ताराबाई शिंदे: चीनने दखल घेतली, महाराष्ट्र सरकार कधी घेणार?

Update: 2021-03-08 07:11 GMT

स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्यांपैकी एक अग्रणी म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतो. मात्र, त्यांच्या समकालीन व महात्मा फुलेंनी गौरविलेल्या क्रांतिकारी लेखिका ताराबाई शिंदे यांचं नाव फारसं घेतलं जात नाही. किंबहुना त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नाही. असं दुर्दैवाने म्हणावे लागेल. स्त्री मुक्तीच्या दृष्टीने अत्यंत परखड पण वस्तुनिष्ठ विचार ताराबाईंनी १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या "स्त्री पुरुष तुलना" या निबंधात मांडून त्या काळात मोठी खळबळ उडवून दिली होती.

ताराबाई शिंदे यांनी इंग्रजी राजवटीत स्त्रीयांच्या हक्कांना वाचा फोडली, पुरुषप्रधान संस्कृती विरोधात बंड केले, परखड व टोकदार लेखणीने व्यवस्थेची चिरफाड केली, त्यामूळे त्या स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार मांडणाऱ्या आद्य लेखिका ठरल्या.

आज स्त्री-पुरुष समानतेचा विचार स्त्रियांच्या अनेक चळवळी मोठ्या हिरीरीने मांडत आहेत. मात्र, याचा पाया सुमारे दिडशे वर्षांपूर्वीच ताराबाई ने घालून दिला आहे. स्त्रीमुक्तीच्या संदर्भात अत्यंत पुरोगामी व क्रांतिकारी विचार साहित्यात मांडणाऱ्या त्या काळात ताराबाईंना जागतिक कीर्तीच्या महिला लेखिका म्हणून मान्यता देखील मिळाली होती. सर्वप्रथम पुरुषी अहंकाराच्या विरोधात महिलांच्या अस्तित्वासाठी बंड पुकारणाऱ्या ताराबाई शिंदे यांची आज जागतिक महिला दिनी आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० साली बुलडाणा शहरात झाला. बापूजी हरी शिंदे यांची ताराबाई एकुलती एक मुलगी, बापूजी शिंदे हे महात्मा फुले यांचे समकालीन असून ते सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते होते. बापूजी शिंदे यांना मराठी , इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही भाषांचे चांगले ज्ञान होते. बापूजी शिंदे त्याकाळी डेप्युटी कमिशनर च्या कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरीला होते. ताराबाई शिंदे यांच्यावर लहानपणापासूनच सत्यशोधक विचारांचे संस्कार झाले. सत्यशोधकी ग्रंथ, पुस्तके त्यांना वाचायला मिळायची, त्यांच्या घरी सत्यशोधक कार्यकर्त्यांची ये-जा असल्याने त्यांच्या चर्चा नेहमीच ताराबाई ऐकत होत्या. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बंडखोरी आणि विद्रोह होता. त्यांनी शिक्षण घेतले आणि सहा भाषांवर आपले प्रभुत्व मिळवले. गोषा पद्धती नाकारली, त्याकाळात ताराबाई शिंदे घोड्यावर बसून कोर्ट कचेरीच्या कामात व शेतात जात असत. त्यांचा स्वभाव धाडसी आणि करारी होता.

कुठल्या घटनेने प्रेरित होऊन ताराबाईंनी लिखाण केले... ताराबाईंच्या मनात पुरुषांच्या वर्चस्वाविषयी, त्यांनी स्त्रियांवर सातत्याने आणलेला दबावाविषयी, चीड साचलेली होती, अन्यायाविषयी अहंकार खदखदत होता, आणि या सर्वांची सुरुवात व्हायला एक तत्कालीन निमित्त मिळाले. सुरतच्या एका गुजराती ब्राह्मण कुटुंबातील विजयालक्ष्मी नावाच्या विधवा स्त्रीने केलेली भ्रूण हत्या उघडकीस येऊन तिच्यावर खटला दाखल झाला. तिला प्रथम न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

तिची फाशीची शिक्षा रद्द करावी. यासाठी अनेक ठिकाणांवरून अर्ज करण्यात आले. ही घटना ३० मार्च १८८१ ची आहे. हायकोर्टाने २५ मे रोजी फाशीची शिक्षा रद्द करून विजयालक्ष्मी यांना जन्मठेप दिली. त्यावरही विजयलक्ष्मी व अन्य लोकांनी माफीसाठी अपील केले. न्यायालयाने जन्मठेप रद्द करून पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी संपूर्ण सविस्तर बातमी २६ मे १८८१ च्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली आणि ही संपूर्ण बातमी ताराबाई शिंदे यांनी वाचली. ज्यावेळेला महिलांना शिक्षणाची शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. त्यावेळेला सहा भाषांमध्ये पारंगत असलेल्या ताराबाई शिंदे यांनी इंग्रजी भाषेतील हे वर्तमान पत्र वाचले आणि १८८२ मध्ये ताराबाईंनी "स्त्री-पुरुष तुलना" हा निबंध लिहून प्रकाशित केला.

पुस्तकात विविध हिंदू शास्त्रांची तुलनात्मक मांडणी ताराबाई शिंदे यांनी पारंपारिक पुरुषांच्या धर्मामध्ये असलेली विसंगती विदारक पणे पुढे आणली. केवळ आर्थिक परिस्थितीचा विचार करून वयस्कर पुरूषांना मुलगी देणारे बाप... पत्नीच्या मनाचा काही विचार न करता तिला सवत आणणारे पती... धर्माच्या नावाखाली स्त्रीला आपल्या वर्चस्वाखाली दाबून ठेवणारे पुरुष... या सार्‍यांचा परमार्ष त्या परखडपणे घेतात. सार्वजनिक जीवनात पुरुषांनी उधळलेले नाते त्या धारदार पणे मांडतात.

शास्त्रवेत्ते पुरुष, बुवाबाज, कीर्तनकार, समाज सुधारक या साऱ्यांच्या स्त्री विरोधी मनोवृत्तीचा पान उतारा निसंदिग्ध शब्दात करतात. ताराबाईंनी एक वाक्यता नसलेली हिंदू धर्माची अनेक शास्त्र केवळ स्त्रीच्याच वाट्याला येणारे रुढींचे अनिष्ठ कारक, परिणाम या विरुद्ध आवाज उठवला. पौराणिक कथांची छाननी करून स्त्रियांना लावले जाणारे नियम पुरुषांनाही का लावायची नाहीत..? असे ठामपणे विचारले. स्त्रियांनी काही लिहिणे जेव्हा अपमानास्पद होते. तेव्हा विजेच्या कडकडाटासारखे ताराबाईंचा निबंध होता. त्यावेळी ह्या विचारांची व ताराबाईंच्या निबंधाची पाठराखण करणारे एकमेव पुरुष महात्मा फुले होते.

तारबाईंचे स्मारक व्हावे...!

१९७५ साली चीन देशातील बीजिंग येथे जेव्हा जागतिक महिला परिषद झाली. त्यावेळी एका प्रवेशद्वाराला ताराबाई शिंदे यांचे नाव देण्यात आले. तेव्हा मात्र ताराबाई शिंदे कोण? याबद्दल शोध सुरू झाले. तो पर्यंत मात्र, बहुतेक जणांना ताराबाई माहीतच नव्हत्या आणि आज देखील राज्यातील तर सोडाच. पण बुलडाणा जिल्ह्यातील देखील महिलांना ताराबाई कोण होत्या, त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी कसा लढा दिला? हे माहीत नाही.

त्यामुळे ताराबाई शिंदे यांचे बुलडाणा मध्ये स्मारक व्हावे. अशी मागणी वेळोवेळी स्त्री चळवळीच्या माध्यमातून त्याचबरोबर साहित्यिकांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली. ताराबाई शिंदे यांच्या वडिलांचा असलेला वाडा त्यांच्या वारसदारांनी वाटे करून विकला असून ही जागा शासनाने घ्यावी आणि त्या ठिकाणी ताराबाई चे स्मारक व्हावे. अशी मागणी देखील लावून धरण्यात आली होती.

बुलडाणा शहरातील कारंजा चौक येथील ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, यांनी देखील भेटी दिल्यात आणि ताराबाई शिंदे यांचे स्मारक व्हावे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, अजूनही या स्मारकाच्या बाबतीत कुठेही हालचाली होताना दिसत नाहीत. या ठिकाणी ताराबाई शिंदे यांचे स्मारक झाल्यास त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे समाज घटकातील स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून समाजापुढे येईल आणि महिलांना देखील प्रेरणा मिळेल एवढे निश्चित.

Tags:    

Similar News