थँक्यू आव्हाड... थँक्यू गोडसे...

Update: 2019-06-04 05:56 GMT

"पद सोडावं लागलं तरी हरकत नाही पण मी लिहीतच राहणार, बोलतच राहणार"

अशा आशयाची कविता लिहून आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्या वरील कारवाईला जबरदस्त आव्हान दिलं आहे. सर्वच गांधी प्रेमी हे गोडसे विरोधक नसतात यावरचं व्यंग म्हणून त्यांनी केलेल्या एका ट्वीटला आधार बनवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सरदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निधी चौधरी यांच्यावर हल्ला चढवला.

ज्या ट्वीटवरून हल्ला झाला ते ट्वीट १७ मे लाच मी वाचलं होतं. त्यानंतर निधी चौधरी यांची संपूर्ण टाइमलाइन आणि ब्लॉग ही वाचले. त्या दिवशी थँक्यू गोडसे या हॅशटॅगमुळे माझा ही गोंधळ झाला. आपलं इंग्रजी जेमतेम असल्याने इंग्रजीच्या काही जाणकारांना मी ते ट्वीट दाखवलं. निधी चौधरी यांच्या काही बॅचमेटशी ही बोललो. तेव्हा गांधी-आंबेडकरांच्या बाबतीतली त्यांची मते कळली. शरद पवारांना आणि अशोक चव्हाणांना वेळ नसेल कदाचित पण जिंतेंद्र आव्हाड यांनी हा रिसर्च केला पाहिजे होता.

भारतातल्या सडक्या मेंदूची लोकं गोडसेमुळे आपल्याला आज कळतात, सहज ओळखता येतात. हा त्या थँक्यू गोडसे मागचा आशय होता. मला वाटतं हे समजून घेतलं पाहिजे.

गांधी जयंतीचं १५० वं वर्ष साजरं करत असताना त्याच वर्षी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारल्या जातात, यामुळे जर कोणी व्यथित झालं असेल तर ती भावना समजून घेतली पाहिजे. सरसकट नथुरामचं समर्थन करणाऱ्या सरकारने विरोधी पक्षाच्या मागणीला शिरसावंद्य मानून लगेचच कारवाई का केली? याचाही विचार केला पाहिजे. निधी चौधरी नथुराम विरोधक आहेत हे स्पष्ट झालंय. त्यामुळे सरकारने विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निधी चौधरी यांचं सावज टिपलंय.

सरकार जर विरोधी पक्षाला इतकंच गांभीर्याने घेत असतं तर विरोधी पक्षाने देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांच्यावर कधी का कारवाई झाली नाही. निधी चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं कारण काय...? तर...

निधी चौधरींची गांधींवरची श्रद्धा स्वच्छ भारतच्या चष्म्यासारखी नाहीय. ती चरख्यासारखी आहे. त्या नथुरामाला देशभक्त मानत नाहीत.

आता राहिला मुद्दा, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सेवाशर्तीनुसार समाजमाध्यमे तसंच माध्यमांमध्ये व्यक्त होण्यावर निर्बंध आहेत. मात्र, सध्या सर्वच प्रशासकीय अधिकारी समाज माध्यमांचा वापर करतात. काही अधिकारी तर समाजमाध्यमांवर राजकीय नेत्यांपेक्षा-मंत्र्यांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. नेत्यांपेक्षा या अधिकाऱ्यांना जास्त फॉलोईंग आहे.

काही अधिकारी तर सरसकट सरकार ऐवजी पक्षाचं किंवा खात्याच्या मंत्र्याचं पीआर करत असतात. समाज माध्यमांवर भाटगिरी करणाऱ्या अधिकारी आणि विचार व्यक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भेद करता येईल का? निधी चौधरी यांच्यावर जर समाजमाध्यमांमध्ये व्यक्त झाल्याबद्दल कारवाई होत असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत टूरवर निघाल्याचा सेल्फी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला हवी.

निधी चौधरी यांच्या म्हणण्याचा अर्थ समजवून न घेता त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी, त्यांना सुनावणी देण्याचा नैसर्गिक न्याय ही पाळलेला नाही. जितेंद्र आव्हाड किंवा त्यांच्या नेत्यांनी निधी चौधरी यांना फोन केला असता तरी त्यांना वस्तुःस्थिती समजली असती.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे एका अशा अधिकारी महिलेला कारवाईला सामोरं जावं लागलंय जिचा सत्तेवर बसलेल्या नथुरामी प्रवृत्तीला विरोध आहे.

निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर आपली किती श्रद्धा आहे हे सांगणाऱ्या पोस्ट टाकायला सुरूवात केलीय. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्या उत्तर देत बसल्यायत. आपल्या तान्हुल्या बाळाला डोळ्यातलं अश्रूमिश्रीत दूध पाजतेय, झालेल्या आरोपामुळे आपली छाती सुकून गेलीय अशा भाषेत त्यांनी आपली व्यथा मांडलीय. मला पदाचा मोह नव्हता, पण मी बोलत राहणार असंही त्या म्हणतायत.

कदाचित, त्यांना यापुढे फार बोलता येणार नाही. तोंडावर पट्टी बांधून सरकारी कामात स्वतःला गाडून घ्यावं लागेल, जर बोलल्या तर परत कारवाई होईल. आता त्या सरकारच्या रडारवर आहेत, त्यांच्या भोवतीचे ढग विरोधी पक्षानेच दूर केलेयत. समाजमाध्यमांवर व्यक्त होणं हा अतिउत्साह ही असू शकतो.. आणि कधी कधी अतिउत्साहात नुकसान होतं.. निधी चौधरी आणि विरोधी पक्ष अशा दोघांच्या बाबतीत हेच झालंय. निधी चौधरींच्या बाबतीत आता विरोधी पक्षावरच त्यांचा बचाव करण्याची जबाबदारी आहे, ज्याने घाव घातले त्यांनीच औषधोपचार केले पाहिजेत.

- रवींद्र आंबेकर

raviamb@gmail.com

Similar News