काय हायवे.. काय गटार..काय रस्ते विद्यार्थ्यांचं ओके नायं..!
राज्यातील सत्ताकारणाचा तिढा अजून मिटलेला नसताना रोज राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे.. राजकीय शेरेबाजी मध्ये झाडी, डोंगर, हाटील ओके सुरू असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काय हायवे.. काय गटार..काय रस्ते विद्यार्थ्यांचं ओके नायं..! असं म्हणण्याची वेळ आली आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट;
रस्ते हे विकासाचे आणि दळण वळणाची महत्वाची साधने मानली जातात. रस्ते चांगले असतील तर वाहतूक जलद होते. तसेच नागरिकांना वेळेवर कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी पोहचता येते. जर रस्तेच चांगल्या प्रकारचे नसतील तर नागरिकांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो.वाहतूक खोळबली जाते. आजारी रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेहता येत नाही. त्यांना वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णाचे प्राण देखील जावू शकतात. अनेक ठिकाणी शासनाने ठेकेदारामार्फत तयार केलेले रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील रस्त्याचा प्रश्न असाच एरणीवर आला असून सोलापूर-पुणे हायवेच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटाराची व्यवस्था केलेली आहे. या गटारातील पाणी मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकातील बाभळगाव रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी पाणी साचून खड्डेमय रस्ता झाला आहे. त्यामुळे नागरिक,विद्यार्थी,व्यवसायिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्या प्रशाला चौकात पावसाळ्यात हायवेवरून वाहून येणारे पाणी हायवेच्या गटारात जाते. पण या ठिकाणी सलग गटार नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. गटारातील पाणी बाभळगाव रस्त्यावर येत असल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासन,प्रशासनाला याबाबतचे निवेदन देवून ही या पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हायवेच्या गटारातून वाहून येणाऱ्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अन्यथा येत्या काळात आंदोलन करू असा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी दिला आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कन्या प्रशाला चौक बनला आहे अपघाती ब्लॅक स्पॉट
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक अपघाताचा ब्लॅक स्पॉट बनला आहे. या ठिकाणावरून मोहोळ शहरात येण्यासाठी बाभळगाव रस्ता असून या रस्त्यावरून नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. हायवे शहराच्या मध्यभागातून गेला असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नागरिकांच्या वसाहती आहेत. याच कन्या प्रशाला चौकात दोन महाविद्यालय असून येथे सातत्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाण पूल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत आहे. पण उड्डाण पुलाची मागणी पूर्ण होताना दिसत नाही. या चौकात शाळकरी मुलांना जीव ही गमवावा लागला आहे. अनेक वाहनधारक रस्ता क्रॉस करत असताना गतप्राण झाले आहेत. याच ठिकाणी पुण्यावरून आंध्र प्रदेशात मृतदेह घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात होऊन चार ते पाच जणांना जीव गमावावा लागला होता. तर सुमारे 14 ते 15 जण जखमी झाले होते. हा अपघाती स्पॉट असतानाही या ठिकाणी शासन,प्रशासन काही उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व्हिस रस्त्यावरील गटारातून रस्त्यावर येतेय पाणी
अपघाताच्या भीतीने अगोदरच जीव मुठीत घेऊन कन्या प्रशाला चौक ओलांडून कुंभारखानी रस्त्याला जावे लागते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कन्या प्रशाला चौकातील सर्विस रस्त्यावरील असलेल्या गटारीतून अस्वच्छ पाणी वाहत असून त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये ते पाणी साठल्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी, पायी जाणाऱ्या नागरिकांना घाण पाण्यातून वाट काढत जाण्याची वेळ आली आहे. याबाबत तात्काळ सावळेश्वर टोल प्लाझाच्या प्रशासनाने लक्ष घालून वाहत असलेले गटारीचे पाणी बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सोलापूर मोहोळ राष्ट्रीय महामार्गावरील कन्या प्रशाला चौका सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. या परिसरात चार शाळा महाविद्यालय आहेत. तसेच जुन्या ढोकबाभुळगाव रस्त्यावरून कुंभारखाणी, गाढवे वस्ती अशा भागातून शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक शहरात येतात. कुंभार खानी कडून कन्या प्रशाला चौकात येणाऱ्या सर्विस रस्त्यालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बांधलेल्या गटारीतून गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे ते पाणी कुंभारखाणीला जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात साठल्यामुळे शाळकरी मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना, दुचाकीस्वरांना घाण पाण्यातून रस्ता काढत येण्याची वेळ आली आहे. या गटारीच्या गहाणपाण्यामुळे परिसरातील नागरिकांना लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना वाड्यावस्त्यावरून सोडण्यासाठी येत असलेले अनेक दुचाकीस्वार या गटारीच्या पाण्यामुळे खड्ड्यात घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तात्काळ सावळेश्वर टोल प्लाझा च्या प्रशासनाने दखल घेऊन गटारीतून वाहत असलेले घाण पाणी बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घाण पाणी बंद करायला सांगतो
या संदर्भात सावळेश्वर टोल प्लाझा च्या पथकाला पाठवून वाहत असलेले घाण पाणी बंद करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगतो असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे समन्वयक अनिल विपत यांनी सांगितले.
अन्यथा आंदोलन करू..
सर्विस रस्त्याजवळच्या गटारीतून गहाण पाणी वाहत येऊन कुंभारखाणीला जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात साठल्यामुळे शाळकरी मुलांना, नागरिकांना त्या घाण पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. याबाबत टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सागर लेंगरे यांनी दिला आहे.