पडद्यामागची कोरोना योद्धा...

सुमन यांच्या सारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून कोरोनाविरोधात खंबीरपणे उभा आहेत,पण त्याचं कधी कौतुक होतं ना कधी त्यांची चर्चा होते.;

Update: 2021-05-15 07:13 GMT

साधी चप्पल आणि डोक्यावर ऊन असताना न थांबता पाच किलोमीटरचा प्रवासानंतर थांबा घेणारी ही पाऊलं आहेत, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील सुमन मोघे यांचे,जे रोज न थकता दहा किलोमीटरचा प्रवास गेल्या पाच वर्षांपासून करतायत.

जेव्हा गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा अनेक पाऊलं रस्यावरून पायी चालत आपल्या गावाकडे जात असल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळाले. मात्र जेव्हा लोकांना आपलं घर जवळ करावं वाटत होतं, तेव्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमन मोघे या आपलं घर सोडून रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करत कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावत होत्या..

औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुमन मोघे ह्या गेल्या पाच वर्षांपासून काम करतायत. रुग्णालयात झाडू मारणे, सफाई करणे, पारशी पुसणे,जमा झालेला कचरा वेचून बाहेर फेकणं हे त्यांचं रोजचं काम.

कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या घराचं अंतर पाच किलोमीटर लांब आहे. त्यामुळे रोज 10 किलोमीटरचा प्रवास, पण त्यातही जाण्या-येण्याची कोणतेही सोय नसल्याने त्यांना हा 10 किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागतो.

त्यामुळे रोजचा प्रवासात जाणार वेळ लक्षात घेत रोज सकाळी लवकर घरातून निघावं लागते. त्यामुळे सुमन ह्या घरचं काम आवरून सकाळी 7 वाजताच घरातून निघतात. रुग्णालय गाठण्यासाठी त्यांना तब्बल एकते दीड तास लागतो. सोबत पाण्याची बॉटल घेऊन निघालेल्या सुमन न थांबता पाच किलोमीटरचा प्रवास पायीच करतात.


बऱ्याच वेळी रस्त्यात गावातील एखादा ओळखीचा व्यक्ती मिळाला तर त्यांना लिफ्ट मिळून जायची, पण कोरोना आल्यापासून भीतीपोटी त्यांना कोणीही लिफ्ट सुद्धा देत नाही. त्यामुळे सुमन यांचा गेल्या दोन वर्षांपासून चा प्रवास पायीच सुरू आहे. तसं सुमन यांना खूप असं भरमसाठ पगारही नाही, मात्र कुटुंबाची परिस्थिती आणि मुलांच भविष्य डोळ्यासमोर असलेल्या सुमन यांचे पाय कधीच थांबले नाही. अनेकदा तर हक्काची सुटीही त्यांना मिळत नाही, पण नोकरीच टिकली पाहिजे म्हणून,त्यांनी कधीच वरिष्ठांना तक्रार केली नाही.

मात्र पायी चालण्याच आपल्याला कधीच दुःख वाटलं नसल्याचं सुमन अभिमानाने सांगतात. कारण आज मी जे काम करतेय त्याचा मला अभिमान असून, सफाई कामगार का होईना पण कोरोनाच्या संकटात देशासाठी काही तरी करण्याची संधी मला मिळत असल्याचा आंनद असल्याचंही सुमन म्हणतात.

पायी यावं लागत असल्याने वेळ जास्त लागतो म्हणून घरून सकाळी 7 वाजताच निघावं लागते, पण याचं कधी दुःख वाटत नाही. आज मला जी सेवा करायला मिळत आहे त्याचा अभिमान वाटत असल्याचं सुमन म्हणतात.


कुटुंबाची जवाबदारी!

सुमन यांना दोन मुली आहेत. लग्न झाल्यानंतर दोन्ही मुलीचं झाल्या म्हणून पतीने सोडून दिले आणि दुसरं लग्न केलं. त्यामुळे दोन्ही मुलींची जबाबदारी सुमन यांच्याकडे आली. त्यात घरात आई वडील यांची ही जबाबदारी सुमन यांच्याकडेच आहे. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी त्यांची नोकरी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

त्यात दोन्ही मुलीचं चांगलं शिक्षण करून त्यांना नोकरी लावण्याचा सुमन यांच स्वप्न आहे. त्यामुळे त्यांची धरपड सुरूच असते. तर रविवारी सुटीच्या दिवशी त्या गावातील एखांद्याच्या शेतात रोजंदारीवर काम करतात.

सुमन यांच्या सारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून कोरोनाविरोधात खंबीरपणे उभा आहेत,पण त्याचं कधी कौतुक होतं ना कधी त्यांची चर्चा होते. मात्र तरीही ते निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहेत.


घरातीलही काम करावं लागतं!

सुमन यांना दोन मुली आहेत, त्या अजून लहान आहेत. त्यात वृद्ध आई-वडील सुद्धा घरात असतात. त्यामुळे त्यांचा स्वयंपाक,कपडे धुणे, घरातील सफाई हे सगळं करण्याची जवाबदारी सुद्धा सुमन यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे सकाळी पहाटेच उठून त्या कामाला लागतात.

घरातील सर्व गोष्टी आवरून, मुलींना जेवू घालून त्या, कामासाठी निघतात. त्यात कामावरून आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा त्यांनाच करावे लागते. त्यामुळे नोकरी बरोबर घरातील जवाबदारी सुमन चांगल्या पद्धतीने पार पाडतात.

कोरोनाची भीती!

सुरवातीला जेव्हा कोरोना आला त्यावेळी मनात मोठी भीती निर्माण झाली होती, असं सुमन सांगतात. त्यात रोज रुग्णालयात सर्दी, खोकला,ताप असलेले रुग्ण येतात. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्या नेहमी संपर्क होतो. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल अशी, भीती वाटायची,असं सुमन म्हणाल्या. पण आता वर्षभराचा वेळ गेला, स्वतःची काळजी घेतली तर कोरोनापासून आपण सुरू राहू शकतो हे आता कळाले असल्याने, कोरोनाची भीती आता राहिली नसल्याचं सुमन म्हणतात.

कुटुंबाची काळजी वाटते!

कोरोनाची मला भीती वाटत नसली तरीही मात्र, आपल्यामुळे एखाद्या दिवशी घरातील लहान मुलांना, वृद्ध आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली तर याची मनात नेहमीच भीती असते. त्यामुळे घरात जाण्यापूर्वी किंवा कुटुंबातील लोकांच्या संपर्कात येण्याआधी अंघोळ करून घेते,असं सुमन म्हणतात. पण भीती मात्र कायम असते असेही त्या म्हणतात.

लहानपणापासून कष्टाळू!

सुमन यांचे आई-वडील सुमन यांच्याबद्दल बोलताना म्हणतात की, सुमन ही लहानपणापासूनच खूप कष्ट करणारी मुलगी आहे. जेव्हा तिला तिच्या पतीने सोडले तेव्हा आम्हाला चिंता वाटत होती, मात्र सुमनने न खचता आपले आयुष्य जगण्याचा निर्धार केला. जरी जगाला ती आमची मुलगी वाटत असली, तरीही आमच्यासाठी ती मुलगाच असल्याचं सुमन यांचे आई-वडील भावुक होऊन सांगतात.


तुटपुंजी पगार!

सुमन गेल्या पाच वर्षांपासून शासकीय रुग्णालयात तुटपुंज्या पगारावर काम करतात. मात्र कुटुंब चालवणे आणि मुलांचं शिक्षणासाठी पगार पुरेसा नसल्याचं सुमन म्हणतात. त्यात आई-वडिलांचा सांभाळ करण्याची जवाबदारी सुध्दा माझ्यावर असल्याने, पगार पुरत नाही. त्यामुळे प्रशासनाने पगार वाढवावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

 'सुमन'चं अभिमान वाटतो!

सुमन काम करत असलेल्या बिडकीन शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सुमन यांच्या कामाचे कौतुक करताना म्हणतात की,सुमन याचं काम खरचं कौतुकास्पद आहे. रोज 10 किलोमीटर पायी चालव लागत असतानाही, सुमन कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचतात. एवढच नाही तर कार्यालयात त्यांच्यामुळे नेहमी स्वच्छ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे सुमन सारखी महिला आमच्या रुग्णालयात कार्यरत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतं,असं वैद्यकीय अधिकारी अंजली देशपांडे म्हणतात.



Full View
Tags:    

Similar News