महिला सक्षमीकरणासाठी `स्विंग टेक्नॉलॉजी`
ग्रामीण भागात कमी शिक्षण झालेल्या महीला मुलींच्या सक्षमीकरणासाठी आयटीआयने स्विंग टेक्नॉलॉजी प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रशिक्षणात गारमेंटच्या क्षेत्रात महिला कतृत्वाची भरारी घेऊ शकतात... प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;
बदलत्या काळानुसार लोकांच्या आवडी निवडी बदलत चाललेल्या आहेत. जगाची आधुनिकतेकडे वाटचाल अत्यंत वेगाने सुरू असून दररोज नव-नवे शोध लागत आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन यंत्रे येत आहेत. अनेक क्षेत्रात नवनवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जात असून जेणेकरून कमी वेळात अधिक उत्पादन घेता येईल. यंत्रामुळे कामगारांवरचा ताण कमी झाला असून पूर्वी एकाच विभागात जास्त मनुष्यबळ लागत होते, तेथे आता यंत्रामुळे कमी मनुष्यबळ लागत आहे. अशाच प्रकारचा बदल गारमेंट,टेलरींच्या क्षेत्रात झाला असून या क्षेत्रात दररोज नवनवीन डिझाईनची कपडे दिसून येतात.
लोकांच्या आवडीनुसार अलीकडच्या काळात कपडे डिझाईन केली जात आहेत. कपड्यांच्या मार्केटमध्ये ही अमुलाग्रह बदल झाला असून लहानापासून थोरा पर्यंतच्या कपड्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. लोकांच्या बदलत्या आवडीनुसार या क्षेत्रातील महिला आणि पुरुषांना आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार सध्या प्रशिक्षण देण्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आयटीआय मध्ये केले जात आहे. येथे स्विंग टेक्नॉलॉजी हा कोर्स शिकवला जात असून तो एक वर्षाचा आहे. यामध्ये बदलत्या काळानुसार प्रशिक्षण देण्याचे काम या कोर्सच्या शिल्प निदेशक शेख मॅडम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस मुले आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत. यातून महिला घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. या कोर्सच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्याचे काम सध्या सुरू असून गारमेंटच्या क्षेत्रात महिला भरारी घेताना दिसत आहेत.
स्विंग टेक्नॉलॉजी या कोर्सला दहावी पास,नापास महिला प्रवेश घेवू शकतात
स्विंग टेक्नॉलॉजी या कोर्सला दहावी पास,नापास महिला,मुली,मुले,पुरुष प्रवेश घेवू शकतात. यासाठी वयाची अट नाही. ग्रामीण भागातील महिलांत शिक्षणाचे प्रमाण कमी असून कोर्स साठी त्या प्रवेश घेवू शकतात. ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षण घेण्याच्या वयातच त्यांची लग्ने होतात. त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाही. कालांतराने या महिलांवर घरची जबाबदारी येते. घर कुटुंब सांभाळावे लागते. त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे अडचणीत असणाऱ्या महिलाना रोजगाराची शोधाशोध करावी लागते. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या महिला आणि मुली दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करताना दिसून येतात. दिवसभर काबाडकष्ट करून दोनशे ते तीनशे रुपयांच्या आसपास त्यांना रोजगार मिळतो. यामध्ये घर खर्च भागवणे सुद्धा मुश्किल होवून जाते. अशातच या महिला काबाडकष्ट करत राहून घर खर्च उचलत राहतात. त्यांना कमी वेळात जास्त पैसे मिळवून देणारा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. शासन विविध प्रकारच्या योजना राबवून महिलाना सक्षम करण्याचे काम करत आहे. पण या योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचल्या नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने महिलाना सक्षम करण्यासाठी शासकीय आयटीआय मध्ये विविध प्रकारचे कोर्सस सुरू केले असून स्विंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
गारमेंटच्या क्षेत्रात कौशल्य असेल तरच कौतुक होते
स्विंग टेक्नॉलॉजी या कोर्स ला प्रवेश घेतलेल्या कोमल काटे या विद्यार्थिनीने सांगितले,की या कोर्सला प्रवेश घेवून एक वर्ष पूर्ण होत आहे. या ठिकाणी शिकायला आल्यानंतर भरपूर काही शिकले. यामध्ये छोट्या मुलांच्या कपड्यांपासून मोठ्या पर्यंतचे कपडे शिवायला शिकले. यात वन पिस,फ्रॉक,बाबासुट यांचा समावेश आहे. छोट्या गारमेंट पासून मोठ्या गारमेंट पर्यंत पूर्ण शिकले आहे. मी घरगुती ब्युटी पार्लर चालवत असून पुढे जावून याच्या जोडीला फॅशन डिझाईन चे इन्स्टिट्युट चालू करून यामध्ये करिअर करायचे आहे. या क्षेत्रात कौशल्य असेल तर कौतुक होते. यात भरपूर काही करण्यासारखे असून जसा जमाना बदलेल त्याप्रमाणे कपड्यांची फॅशन बदलत राहते. त्यामुळे या क्षेत्रात नवनवीन डिझाईन तयार कराव्या लागतात. तरच त्या डिझाईन पुढे चालत राहतात. मार्केटमध्ये विकल्या जातात. या क्षेत्रात लहान मुलांच्या कपड्यांच्या किंमती जास्त जास्त आहेत. या कोर्सला काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागलेल्या महीला ही प्रवेश घेवू शकतात. यामध्ये महिलांनी एक ब्लाऊज शिवला तर कमी वेळात तीनशे ते चारशे रुपये महिला मिळवू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर महिला घरूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
कोर्स मध्ये टाकावू कपड्यांपासून टिकावू कपडे बनवण्याचे काम शिकवले जाते
स्विंग टेक्नॉलॉजी या कोर्स मध्ये महिला आणि मुलीना खराब झालेल्या घरातील साड्या पासून विविध प्रकारचे डिझाईन केलेले ड्रेस बनवण्यास शिकवले जात असून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केले जात आहे. या कोर्स मध्ये बदलत्या काळानुसार कपडे डिझाईन करण्याचे शिकवले जात आहे. श्रद्धा काटे या विद्यार्थिनीने बोलताना सांगतले,की गारमेंट च्या क्षेत्रात दोन हजारा पासून दहा हजारा पर्यंतचे ड्रेस विकले जावू शकतात. या क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसत आहेत. कोणतेही क्षेत्र कमी नसते,आपले स्किल दाखवले तर निश्चितच या मध्ये महिला,मुली,यशस्वी होवू शकतात.
घर सांभाळून महिला स्विंग टेक्नॉलॉजीचा कोर्स पूर्ण करू शकतात
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना या कोर्सच्या शिल्प निदेशक शेख मॅडम सांगितले,की स्विंग टेक्नॉलॉजीचा एक वर्षाचा कोर्स असून यामध्ये शिवणकाम,फॅशन डिझाईन शिकवले जाते. या कोर्सला महीला,मुली,मुले आणि पुरुष प्रवेश घेवू शकतात. कोर्स साठी वयाची अट नाही. घरातील एक महिला शिकली तर पूर्ण घराचे सबलीकरण होते. स्विंग टेक्नॉलॉजी कोर्सच्या माध्यमातून महीला स्वतःचा उदरनिर्वाह चालवू शकतात. ग्रामीण भागातील सर्वच महिला कामाला जावू शकत नाहीत. हा कोर्स करून महिला घर,परिवार,मुले साभाळून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. या कोर्स मधून मुली,मुलांना सरकारी नोकरीत ही स्थान मिळू शकते. सरकारी दवाखाने,आर्मी,नेव्ही,एसटी महामंडळाच्या विभागात नोकरी लागू मिळू शकते. पण यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. या कोर्ससाठी दररोज पाच तास प्रशिक्षण दिले जात असून कागदी पिशव्या बनवण्याचे काम ही शिकवले जात आहे. या पिशव्यात कमी वजनाचे साहित्य घेवून जाता येते. मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल पर्स,पेन्सिल पाऊच तसेच लहान मुलांच्या कपड्यांपासून मोठ्या पर्यंत कपडे शिवण्याचे काम शिकवले जाते. या कोर्सला जास्तीत जास्त महिलांनी प्रवेश घेवून स्वावलंबी बनावे,असे आवाहन शेख मॅडम यांनी केले आहे.