चक्रीवादळाने कोकणवासियाच्या आयुष्याचं चक्रच बदललंय का?

कोकणवासियांच्या डोळ्यातलं पाणी कधी थांबणार का?;

Update: 2021-05-26 11:31 GMT

दोन रात्री आम्ही जागून काढल्या, पोटात अन्नाचा कण नव्हतं, दोन मुलांनी साधं पाणी पण प्यायलं नाही, वादळात आमच्या घराचे छप्पर डोळ्या देखत उडाले, आम्ही हतबलतेने बघत राहिलो, घरातले तांदूळ, मसाला सामान सर्व भिजला, ढोर गुर भिजली, गेल्यावर्षी पण तिच तऱ्हा होती. या वर्षी पण तसंच... आम्ही काय करणार? आमचे मालक मजूरी करतात, प्रत्येक वेळेला नुकसान भरून काढायला कुठून पैसे आणणार? सरकारने आता काही तरी करायला पाहिजे...

कोरोनाचे महा भयंकर संकट व निसर्ग चक्री वादळ अशा संकटातून अजूनही कोकणवासीय सावरले नाहीत. तोच तौक्ते चक्री वादळाने पुन्हा त्या कटू आठवणींना जागे करण्याचे काम केले आहे. माधुरी भोईर (वय 40) घराच्या बाहेर येताना खालच्या स्वरात उत्तर दिलं. त्यांचा चेहरा पूर्ण उतरुन गेला होता.

काय नुकसान झालं? असा सवाल करताच...

त्यांना रडू च कोसळलं, त्या म्हणाल्या

हे चक्रीवादळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग , गोवा तसेच रायगड सागरी किनारपट्टीवर येऊन धडकले, अन् होत्याचे नव्हते झालं. या वादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यात आणि सर्वच तालुक्यांवर पडला आहे. या वादळाने कोट्यवधींचे नुकसान केलेच. मनुष्य हानी देखील मोठी झाली आहे.

तौक्ते वादळ आता शांत झालं असलं तरी या वादळामुळे लोकांच्या जीवनात आलेलं वादळ मोठं आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील साखळी या गावात झालेल्या चक्रीवादळाने झालेले नुकसान पाहिल्यानंतर कोरोना महामारीमध्ये आलेल्या या वादळाने लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचं चक्रीवादळाचे भय संपता संपत नाही. निसर्ग वादळानंतर आलेल्या तौक्ते चक्रवादळाने लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 43.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांना चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.

बेणसे सिद्धार्थ नगर येथील एक आजीबाई चंद्रभागा अडसुळे यांना नुकसानी चे विचारले तर त्या म्हणाल्या वादळ म्हटलं की,

जीव मुठीत घेऊन बसावं लागतं, मी घरात एकटीच, मुलं बाळ पोटा पाण्यासाठी बाहेर असतात, इथं घरात कोणी नसतात, मागच्या वर्षी घराचे पत्रे उडाले मोठं नुकसान झाले, या वर्षी पण ढापे उडाले, एकतर कोरोना काळात खायचे वांदे, नुकसानीला खर्च कुठून करणार? गरिबाला सरकारने मदत कराय पाहिजे….

असं म्हणत आजीने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

चोळे येथील शेतकरी अनंत भुरे याने सांगितले वादळे येतात... जातात... पण डोळ्यात पाणी ठेऊन जातात, आमच्या गावात मोठं नुकसान झालं, सर्वत्र घरांचे, देऊळ, शाळेचे पत्रे उडाले, माझ्या शेतात असलेल्या घराचे मागच्या वर्षी खूप मोठं नुकसान झाले, पण एक वर्ष होऊन एक दमडी भरपाई मिळाली नाही, यावर्षी देखील घराचं वादळाने नुकसान केलेय, शेतीच नुकसान झालंय, सरकारने भरपाई दिली तरच पुढं काही करता येईल.

अशी आशा व्यक्त केली आहे.

वादाळात झालेलं नुकसान...

जिल्ह्यातील 6 हजार 26 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे तर 10 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 7 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

महावितरणच्या एकूण 168 HT पोलचे, 426 LT पोलचे तर 12 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील 661 गावातील (लोकसंख्या अंदाजे 1 लक्ष 6 हजार) वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक तालुक्यातील विजबत्ती गुल झाली असून विद्युत पुरवठा जलद सुरू करण्याची मागणी देखील जोर धरतेय.

वाहतूक व्यवस्था कोडमडली...

चक्रीवादळामुळे विविध ठिकाणी झाडे/ झाडाच्या फांद्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

कोळी बांधवाचं मोठं नुकसान...

एका बाजूला कोरोनाचे संकट, बेरोजगारी व उपासमार तर दुसऱ्या बाजूला चक्री वादळ, या वादळाने कोळी बांधव, मच्छीमार हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील मच्छीमारांच्या 125 जाळ्यांचे व 150 बोटींचे अंशतः नुकसान झाले आहे. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कोळी बांधव करीत आहेत.

जिल्ह्यात 5 हजार हेक्टर आर शेतजमिनीचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने आंबा, नारळ, भातशेती यांचा समावेश आहे. त्यामुळे बागायतदार व शेतकरी रडकुंडीला आले आहेत. मायबाप सरकारने नुकसान भरपाई देऊन आम्हाला जगवावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे.

जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते. या चक्रीवादळाने जिल्ह्यात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

निता भालचंद्र नाईक, वय ५० वर्षे, त्या उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.

सुनंदाबाई भिमनाथ घरत,वय ५५ वर्षे,ह्या उरण तालुक्यातील असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.

रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, ते पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला.

रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाकाव एमआयडीसी, रोहा

(रा.डोंबिवली, ठाणे) येथील असून त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला.

या वादळाने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी केलीच मात्र, मनुष्य हानी देखील झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले असल्याने १ ते ५ जून दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या वादळानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली...

निसर्ग चक्रीवादळानंतर वर्षभराच्या आत तौक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळांमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक कटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. बदलत्या जागतिक हवामान परिस्थितीमुळे खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीवर बसत आहे. ही बाब विचारात घेऊन येथील घरांची व कार्यालयांची संरचना बदलने आवश्यक आहे. घरांवर मोठ्या प्रमाणात बसविलेली सिमेंटची पत्रे उडाल्याने घरांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे येथील घरे व कार्यालये कौलारू किंवा आरसीसी बांधकामाची उभारणे गरजेचे आहे. चक्रीवादळात झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे १ ते ५ जून दरम्यान जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यामध्ये येथील भौगोलिक परिस्थिती अनुरूप झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिका निधी चौधरी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की...

17 मे 2021 ला जिल्हयात "ताऊक्ते" चक्रीवादळामुळे झालेल्या घर, गोठे, शेती व सार्वजनिक मालमत्ता यांचे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मृत व्यक्ती, मृत जनावरे यांच्याबाबतही संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश तहसीलदार यांना दिले असल्याची माहिती दिली आहे.

Full View

Similar News