शिक्षकाच्या अथक प्रयत्नातून वस्ती शाळा पोहचली देशपातळीवर..
प्रतिकुल परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी या गावातील इंगोले वस्ती येथे असणाऱ्या वस्ती शाळेने शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. या शाळेतील शिक्षक रवी चव्हाण यांनी विविध अडचणीचा सामना करत आज या वस्ती शाळेचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेचा रिपोर्ट..;
शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होतो. जगातील चालू घडामोडींची माहिती होण्यास मदत होते. शिक्षणामुळे मनुष्याचे जीवनच बदलून जाते. त्याच्यातील अज्ञानाचा अंधकार दूर होवून भविष्यात येणाऱ्या धोक्यांची माहिती त्याला या शिक्षणाच्या माध्यमातून होते. म्हणूनच राज्य घटनेने शिक्षणाचा अधिकार हा भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केला आहे. चौदा वर्षा खालील मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे,अशी तरदुत राज्य घटनेत करण्यात आली आहे. त्याच अनुषगाने शासनाने ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत,यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांचे जाळे विणले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या शाळेत शिकून अनेक मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. पण अलीकडच्या काळात पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडे वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली असल्याचे सांगण्यात येते. अशा ही कठीण परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी या गावातील इंगोले वस्ती येथे असणाऱ्या वस्ती शाळेने शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. या शाळेतील शिक्षक रवी चव्हाण यांनी विविध अडचणीचा सामना करत आज या वस्ती शाळेचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे.
सुरुवातीच्या काळात या शाळेची दुरवस्था झाली होती. या वस्ती शाळेवर शिक्षक रवी चव्हाण रुजू झाल्यानंतर या शाळेच्या सुसज्जेतेकडे लक्ष देवून सुधारणा करण्यात सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनाही विश्वासात घेण्यात आले. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात अनेक अडचणीचा सामना करणारी इंगोले वस्ती शाळा आज सुसज्ज झाली असून या शाळेला अनेक अधिकारी,संस्था यांनी भेट देवून मदत केली आहे. या शाळेत सध्या डिजिटल शिक्षण देण्याचे काम येथील शिक्षक करत असून शाळेत अमुलाग्र बदल करणारे शिक्षक रवी चव्हाण यांचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष असे कौतुक करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आदर्श डिजीटल प्राथमिक शाळा
जिल्हा परिषदेची आदर्श डिजीटल प्राथमिक शाळा, इंगोले वस्ती(खंडाळी)तेथे असून ती सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच डिजिटल शाळा असल्याचे सांगण्यात येते. ही वस्ती शाळा पुणे-सोलापूर महामार्गापासून पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. खंडाळी गावाला राजेशाहीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळच आष्टी-येवती तलाव आहे. त्यामुळेच येथील सर्व शेती ओलिताखाली असल्याचे दिसते. या शाळेचे वर्णन, निसर्ग रम्य वातावरणातील सुंदर शाळा, गुरूदेव रविन्द्र नाथ टागोर यांच्या कल्पनेतील निसर्ग पूरक वातावरणातील आनंददायी शाळा असेही करता येईल.
शाळेत बदलत्या काळानुसार दिले जाते शिक्षण
या वस्ती शाळेची स्थापना 1991 साली झाली असून वस्तीच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्तीवरील मुले या शाळेत येतात. या शाळेत बदलत्या काळानुसार शिक्षण दिले जात असून शाळेचे काही माजी विद्यार्थी प्रगतशील शेतकरी आणि नोकरदार आहेत. शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. कोरीनाच्या काळात ऑनलाईन क्लास घेतले जात होते. या दरम्यान प्रत्येक इयत्ता नुसार ग्रुप वरून दररोज विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात होता. तसेच या शाळेत स्पर्धा परीक्षे संबंधी मार्गदर्शन केले जात असून डिजीटल साहित्याद्वारे आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. शाळेत सोलर स्मार्ट स्कूल चालवले जात असून ABL व ज्ञानरचनावादी शिक्षण दिले जात आहे.
उत्कृष्ठ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर स्पर्धांमध्ये शाळेचा सहभाग व लक्षणीय यश
सकाळ बालमित्र स्पर्धेत आतापर्यंत या शाळेतील विद्यार्थ्यांची 60 पेक्षा जास्त चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. सुंदर हस्ताक्षर,संगीतमय परिपाठ,मुलांचे वाढदिवस,पक्षांसाठी चारा-पाणी असे विविध प्रकारचे उपक्रम या शाळेत राबविले जात आहेत. या शाळेने विविध क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेवून लक्षणीय यश मिळवले आहे. शाळेत शालेय वस्तू भांडार असून पाढे पाठांतर शिकवले जात आहे. योग्य मोसमात वनभोजन व सहलींचे शाळेकडून आयोजन केले जाते. दर महिन्याला महिला मेळावा,बाल आनंद मेळावा,सामान्य ज्ञान परीक्षेचे नियोजन,ई-लर्निंग,वृक्ष संवर्धन,ठिबक सिंचन असे उपक्रम राबविले जात आहेत. सर्वांना स्पोर्ट्स ड्रेस दिला जात असून सोबत प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाते. या वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी RO aqua फिल्टरने पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.
शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त
गुजरात -अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी शाळेतील शिक्षक रवि चव्हाण यांची निवड. 28 ते 30 जानेवारी 2019 रोजी झाली होती. या ठिकाणी टॅबलेट स्कूल,सोलार स्मार्ट डिजीटल स्कूल चालवले जात आहे. वस्ती शाळेला ISO 9001:2008 मानांकन प्राप्त झाले असून 2015-16 साली मानाकंन मिळाले आहे. फेब्रुवारी 2016 साली शाळेची निवड शाळा सिद्धी या राष्ट्रीय उपक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम झाली होती. शाळा श्रेणी - "अ" मध्ये असून 100 टक्के प्रगत विद्यार्थी युक्त शाळा आहे. राजस्थान राज्यातील शिक्षण सचिव आणि 7 सदस्यीय अभ्यास गटाने शाळेला सप्टेंबर 2017 भेट देवून पाहणी केली. तत्कालीन सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO राजेंद्र भारुड यांनी शाळेला भेट देवून पहाणी केली होती.
फेसबुक व्हिडिओ कॉल द्वारे शाळेचा थेट अमेरिका स्थित पर्यावरण शास्त्रज्ञांबरोबर लाइव्ह संवाद
या शाळेने अहमदाबाद, बारामती,सोलापूर तसेच विविध ठिकाणीच्या शिक्षण परिषदे मध्ये ppt चे सादरीकरण केले असून त्यामुळेच शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. शाळा आणि शाळेचे उपक्रम पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे शिक्षक ,अधिकारी वर्ग शाळेला भेटी देत आहेत. एवढेच नाहीतर कर्नाटक येथूनही शिक्षक,पालकांच्या टीमने शाळेला भेट दिली आहे.
माझी समृद्ध शाळा, गुणवत्ता विकास अभियाना अंतर्गत शाळेला मिळाले पुरस्कार
या शाळेला 2008-2009 साली तालुका स्तरीय तृतीय क्रमांक मिळाला होता तर 2012-2013 साली तालुका द्वितीय क्रमांक मिळाला होता. 2013-2014 साली याच अभियानाअंतर्गत तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळाला होता. 2014-2015 साली याच पुरस्काराने या शाळेला पुन्हा प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. त्यानंतर 2015-2016 साली याच शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सन 2019-2020 साली तालुका स्थरावर या शाळेला विशेष आदर्श शाळा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. याच शाळेने 2021-22 साली झालेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान मध्ये मोहोळ तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या शाळेला जिल्हास्तरीय समता गौरव पुरस्काराने सन 2012-2013 साली गौरवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय वृक्षमित्र पुरस्कार देखील सन 2013-2014 साली देण्यात आला आहे. तसेच कृतिनिष्ट शाळा पुरस्कार तालुकास्तरवरील 2015-2016 साली मिळाला आहे. ही शाळा ISO झाल्याबद्दल तालुकास्तर तिला विशेष गौरव पुरस्काराने 2015-2016 साली सन्मानित करण्यात आले आहे. रत्नाई आदर्श शाळा पुरस्काराने 2019-2020 साली गौरवण्यात आले असून त्यामुळेच शिक्षण विभागाकडून शाळेचे अनेकवेळा अभिनंदन करण्यात आले. शाळेला अनेक रोख बक्षिसे मिळाली असून लोकवर्गणी तुन शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे. भौतिक सुविधा आणि इतर अत्याधुनिक सुविधासाठी रोख रक्कम व वस्तू रुपाने सुमारे 11 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे.
शाळेला विविध संस्थांकडून मदतीचा हात
प्रिसिजन कॅम्पशाप्ट कंपनी सोलापूर कडून शाळा संपूर्ण डिजिटल with सोलार सिस्टिम युक्त करून देण्यात आली आहे. इन्फोसिस टेक्नोलॉजि,पुणे या कंपनी तर्फे शाळेला 4 संगणक भेट देण्यात आले आहेत. तर सोलापुरातील बालाजी अमाईन्स लिमिटेड या कंपनी तर्फे 1 संगणक भेट देण्यात आला आहे. ग्रामपंचायत खंडाळी तर्फे शाळेला RO aqua वॉटर फिल्टर भेट देवून ,स्मार्ट TV व पेव्हर ब्लॉक फरशी बसवून देण्यात आली आहे.
या शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे परिसरातील पालकांचा ओढा या वस्ती शाळेकडे वाढला असून शाळेचा पट सध्या 150 च्या आसपास गेला आहे.