तलाठ्याच्या चुकीमुळे स्मशाभूमीवरून दलित,मुस्लिम समाजात तणाव

गाव खेड्यांच्या विस्तार वेगाने होत असल्याने जागांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. स्मशानभूमीचे सर्वदुर सुरू असताना शिरपूर सो येथे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यामुळे येथे दलित आणि मुस्लिम समाजात तणाव निर्माण झाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;

Update: 2022-08-26 06:26 GMT

मनुष्याच्या मृत्युनंतर त्याच्या शरीरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा भारतीय समाजात आहे. ही प्रथा प्रत्येक जाती,धर्म,पंथात वेगवेगळ्या प्रकारची आहे. मनुष्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची ठिकाणे ही ग्रामीण भागात गावकुसाबाहेर आहेत. तर शहरात वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या दफनभूमी, स्मशानभूमी शहरातच आढळून येतात. भारतीय समाज विविध जाती,धर्मात विभागला असल्याने प्रत्येकाच्या अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मुस्लिम आणि ख्रिचन धर्मात मृतदेह पूरण्याची प्रथा आहे. तर हिंदू आणि इतर जाती,धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो. गावच्या ठिकाणी या स्मशानभूमी प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या असल्याच्या दिसून येतात. गाव खेड्यांच्या विस्तार वेगाने होत असल्याने जागांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याचे चित्र आहे.


गाव खेड्यातील स्मशानभूमीवरून अनेक ठिकाणी सध्या वाद सुरू असून सोलापूर जिल्ह्यातही तो निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील शिरपूर सो येथे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यामुळे येथे दलित आणि मुस्लिम समाजात तणाव निर्माण झाला आहे. 1932 साली इंग्रज सरकारने शिरापुर सो येथील महार समाजाला 'महार वतन जमीन ' कसून खाण्यासाठी दिली आहे. या जमिनीवर संबधित गटातील लोकांची पूर्व परवानगी न घेताच आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताच आदेश नसतात शिरापूर सो गावच्या तलाठ्याने 2005 साली बेकायदेशीररित्या स्मशानभूमीची नोंद महार वतन जमिनीवर केली आहे. तेव्हांपासून या गावातील दलित आणि मुस्लिम समाजात वाद होत असून या दोन समाजामध्ये तलाठ्याच्या एका चुकीमुळे सातत्याने तणाव ग्रस्त वातावरण आहे. शासन,प्रशासनाने हा वाद कायमचा मिटवावा आणि महार वतन जमिनीवरील बेकायदेशीररित्या स्मशानभूमीची केलेली नोंद कमी करून शासनाने मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर भीम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कांबळे यांच्या नेतृत्वालाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.




 


स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही स्मशानभूमीचा प्रश्न काही मिटेना

नुकताच 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे देशभरात आयोजन करण्यात आले होते. देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ग्रामीण भागात हव्या तेवढ्या प्रमाणात सोयी सूविधा उपलब्ध झाल्या नाहीत. आजही रस्ते,पाणी,गटार, लाइट, स्मशानभूमीसाठी ग्रामीण भागातील लोकांना झगडावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आजही स्मशानभूमीवरून गावागावात वाद असल्याचे दिसून येतात. कोठे रस्त्याची अडचण आहे तर कोठे स्मशानभूमीच नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील सोयी सुविधांकडे शासन,प्रशासनाने लक्ष द्यावे,असे नागरिकांना वाटत आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे

शिरपूर सो ता.मोहोळ येथील महार वतन जमीन गट नंबर 122 मध्ये 2005 साली स्मशानभूमी पड म्हणून बेकायदेशीरपणे समस्त महार समाजाची कोणतीही लेखी परवानगी न घेता सदरच्या गट नंबर मध्ये नोंद केली आहे. त्यामुळे शिरापूर सो गावात दलित आणि मुस्लिम समाजात तणाव आहे. ज्यावेळेस मुस्लिम समाजातील एखादा व्यक्ती मयत होतो,त्यावेळेस त्याला स्वतःच्या मालकीच्या जागेत दफन करावे लागते. दफनभूमीच्या कारणावरून दलित आणि मुस्लिम समाजात वाद होत आहेत. गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी शासन,प्रशासनाने मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आणि समस्त महार वतन जमिनीवरील बेकायदेशीरपणे स्मशानभूमीची केलेली नोंद रद्द करावी.




 


1932 साली ब्रिटिशांनी समस्त महार कामगारांना दिली होती जमीन

मॅक्स महाराष्ट्र बोलताना समस्त महार वतन जमिनीचे वहिवाटदार सोजरबाई सर्वगोड यांनी सांगितले,की 1932 साली इंग्रजांनी आम्हाला महार वतन जमिनी कसून खाण्यासाठी दिल्या आहेत. आम्ही गावी नसल्याने याच दरम्यान 2005 साली बेकायदेशीरपणे आमची परवानगी न घेता तलाठ्याने समस्त महार वतन जमिनीवर बेकायदेशीरपणे स्मशानभूमीची नोंद केली. मी गावी नसल्याने संबधित लोकांनी सर्व शेत हावार करून टाकले. त्यामध्ये शेतातील पाइपलाइन फुटल्या गेल्या. शेताला पाणी देण्याच्या टी-सुद्धा तुटल्या गेल्या आहेत. सध्या आम्ही जमीन कसत असून शेती बागायती आहे. त्यामध्ये मकेचे पीक लावण्यात आले आहे. स्मशाभूमीच्या कारणावरून दलित आणि मुस्लिम समाजात सातत्याने वाद होत आहेत. महार वतनी जमिनीवर बेकायदेशीरपणे स्मशानभूमीची केलेली नोंद कमी करून शासनाने मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. गेल्या सात वर्षापासून शासन,प्रशासनाकडे मागणी करत आहे,पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

भीम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कांबळे यांनी आंदोलना विषयी बोलताना सांगितले,की शिरपूर सो येथील समस्त महार कामगार यांना 90 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारने साडे आठ एकर जमीन महार कामगारांना दिली होती. या जमिनीवर विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसीलदार यांचा कोणताही आदेश नसताना तलाठ्याने समस्त महार वतनी जमिनीवर 2005 साली बेकायदेशीरपणे स्मशानभूमी पड अशी 20 गुंठा जमिनीची नोंद केली आहे. त्यावेळेपासून शिरापूर सो येथील दलित आणि मुस्लिम समाजात वाद होत आहेत. शिरापूर गावातील तत्कालीन तलाठ्याने गावची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले आहे. महार वतनी जमिनीवर बेकायदेशीरपणे लावलेली नोंद कमी करून मुस्लिम समाजाला शासनाने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.




जागेच्या चौकशीसाठी कमिटी नेमली असून एक सप्टेंबरला निर्णय देणार - तहसीलदार प्रशांत बेडसे - पाटील

संबधित जागेच्या चौकशीसाठी कमिटी नेमली असून ती शिरापूर गावात जावून जागेची पाहणी करून आवाहाल देणार आहे. त्यावर एक सप्टेंबर रोजी निर्णय घेण्यात येणार आहे.

Full View

Tags:    

Similar News