शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकोप्याने शाळेला मिळाला स्वच्छतेचा पुरस्कार

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता संपली असल्याचे सांगितले जात असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. या शाळेला 'स्वच्छ शाळा,सुंदर शाळा' या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-09-05 12:43 GMT

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता संपली असल्याचे सांगितले जात असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. या शाळेला 'स्वच्छ शाळा,सुंदर शाळा' या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...

या शाळेची स्थिती पूर्वी चांगल्या प्रकारची नव्हती. पण या शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकोप्याने शाळेला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची पट संख्याही वाढली असून मोहोळ तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी या शाळेत आता प्रवेश घेवू लागले आहेत. चालू वर्षी या शाळेचे पहिल्याच दिवशी प्रवेश पूर्ण झाले असून येथे नव्याने इयत्ता आठवीचा वर्ग ही सुरू करण्यात आला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून पट संख्या 750 च्या आसपास गेला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येत असून ही जिल्हा परिषदेची शाळा निसर्ग रम्य वातावरणात आहे. त्यामुळेच या ठिकाणी विद्यार्थी रमताना दिसत आहेत. या शाळेला विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले असून नुकताच 'स्वच्छ शाळा,सुंदर शाळा' या उपक्रमाअंतर्गत शाळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. 30 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेला भेट देवून शाळेची गुणवत्ता तपासली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेवून विद्यार्थ्यांकडून अपेक्षित अशी उत्तरे मिळाल्याने विद्यार्थी,शिक्षक आणि ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले. ही शाळा विविध प्रकारचे प्रयोग करत असून विद्यार्थ्यांत गुणवत्ता वाढवण्याचे काम करत आहे. येणाऱ्या काळात शाळेची आणखीन चांगल्या प्रकारे गुणवत्ता दिसेल,असे शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी बोलताना सांगितले.

Full View




 


मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालकांचाही सहभाग

पापरी गाव मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले गाव असून मोहोळ-पंढरपूर या पालखी मार्गावर असणाऱ्या पेनुर गावापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाला इतिहास लाभला असून शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालकांचाही तितकाच सहभाग आहे. शाळेच्या विविध अडचणी समजून घेवून ग्रामस्थांनी वेळोवेळी त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यात ते यशस्वी ही झाले आहेत. शाळेतील मुलांच्या प्रगतीकडे पालकांचे वैयक्तिक लक्ष असल्याचे शिक्षक सांगतात. या शाळेची सध्या प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू असून येणाऱ्या काळात ही शाळा आणखीन गुणवत्तेच्या शिखरावर जाईल असे ग्रामस्थांना वाटत आहे.

शाळेला मिळाला 'स्वच्छ शाळा,सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार




 


या शाळेची स्थापना 1995 साली झाली असून आजतागायत शाळेच्या गुणवत्तेचा आलेख वाढतच राहिला असल्याचे नागरिक सांगतात. नुकताच या शाळेला 'स्वच्छ शाळा,सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारचा स्वच्छ शाळा उपक्रमांतर्गत पहिला पुरस्कार मिळाला आहे. ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत जशी अग्रेसर आहे,तशी पटाच्या बाबतीत ही अग्रेसर आहे. या शाळेत तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. या शाळेची गुणवत्ता शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी वाढली असल्याचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी सांगितले. शाळेत नवोदय विद्यालय,सातारा सैनिक स्कूल,विद्या निकेतन,पूर्व माध्यमिक शिष्वृत्ती आणि माध्यमिक शिष्वृत्तीची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यास अडचण येत नाही. या वर्षी झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत 17 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण




 


या शाळेची वाढती पट संख्या पहाता येथे नव्याने इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून शाळा सकाळी 9:30 वाजता सुरू होवून सायंकाळी 6 वाजता सुटते. ही शाळा 24 तास सुरू असून वर्षातील 365 दिवस सुरूच असते. या दिवसात शाळेत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अध्यापनाचे कार्य सातत्याने सुरू असते. या शाळेत नवीन माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून डिजिटल बोर्डावर शिकवण्याचे काम केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास समजण्यास चांगल्या प्रकारे मदत होत आहे. शाळेत नवनवीन प्रयोग सातत्याने केले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीत वाढ होत आहे. येणाऱ्या काळात आणखीन चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्यात प्रगती होईल,असे शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी सांगितले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेला दिली भेट




 


तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेला 30 एप्रिल 2022 रोजी भेट देवून शाळेची गुणवत्ता तपासली. त्यांनी शाळेतील वर्गात जावून विद्यार्थ्यांना पाढे आणि जोड शब्दाबद्दल माहिती विचारली. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे दिली. त्यावेळेस वर्गातून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी शिक्षक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले. या शाळेला थोड्याच दिवसात एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल,असे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News