मुलांच्या नावासमोर आईचं नाव लावणारी अंगणवाडी सेविका...
ज्या आईने आपल्याला 9 महिने आपल्या पोटात वागवलं, त्या आईचं नाव आपल्या दाखल्यावर का नसावं? एक नवा दृष्टीकोन देणारा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट;
दैनंदिन जीवनात आईचे महत्त्व वाढविण्यासाठी सिल्ली अंगणवाडी सेविकेने अनोखा उपक्रम राबवला आहे. आपल्या वडिलांसोबत आई चे नाव घेण्याचे लहानपणापासून शिकवण जाते. तशी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिण्याची एक प्रथा प्रचलित आहे. ती म्हणजे अगोदर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि त्यानंतर आपलं आडनाव. मात्र, भंडारा जिल्ह्यात या परंपरेला फाटा देण्यात आला आहे.
समाजामध्ये आईचे महत्त्व वाढविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सिल्ली येथील अंगणवाडी सेविकेने एक नवीन पद्धत सुरू केली आहे. सिल्ली या गावातील विद्यार्थी स्वतःचं पूर्ण नाव सांगताना वडिलांच्या अगोदर आईचे नावसुद्धा सांगतात.
त्यामुळे समाजात आईचे महत्त्व अधिक वाढविण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. या प्रयोगाचं सपुर्ण जिल्ह्यात स्वागत केलं जात आहे.
अगदी पुरातन काळापासून महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी लेखले जायचे. त्याचाच एक भाग म्हणजे मुलांना पूर्ण नाव सांगताना स्वतःचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव एवढंच शिकविले जाते. त्यामुळे फक्त वडिलांचंच नाव समोर यायचं. मुलं लहानाचं मोठं होत असताना आईचं योगदान मोठं असतं. मात्र, आईचं नाव कुठंही येत नाही. जिच्या पोटातून आपण जन्म घेतो आणि जी मुलांची 24 तास काळजी करून त्यांचे संगोपन करते. किंबहुना त्यापेक्षा जास्त मुलांची काळजी करते.
तरीही आधुनिक काळात भारतात महिलांना पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळत नाही. अलिकडच्या काळात गुणपत्रिका आणि टीसीवरही आईचे नाव लिहिण्याचे शासनाने सुरू केले आहे. तरी मुलं नाव सांगताना केवळ वडिलांचा नाव सांगतात. ही प्रथा अजूनही कायम आहे. त्यामुळे ही प्रथा बंद व्हावी आणि वडिलांप्रमाणे आईचे नावही मुलाने सांगावे.
या मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्याच्या सिल्ली या छोट्याशा गावातील अंगणवाडी सेविकाने नवीन प्रकार सुरू केला आहे. बाल मनावर केलेले संस्कार हे प्रदीर्घ काळ टिकतात आणि म्हणून अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या मुलांना अंगणवाडी सेविका छाया क्षीरसागर या सर्व मुलांना पूर्ण नाव शिकविताना स्वतःचे नाव, आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने शिकवितात.
त्यामुळे आता या सिल्ली गावातील मुलांनाही ही सवय झालेली आहे. त्या मुलांना कधीही कोणीही पूर्ण नाव विचारले तर ते स्वतःचं नाव आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव याच पद्धतीने त्यांचे पूर्ण नाव सांगतात.
अंगणवाडीचे अधिकारी जेव्हा अंगणवाडीला भेट देतात आणि या लहान चिमुकल्यांना त्यांचा पूर्ण नाव विचारतात तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. या उपक्रमाची ते ही स्तुती करतात. या शाळेत ज्या पालकांचे पाल्य शिकत आहेत. त्यांनाही या नवीन उपक्रमाची गोडी निर्माण झाल्याने तेही भरभरून या नवीन पद्धतीची स्तुती करीत आहेत.
समाजात सुरू असलेल्या काही जुन्या परंपरांना बंद करून जर अशा पद्धतीच्या नवीन संकल्पना रुजविण्यात आल्या तर त्याचे स्वागतच आहे. वडिलांप्रमाणेच आईचेही नाव प्रत्येक ठिकाणी जर मुल-मुली घेताना दिसले तर हा खऱ्या अर्थाने आईचा, एक महिलेचा आदर होईल.
मुलाचे पालक आरती साखरकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगतात...
माझी मुलगी या ठिकाणी शिकते. अंगणवाडीच्या मॅडम छायाताई क्षिरसागर यांनी वडिलांच्या नावासमोर आईचे नाव घ्यायचे सांगितले. त्यामुळे माझ्या मनाला खूप आनंद झाला. माझ्यासोबत इतरही मुलं आपल्या आईचं असंच नाव घेतील. त्यांच्याही मनाला असंच समाधान मिळेलं. नवीन नवीन उपक्रम तयार करतात. त्यांना शिकवतात. त्यांना चांगलं वळण लावतात. हे पाहूण मला खूप चांगलं वाटतं.
जिल्हा परिषद सदस्य आणि मुलाचे पालक प्रशांत खोबरागडे सांगतात...
सगळ्यात जास्त मुलांना घडवण्यात आईपेक्षा मुलांचा हात असतो. तिला मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. त्याची एक परतफेड असं तर नाही म्हणता येणार. पण या उपक्रमामुळे आईला निश्चित अभिमान वाटावा असा हा उपक्रम अंगणवाडी सेविका छायाताई या ठिकाणी राबवतात. ते खरंच कौतुकास्पद आहे.
जी आई मुलासाठी कष्ट करते तिलाही आपल्या मुलाचा अभिमान वाटावा. आपलं एक नाव होतं. आम्हाला आमच्या गावामध्ये हा उपक्रम सुरु झाला म्हणून गर्व वाटतो.
हा उपक्रम राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका छायाताई यांच्याशी आम्ही या संदर्भात बातचीत केली. त्या सांगतात....
मी या गावात 1995 पासून कार्यरत आहे. नेहमी आईचं नाव आत्तापर्यंत मुलाच्या नावासमोरून वगळलं गेलं. आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवून जन्म देते. मग आईचं नाव बाळाला का नाही. म्हणून मी अंगणवाडीमधील मुलांना जेव्हा मी नाव विचारते. तेव्हा पहिल्यांदा मी मुलाचं नाव, नंतर त्याच्या आईचं नाव आणि शेवटी वडिलांच्या नावानंतर आडनाव घ्यायला लावते.
जेव्हा अंगणवाडीला अधिकारी येतात. तेव्हा माझे मुलं जेव्हा नाव सांगतात. तेव्हा या अधिकाऱ्यांना याचा आनंद होतो. जोपर्यंत मी नोकरीत आहे. तोपर्यंत मी मुलांना असंच शिकवणार आहे. मुलं ज्या आईने आपल्याला पोटात वाढवलं तिचं नाव घेत नाही वडिलांचं नाव घेतात. मला असं वाटलं. मी स्वत: अंगणवाडी सेविका असून मी माझं नाव वगळून टाकलं. म्हणून आपल्या मुलांना आपण आपल्या आईचं नाव शिकवलंच पाहिजे. असं मला वाटलं.
आम्ही मुलांच्या नावाची नोंद करताना देखील आईच्या नावाचा उल्लेख करण्यास सांगतो.
असं अंगणवाडी सेविकेने म्हटलं आहे.
हीच तत्परता शासन स्तरावर दिसून येत नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत वडिलांसोबत आईची देखील पूर्ण माहिती द्यावी लागते. मात्र, सरकारच्या इतर योजनेत अशा पद्धतीने आईची माहिती देण्याची सक्ती नसते.
अलिकडे काही नेते मंडळी देखील आईच्या नावाचा उल्लेख करतात. मध्यंतरी एका आमदाराने गावातील घराला स्रीचं नाव देण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, कागदोपत्री आईचं नाव देण्याची सक्ती केली जात नाही. ती होणं गरजेचं आहे. सध्या सिल्ली गावच्या या उपक्रमाची मोठी चर्चा आहे. हा उपक्रम राज्यस्तरावर राबवण्यात यावा. अशी मागणी या निमित्ताने होत आहे. ज्या आईने आपल्या बाळाला असह्य वेदना सहन करून जन्म दिला तिचं नावं आपण किती दिवस पुढे येऊ देणार नाही.