सोलापुरी लाल डाळींबाची यशस्वी लागवड
सोलापूर जिल्ह्यातील डाळींब बागा उध्वस्त होत असताना मोहोळ तालुक्यातील शेतकरी शंकर माळी यांनी सोलापूरी लाल डाळींबाची यशस्वी लागवड केली आहे.एकीकडे डाळींब बागा विविध रोगांमुळे उध्वस्त होत असताना त्यांच्या या नवीन वाणाच्या डाळींब शेतीला महत्त्व आले आहे.त्यांनी चांगल्या प्रकारे बागेची जोपासना केली असून उत्तम फळधारणा झालेली आहे.यातून चांगला आर्थिक नफा मिळेल असा विश्वास शेतकरी शंकर माळी यांनी बोलताना व्यक्त केला, अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;
सोलापूर जिल्ह्यातील डाळींब बागा उध्वस्त होत असताना मोहोळ तालुक्यातील शेतकरी शंकर माळी यांनी सोलापूरी लाल डाळींबाची यशस्वी लागवड केली आहे.एकीकडे डाळींब बागा विविध रोगांमुळे उध्वस्त होत असताना त्यांच्या या नवीन वाणाच्या डाळींब शेतीला महत्त्व आले आहे.त्यांनी चांगल्या प्रकारे बागेची जोपासना केली असून उत्तम फळधारणा झालेली आहे.यातून चांगला आर्थिक नफा मिळेल असा विश्वास शेतकरी शंकर माळी यांनी बोलताना व्यक्त केला, अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...
सांगोला तालुक्याची डाळींब उत्पादक म्हणून ओळख
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याची ओळख डाळींब उत्पादक म्हणून आहे.एके काळी दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख या तालुक्याने डाळींब उत्पादनाच्या माध्यमातून पुसली आहे.या तालुक्यातील डाळींबाची वर्षभरात कोट्यावधीची उलाढाल होते.डाळींबाच्या उत्पादनामुळे या तालुक्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला.येथील डाळींब खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी येत असत.पण गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे डाळींब विकले गेले नव्हते.त्याचा परिणाम शेतीसह शेतकऱ्यांवर झाला आहे.शेतकऱ्याच्या उत्पादन घट झाली असल्याचे सांगण्यात येते.लॉकडाऊनमुळे शेतीमाल शेतातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढले गेले होते.काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती.पण शेतीमाल शेतात पडून राहिल्याने शेतकऱ्यांकडे लोकांची देणी देण्यासाठी पैसे नव्हते.सध्या लॉकडाऊन स्थितील झाल्याने शेतकऱ्याचे जीवन पूर्वपदावर हळूहळू येऊ लागले आहे.त्यांची आर्थिक उलाढाल वाढू लागली आहे.
केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील डाळींब बागांची केली पाहणी
लॉकडाऊनमुळे सांगोला तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकरी पुरता कोलमडला आहे.त्याचे डाळींब बाजारात विकले गेले नसल्याने तेथील शेतकरी अडचणीत आला असल्याने शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळू लागला आहे.तालुक्यातील डाळींब बागांवर पिन होल बोरर, मर रोग ,तेलकट रोग पडल्याने डाळींब बागा उध्वस्त होऊ झाल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने डाळींब बागात पाणी साचून राहिल्याने या बागांवर मर रोग पडला आहे.बागांवर अनेक रासायनिक औषधांची फवारणी केली पण डाळींब बागावरील रोग नियंत्रणात आले नाहीत.त्यामुळे बागा उध्वस्त होत गेल्या.तालुक्यातील अजनाळे गाव डाळींब बागांच्या उत्पादनातून श्रीमंत झाल्याचे सांगण्यात येते.येथील प्रत्येक शेतकऱ्यांकडे चार चाकी गाडी,बंगला आहे.पण डाळींब शेती अडचणीत आली असल्याने बँकांची देणी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे तेथिल शेतकरी सांगतात.बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारकडे अनुदानाची मागणी लावून धरली होती.त्यामुळे या डाळींब बागा कशामुळे उध्वस्त झाल्या आहेत.याची पहाणी करण्यासाठी केंद्रीय संशोधकांचे पथक सांगोला तालुक्यात आले होते.त्यांनी बागांची पहाणी केली पण बागा का उध्वस्त होत व त्यावर काय उपाय योजना कराव्यात याची माहिती दिली नसल्याचे तेथील शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांने सोलापुरी लाल डाळींबाची यशस्वी केली लागवड
सोलापूर जिल्ह्यात गणेश,भगवा या डाळींब वाणाच्या लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याचे दिसते.पण याच्या बागा सध्या अडचणीत आल्या आहेत.त्यामुळे शेतकरी दुसऱ्या डाळींब वाणाच्या शोधत होता.पेनूर येथील शेतकऱ्याने सोलापूर जिल्ह्यातील डाळींब संशोधन केंद्रात नव्याने विकसित केलेल्या सोलापूरी लाल डाळींबाची यशस्वी लागवड केली आहे.या बागेवर आतापर्यंत कोणताही रोग पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी सोलापुरी लाल डाळींबाची चांगली जोपासना केली आहे.त्यांना 10 एकर शेती असून त्यात त्यांनी ऊस व इतर पिकांची लागवड केली आहे.तर सव्वा एकर शेतीत या नव्याने विकसित केलेल्या सोलापूरी लाल वाणाची पहिल्याच वर्षी लागवड केली आहे.त्याला चांगली फळधारणा झाली आहे.त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यात ही या डाळींबाची लागवड केली असल्याचे शेतकरी शंकर माळी यांनी सांगितले.या डाळींबाच्या लागवडीसाठी कमी खर्च आला असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
सेंद्रिय पद्धतीने डाळींबाची केली लागवड
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी शंकर माळी यांनी सांगितले की,सोलापूरी लाल डाळींब सोलापूर येथिल संशोधन केंद्रात विकसित करण्यात आले आहे. या डाळींबाच्या वाणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी मोहिते यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्याकडून 40 रुपयाला एक रोप अशी 530 रोपे आणली.रोपांची लागवड करीत असताना शेणखत टाकले असून सेंद्रिय पद्धतीने डाळींबाची लागवड केली आहे.रोपांची लागवडीसाठी खड्डे खणणे व मजुरीसहित एकूण 45 हजार रुपये खर्च आला आहे.सध्या बाग 18 महिन्याची झाली आहे.बागेचे पहिलेच वर्ष असून सुद्धा चांगली फळधारणा झाली आहे.इतर डाळींब पिकाच्या तुलनेत या सोलापूरी लाल डाळींबाच्या झाडाला जास्त फळे लागली आहेत.या डाळींबाला इतर डाळींबापेक्षा 4 ते 5 रुपयांनी जास्त भाव मिळत आहे.याला चांगली चमक असून याचा रंग पूर्ण लाल आहे.डाळींबाच्या बागाप्रमाणे या झाडांची उंची जास्त आहे.या बागेला ड्रीपने पाणी दिले जात असून त्यातून रासायनिक खते आठ दिवसापासून सोडली जात आहेत.बदलत्या वातावरणाचा काहीही परिणाम या बागेवर झाला नसून त्यावर कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली आहे.पण या बागेच्या फवारणीसाठी 30 ते 40 टक्के खर्च कमी आहे. या डाळींबाचा रंग लाल असून आतील बियांची संख्या एकसारखी आहे.खाण्यासाठी हे डाळींब चवीला गोड आहे.
सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या काळात या लाल डाळींबाचे क्षेत्र वाढेल
सोलापूर येथील डाळींब संशोधन केंद्रातील संशोधक दीनानाथ चौधरी यांनी बोलताना सांगितले की,लाल डाळींबाचा वाण येथील संधोधन केंद्रात 2017 साली विकसित करण्यात आला आहे.या वाणाला विकसित करत असताना मातृ डाळींबात असणारी पोषक तत्वे कमी झाली नाहीत.साधारणपणे नवीन वाण विकसित करत असताना पोषक तत्वे कमी होत असतात पण या सोलापुरी लाल डाळींबाची तत्वे कमी झाली नाही.उलट वाढली आहेत.सध्या या लाल डाळींबाचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात कमी असल्याने याच्यावर रोग कमी प्रमाणात आहेत.याचे क्षेत्र वाढल्यास इतर डाळींबाप्रमाणे याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.मार्केटमध्ये या डाळींबाची आवक कमी असल्याने याला इतर डाळींबाच्या तुलनेत 10 ते 20 रुपये भाव जास्त आहे.भविष्यात या डाळींबाची शेती सोलापूर जिल्ह्यात वाढू शकते.पूर्वीच्या बागा शेतकऱ्यांकडे असल्याने याची लागवड कमी आहे.या लाल डाळींबाच्या झाडांना फळधारणा अतिशय चांगली आहे.गुजरात व इतर राज्यात याची शेती वाढू लागली आहे.या डाळींबाच रंग पूर्ण लाल आहे.येत्या काही दिवसात याची शेती जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. असे संशोधक दीनानाथ चौधरी यांनी सांगितले.