सरकारी नोकरी सोडत शिक्षक दाम्पत्याने वंचित, शोषित व रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठी उभारली शाळा

एकीकडे सरकारी नोकरीला अनन्य साधारण महत्व आहे.पण सोलापूर जिल्ह्यातील महेश निंबाळकर व विनया निंबाळकर या शिक्षक दाम्पत्याने शिक्षकाची नोकरी सोडत समाजातील गरीब,वंचित,शोषित व भटके जीवन जगणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्नेहग्राम नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.गरीब,वंचित मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश यावा यासाठी महेश निंबाळकर व विनया निंबाळकर यांनी सर्वस्व पणाला लावत बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात 2015 साली स्नेहग्रामची सुरुवात केली.या प्रकल्पात महाराष्ट्राच्या विविध भागातील 40 मुले शिक्षण घेत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-01-01 01:30 GMT


माळरानावर फुलवले शिक्षणाचे नंदनवन

प्रकल्प कोरफळे आणि पानगावच्या सीमेवर असणाऱ्या माळरानावर आहे.महेश निंबाळकर व विनया निंबाळकर यांनी येथे शिक्षणाचे नंदनवन फुलवले आहे.सिग्नलला जी मुले भीक मागत होती.ती मुले येथे आज शिक्षण घेत आहेत.यातील काहींचे आई-वडील शहरात फुटपाथवर खेळणी विकत आहेत तर काहीचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले आहेत.काहींचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरत आहेत. अशा या सर्व मुलांचा माई-बाप स्नेहग्राम झाले आहे.स्नेहग्राम कोरफळे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे.या प्रकल्पाला चहोबाजुनी तारेचे कंपाउंड मारले गेले आहे.येथे मुलांना अभ्यासाठी ग्रंथालय व खेळण्यासाठी बागेत जे साहित्य असते ते साहित्य स्नेहग्राम मध्ये आहे.येथील परिसर झाडांच्या हिरवळीने फुलला आहे.शाळेत मुलांना शिकवण्याचे काम विनया निंबाळकर करतात.




 


वंचित,शोषित,भटक्या मुलांच्या जीवनात बद्दल व्हावा यासाठी सोडली नोकरी

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना विनया निंबाळकर म्हणाल्या की,2007 साली लातूर रस्त्याने जात होतो.रस्त्याच्याकडेला भटके जीवन जगणाऱ्या लोकांची वस्ती दिसली.त्याठिकाणी शाळाबाह्य मुले होती.त्यावेळेस शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे सुरू होता.आम्ही दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नवीनच नोकरीला लागलो होतो.नवीन नोकरी म्हटल्यावर अंगात जोश होता.आपण खूप चांगल्या भावनेने काम करायचे अशी भावना होती आणि त्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली.जेंव्हा रस्त्याच्याकडेला असलेल्या वस्तीत गेलो,तेंव्हा तेथे 100 ते 150 मुले दिसली.आम्हाला थोडस वाटलं की,उद्याच्या भारताच भवितव्य येथे रस्त्यावर फिरताना दिसतंय.यांच्यासाठी काय करता येईल का यासाठी आम्ही त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारले की,येथे कोण शिक्षक व कोणी आले होते का ? त्यांच्याकडून नाही म्हणून उत्तर आले. त्यावेळी या वस्तीच्या आसपास असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना आम्ही जाऊन भेटलो.त्यांना सांगितले की,या वस्तीतील मुले शाळाबाह्य आहेत. त्यांना आपण शाळेत घ्यावे.त्यावेळी त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही.यासाठी बराच कालावधी गेला.यानंतर आम्ही या मुलांचा बायोडाटा सरकारकडे पाठवला.

वस्तीत राहणाऱ्या व्यक्तीने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी महिन्याला 400 रुपये देण्याची केली मागणी

सरकारने वस्तीत राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शाळेत घेण्याची परवानगी दिली आहे. हे सांगण्यासाठी जेंव्हा आम्ही वस्तीमध्ये गेलो तेंव्हा तेथील मुळे नावाच्या वयस्कर व्यक्तीने मुले शाळेत पाठवू पण महिन्याला 400 रुपये हजेरी देण्याची अट घातली. त्यावेळी आम्ही शिक्षण सेवक होतो.आम्हाला 2800 रुपये पगार होता.त्यामुळे यांना 400 रुपये देणे कुठेतरी संयुक्तिक वाटत नव्हते.आमचा उद्देश हा होता की,ही शाळाबाह्य मुले शाळेत आली तर त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल.त्यांना चांगले वाईट याची प्रचिती येईल.त्यांची जगण्यासाठी चाललेली भटकंती थांबेल.400 रुपये हजेरी मागत असताना असे वाटले की,यांच्या मुलांना शिकवण्यासाठी सगळ्या यंत्रणेचा आपण वाईटपणा घेतला.त्या बदल्यात हे लोक असे बोलत आहेत.त्यावेळी आम्ही त्यांना आवेषाने म्हणालो होतो की, आता तुमच्या वस्तीमध्ये येऊन शिकवायचे राहिले आहे. ते आता आम्ही आनंदाने स्वीकारले आहे.खरे तर त्यांच्याकडून मिळालेली ही संकल्पना आहे.असे विनया निंबाळकर यांनी सांगितले.




 


सुरुवातीला पालावर सुरू केली शाळा

या वस्तीमध्ये सुरुवातीला भटक्यांची शाळा या नावाने पालावरची शाळा सुरू केली गेली.या वस्तीमधील मुलांना अनौपचारीक शिक्षण तर शिकवत होतोच पण त्याचबरोबर या वस्तीतील ज्या काही अडचणी होत्या.त्या म्हणजे महिलांचे अँनिनिमिया सारखे आजार त्यांची बाळंतपणे व रक्त कमी असेल तर त्यांना पोषण आहार अशा पध्दतीने तेथे शिक्षण चालू केले.या वस्तीत आम्ही 2007 ते 2014 सालापर्यंत काम केले.तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली की,त्या वस्तीमधून मुलांना बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. कारण जसा माहोल त्याप्रमाणे मुले घडतात.त्यासाठी आम्ही स्नेहग्रामची निर्मिती केली.

अन्न, वस्त्र,निवारा या बरोबरच शिक्षण ही तितकेच गरजेचे

यावेळी विनया यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र,निवारा याबरोबरच मानवाला शिक्षण ही तितकेच महत्वाचे आहे.शिक्षण घेतल्यास विचारांमध्ये सुद्धा प्रगती होते.स्नेहग्राम सुरू करण्यासाठी आम्हाला कोणाची ही मदत नव्हती.त्यावेळी घरच्यांकडून बोलणे खावे लागले.सुरवातीला शाळा खांडवी गावात सुरू केली होती.भाड्यामुळे ते गाव सोडावे लागले.त्यानंतर आम्ही कोरफळे गावात आलो.या ठिकाणी 6 महिने शासनाच्या घरकुलात लोकसहभागातून शाळा चालवली.त्यावेळी यासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे हे लक्षात आले.

कर्ज काढून स्नेहग्रामची केली निर्मिती

कोरफळे गावातील शासकीय घरकुलात आमच्याकडे 25 मुले शिकायला होती.त्यामुळे जागेची गरज भासू लागली.त्यावेळी स्नेहग्रामची निर्मिती करण्याचे ठरवून महेश निंबाळकर यांनी सोसायटीचे कर्ज घेतले.माझ्याकडे जेवढे दागिने होते.ते मोडले आईनेही मदत केली असे विनया यांनी सांगितले. त्या बोलताना म्हणाल्या की, कर्ज काढून पावणे तीन एकर जमीन स्नेहग्रामसाठी घेतली.सुरुवातीला या माळरानावर एकही झाड नव्हते.याठिकाणी जे बांधकाम सुरू आहे. ते आनंदवनचे कौस्तुभ आमटे व विकास आमटे यांच्या माध्यमातून सुरू आहे.सुरुवातीच्या काळात आम्ही डोक्यावर भरपूर उन्ह घेतले आहे. त्यामुळे आम्ही याठिकाणी पुष्कळ झाडे लावली आहेत.

स्नेहग्राममध्ये सेक्स वर्कर,रस्त्यावर भीक मागणारी मुले,कोरोनाच्या काळात आई-वडील गमावलेली मुले शिक्षण घेत आहेत

या प्रकल्पात सेक्स वर्कर,रस्त्यावर भीक मागणारी मुले,कोरोनाच्या काळात आई-वडील गमावलेली मुले शिक्षण घेत आहेत.त्यांना राहण्याची व जेवणाची चांगली सुविधा आहे.मुलांचा स्वयंपाक स्वतः विनया निंबाळकर करतात. त्या म्हणतात की ,भटक्या मुलांना शिकवणे फार अवघड आहे.कारण अशी मुले कधी एका ठिकाणी बसलेली नसतात.त्यांना अभ्यासाची आवड नसते.त्यासाठी त्यांना सवय लागावी यासाठी प्रयत्न केले.या स्नेहग्राममध्ये पुणे,मुंबई, सातारा व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील मुले शिक्षण घेत आहेत.




 


मुलांना दिले जाते व्यवहारिक ज्ञान

या प्रकल्पातील मुले भटकी असल्याने त्यांना लोकशाही माहिती व्हावी.यासाठी त्यांना निवडणुका यांची माहिती दिली जाते.ही शाळा म्हणजे लोकशाहीची शाळा आहे.येथे ग्रामसभा,ग्रामन्यायालय,बालसंसद याची प्रत्यक्ष माहिती दिली जाते.बँकेत पैसे टाकायचे व काढायचे कसे याची सुद्धा माहिती दिली जाते.हा प्रकल्प लोकसहभागातून चालवला जात आहे.

अक्षर ओळख नसताना ही लिहायला वाचला शिकलो

अजय पवार या विद्यार्थ्यांने सांगितले की,आई-वडील रस्त्यावर खेळणी विकतात.येथे आल्यानंतर लिहायला,वाचायला व गणिते सोडवायला शिकलो.तर सचिन पवार या विद्यार्थ्यांने सांगितले की,सुरुवातीला मला 15 दिवस काहीच समजत नव्हते.एकच अक्षर गिरवत होते.आता लिहायला व वाचायला शिकलो आहे.

Tags:    

Similar News