तळीये दरडग्रस्तांच्या वाट्याला अजून दुःख आणि संघर्षच...पायाभूत नागरी सेवासुविधांपासून दरडग्रस्त वंचीत
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये हे गाव अतिवृष्टीत दरडीखाली गेले होते. या गावातील ग्रामस्थांना सरकारने तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केलीय. मात्र येथे मूलभूत , पायाभूत नागरी सेवा सुविधांची वानवा आहे. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनरमध्ये उन्हाचे चटके यामुळे आपद्ग्रस्त हैराण असून सध्या तळई या दरडग्रस्त गावावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवले आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट
दरडीमध्ये घर गेली म्हणून शासनाने पत्र्याचे कंटेनर दिले. सद्या या तात्पुरत्या निवाराशेडमध्ये 25 दरडग्रस्त कुटूंब राहत आहेत. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनरमध्ये बसणारे उन्हाचे चटके यामुळे आपद्ग्रस्त हैराण झाले आहेत. शासनाने पाणी आणि पक्की घर द्यावीत अशी मागणी तळीये दरडग्रस्त करीत आहेत.
सकाळी दहा वाजलेपासून उन्ह तापते, त्यामुळे पत्र्याच्या घरात थांबणे त्रासदायक होते, दुपारी तर रखरखत्या उन्हात ही घरे सोडून बाहेर झाडाचा आधार घ्यावा लागतोय. लहान मूल, वृद्धांना हा त्रास सहन देखील होत नसल्याचे ग्रामस्थ महिलांचे म्हणणे आहे. तळीये गावातील पांडे कोंड येथील विहीरीवरून येथील दरडग्रस्ताच्या तात्पुरात्या वसाहतीला शासनाने पाणी पुरवठा केला होता.
ह्या विहीरीचे पाणी पार आटले असुन आता दरडग्रस्तांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्याने कंटेनरवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या देखील फुटू लागल्या आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन पत्र्याच्या कंटेनरमध्ये चटके सहन करता येत नाहीत. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनरमध्ये बसणारे चटके यामुळे तळीये आपद्ग्रस्त हैराण झाले आहेत.