री देत नव्हते. मी त्यांना म्हणालो हा देव बोलतो का तुम्हाला हे ? माझ्या खांद्यावरील या वाद्यात देवाचा जीव आहे. शिकलेले लोक, श्रीमंत लोक देवाला फुलं वाहतात मी हे वाद्य वाजवून देवाचा सत्कार करतो".
एकेकाळी ज्यांना मंदिरात प्रवेश देखील दिला जात नव्हता ते भीकल्या धिंडा आज त्यांच्या कलेने जगप्रसिद्ध झाले आहेत. आता ते इतके प्रसिद्ध आहेत कि लोक त्यांना शोधत येतात. त्यांना नुकताच देशातील मानाचा समजला जाणारा 'राष्ट्रीय संगीत व नृत्य नाटक अकादमी अमृत पुरस्कार' घोषित झाला या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि ताम्रपत्र सन्मान असा असणार आहे ,या पुरस्काराचे वितरण येत्या 26 तारखेला प्रजासत्ताक दिनी पार पडणार आहे.
तारप्यातून विविध प्रकारचे सूर निघतात. वेगवेगळ्या आदिवासी कार्यक्रमात याचे वादन केले जाते. प्राण्यांमध्ये ज्या प्रकारे नर आणि मादी असतात तशाच पद्धतीने तारप्यामध्ये देखील नर आणि मादी असतात. त्यांच्या मिलनानेच यातून सूर बाहेर पडतात. तारप्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील पूर्णपणे नैसर्गिकच असते. यामध्ये माडाचे झाड, दुधीचा वापर केला जातो.
तारपा वाद्य म्हणजे काय..?
तारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य. भरतप्रणीत वाद्य वर्गीकरणानुसार सुषिरवाद्य आणि वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तारपा या सुषिर वाद्यावर आधारित तारपा हे आदिवासी लोकनृत्यही प्रसिद्ध आहे. 8ते 10 फुट लांबीचे हे वाद्य आदिवासी जमाती मध्ये वाजविले जाते. पावरी आणि तारपा तयार करण्याचे तत्व, सामग्री आणि पध्द्त साधारण सारखीच आहे. त्यामुळे या वाद्यात साम्यता आहे. लांबी कितीही असली तरी त्याच्या नादात फारसा फरक पडत नाही. त्याचे तीन भाग असतात.
पहिला भाग म्हणजे भोपळा. त्याच्या आकारावर वाद्याची लांबी मुख्यत: अवलंबून असते. यात वाजविणारा सारखा फुंक मारत राहतो. या भोपळ्यातली हवा मग वाद्याच्या दुसऱ्या भागात दोन पोकळ बांबूच्या नळ्यात जाते. एका नळीला सहा स्वरछिद्रे असतात. यावर निरनिराळे स्वर उत्पन्न करता येतात. एकच स्वर तुटकपणे वाजविता येत नाही. स्कॉटिश बॅगपाईपसारखे हे वाद्य अखंडपणे वाजत राहते.
तारपा नृत्याला आदिवासी समाजात असाधारण महत्व.....
वारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे.
शेतीच कांम संपली की पावसाळा संपता संपता "कामड्या" नाच होतो. हा रात्री ढोलकि च्या तालावर गोल फेर धरुन नाचतात
पाऊस पडत नसेल तर काळमेघ (डोंगरात जाउन) येक देखील आदिवासी बांधव नाच करतात
नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.
रात्री चंद्र दिसल्यावर नृत्य चालु होते आणि मग मध्यरात्री पर्यंत ते चालू असते.
रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे हे नृत्य म्हणजे सामूहिकनृत्याचा उत्कृष्ठ उदाहरण आहे.
'तारपा' हे एक प्रकारचे वाद्य (wind instrument) आहे. सुकलेला भोपळा आतून कोरून, पोकळ बनवून
हे वाद्य तयार करतात.
तारपा या वाद्यावर आधारित तारपा या आदिवासी लोकनृत्यात तारपा वादक हा मध्यभागी उभा असतो तर नृत्य करणाऱ्या जोड्या या त्याच्या भोवती गोलाकार नृत्य करत असतात नृत्याच्या वेळी तारपा वाजवणार्याच्या दिशेने सर्वजण
पाठमोरे असतात. आणि हे पुर्ण नृत्य असेच पाठमोरे पुढे जातच करतात. नृत्य करताना वारली स्त्रिया केसांचा अंबाडा घालतात. तारपा नृत्यात वारली आदिवासी हातात हात गुंफून गोलाकार नृत्य करतात
नृत्य करणाऱ्यात सर्वात पुढे जो असतो त्याच्या हातात एक काठी असते त्या काठीला घोळकाठी असे म्हणतात. काठीच्या वरच्या बाजूला लोखंडी पाकळ्या बसविलेल्या असतात. तारप्याच्या सुरावटी सोबत नृत्य करणाऱ्यांना ताल देण्याचे काम घोळकाठी करत असते. तारप्याची लय जस जशी वाढत जाते तसे नृत्य करणारे एकदम बेभान होऊन तारप्यातून निघणाऱ्या सुरावटी वर नाचत असतात. तारपा या वाद्यातून निघणारी सुरेल धून ऐकणाऱ्याला अगदी बेधुंद करून टाकते.
तारपा नृत्य दुर्लक्षित का..?
वातानुकुलीत सेटवर काम करणाऱ्या कलावंतांना सरकारदरबारी मोठी किंमत असते. त्यांचा आवाज ऐकला जातो. मात्र घशाला कोरड पाडून, शिरा ताणून, छातीचा भाता करून जिवाच्या आकांताने तारपा वाजणारा भिकल्या धिंडा यांचा आवाज सरकारच्या बहीऱ्या कानांपर्यंत पोहोचला नाही. आदिम संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तारप्याला आदिवासी समाजात मानाचे स्थान आहे. इतर वाद्यांच्या तुलनेत तारप्याचा इतिहास अधिक समृद्ध आणि पुरातनही आहे. पण इतिहासाने देखील तारप्याची नोंद कुठे घेतली? तारप्यात प्राण फुंकणारा आदिवासी कलाकार दिवसभर जिवाचे 'रान' करत काबाडकष्ट करुन रात्री या वाद्याच्या सान्निध्यात रमतो. सुरावटीवर ताल धरतो. रिंगण करून बायामाणसे काही क्षण व्यथा-वेदना विसरतात.. नाचतात.. गातात.. पाश्चिमात्त्य वाद्यांचे खूळ डोक्यावर घेणा-या नागर संस्कृतीला तारपा हे आदिम वाद्य 'आपले' वाटेनासे झाले आणि केवळ आदिवासींचे वाद्य म्हणून तारपा कायम दुर्लक्षिला गेला आहे.
भीकल्या धिंडा यांना पुरस्कार मिळाले त्यांची प्रसिद्धी झाली पण सरकारने अजूनही त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटवलेला नाही. याची खंत त्यांना सतत सतावते. रोजी रोटीचा प्रश्न जर मिटला असता तर त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यातला वेळ नव्या पिढीला तारपा वादन शिकविण्याकरिता देता आला असता. पुरस्कार मिळाले, नाव झाले, अनेकांची वाहवा मिळाली. पण संध्याकाळी रोजी रोटीचे काय असा सवाल रोजच भिकल्या यांना सतावतो. तारपा वादनाच्या या समृद्ध कलेने संपूर्ण जगात महाराष्ट्राची शान राखणाऱ्या,वृद्धत्वाकडे झुकलेल्या या आदिवासी कलाकाराकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंत करणाऱ्या करणाऱ्या या कलाकाराची आर्थिक गरिबी दूर होऊन आयुष्याची संध्याकाळ तरी आरामात जाणार का ?
प्रतिकूल परिस्थितीतही भिकल्या हे तारपा नृत्याचे प्राणपणाने जतन- संवर्धन करत आहेत. तारपा जगेल, तारपा वाजेल, तारपा नाचेल देखील पण कधी ?? जेव्हा तारपा वाजवणारे भिकल्या धिंडा या जगात असतील. देशाची संस्कृति समॄद्ध करणाऱ्या या कलाकारांसाठी सरकार आपले कर्तव्य निभावत आहे का ? हा खरा सवाल आहे.