बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या वर्षी राज्यात अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याप्रमाणेच यंदा पुन्हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होईल का? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे यंदाही पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील का? याविषयीचा मॅक्स महाराष्ट्रचा ग्राऊंड रिपोर्ट;

Update: 2022-10-09 14:55 GMT

गेल्या वर्षी राज्यात अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदाही वेळेत कारखाने चालू झाले नाही तर तसाच अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाने चालू होण्याची शक्यता आहे, असं मत जय भवानी सहकारी साखर कारखाना गेवराईचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी ऊस तसाच पडून राहिला. कारखान्याकडे चकरा मारून मारून कंटाळा आला. कारखान्यावाल्यांनी नुसतं सांगायचे की, आज नेऊ उद्या नेऊ पण वेळेला टोळी आली मग मुकादमाने वेगळेच पैसे मागितले. ऊस तोडणी वाल्यांनी वेगळेच पैसे मागितले. वाहन चालकांनी वेगळेच पैसे मागितले. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे यंदा लवकर कारखाने करण्याची मागणी केली आहे. पण ज्यावेळेस ऊस घेऊन जातील त्यावेळेसच खरं... गेल्यावर्षी सारखं जर टोळी वाल्याने ट्रॅक्टर वाल्यांनी आणि मुकादमानी यांनी जर अडवलं तर ऊसामध्ये काही उरत नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी आहे तो ऊसही मोडून टाकल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे मत मनोहर कळके यांनी व्यक्त केले.

गेल्यावर्षीप्रमाणे यंदा आमची ससेहोलपट होऊ नये, असं मत ऊस उत्पादक शेतकरी असलेले गोरख रांधवण यांनी व्यक्त केलं. तसेच यंदा परतीचा पाऊस संपला की लगेच कारखाने चालू होतील. त्यातच यंदा कारखान्यांनी साखर उत्पादनांची क्षमता वाढवली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नसल्याची ग्वाही गेवराईच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

Tags:    

Similar News