डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या वसतिगृहाची गोष्ट
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.B.R.Ambedkar)यांची १३१ वी जयंती (131th birth aniversary)जगभर साजरी केली जात असताना अस्पृश्य समाजातील वंचित मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सोलापूरच्या थोरल्या राजवाड्यात देशातील पहिल्या वसतीगृहाची मुहुर्तमेढ केली होती. पत्रकार किरण बनसोडेंकडून प्रतिनिधी अशोक कांबळेंनी घेतलेल्या अनमोल ऐतिहासिक आठवणीचा आढावा... MaxMaharashtra चा रिपोर्ट...;
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती सध्या देशासह जगभरात साजरी होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या लॉकडाऊन (covid19) नंतर पहिलीच जयंती साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात असतात. याच निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहरात केलेल्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक तसेच इतर कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक पत्रकार किरण बनसोडे यांच्याकडून केला जात आहे. सोलापूर शहरात अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात होता. अस्पृश्य समाजात जागृती करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूर शहरात आले होते. त्यांनी अस्पृश्य समाजातील मुले शिकावी म्हणून 1925 साली आताच्या मिलिंद नगर आणि पूर्वीच्या थोरल्या राजवाड्यात देशातील पहिल्या वसतिगृहाची मुहर्तमेढ सोलापुरात रोवल्याची माहिती पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली. किरण बनसोडे गेल्या 20 वर्षांपासून सोलापूर शहरात पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या कार्यावर वृत्तपत्रातून विस्तृत असे लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा ...
देशातील पहिल्या वसतिगृहाची 1 जानेवारी 1925 रोजी सोलापूरात शहरात सुरुवात
सोलापूर शहर व जिल्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने अनेकवेळा क्रांती प्रवण झाला आहे. किंबहुना ही क्रांती भूमी आहे असे म्हणायला वावगे ठरू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक वेळा आले होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापूरात रोवली आणि याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच अभिमानाने करत असत. 1 जानेवारी 1925 हा दिवस सोलापूरसाठी एक भूषणावह व क्रांतीकारी दिवस होता. कारण 1 जानेवारी 1925 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहरात सध्याचे मिलिंद नगर आणि तत्कालीन थोरला राजवाडा याठिकाणी बहिष्कृत, वंचित,अनाथ मुलांसाठी देशातील पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले होते. वसतिगृह बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सुरू करण्यात आले होते. या सभेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन अस्पृश्य, वंचित,उपेक्षित समाजात शैक्षणिक जनजागृती करण्याच्या संदर्भात उपक्रम हाती घेण्यासाठी या सभेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करण्यात आले होते आणि त्यातील पहिले वसतिगृह सोलापूरला मिळाले होते. त्याचबरोबर वाचनालय सुरू करणे,शैक्षणिक जनजागृती करणे,अंधश्रद्धा, कर्मठ रुढीपरंपरा यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली होती.
वसतिगृहाला नगरपालिकेकडून वर्षाला 400 रुपये अनुदान देण्यात येत होते
सुरुवातीच्या 1925 आणि 1926 या दोन वर्षात सोलापूर नगरपालिकेच्या वतीने दर वर्षाला वसतिगृहासाठी 400 रुपये अनुदान देण्यात येत होते. लोकवर्गणी आणि देणग्यांची वसतिगृह चालवण्यासाठी मदत होत होती. दरम्यानच्या काळात गैरसमज आणि इतर कारणास्तव नगरपालिकेने अनुदान देणे अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे वसतिगृह चालवण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही चुकीचे आरोप केले जात होते. ते खोडून काढण्यात वसतिगृहाच्या प्रशासकीय यंत्रणेला यश आले. वास्तविक पाहता हे वसतिगृह प्रामाणिकपणे आणि नेटके नियोजन करून चोख हिशोब ठेवून चालवले जात होते. परंतु सोलापूर शहरात त्याकाळात एक धार्मिक वाद निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव ठेवला की, तत्कालीन अस्पृश्य समाजाने आम्हाला पाठींबा द्यावा. परंतु येथील अस्पृश्य समाजातील प्रतिनिधीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाशी या संदर्भात संपर्क साधला. त्यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वादात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि मग त्याप्रमाणे स्थानिक बांधवांनी भूमिका घेतली. त्याचा परिणाम नकळतपणे वसतीगृहाला मिळणाऱ्या अनुदानावर झाला असावा असे म्हटले जाते.
नगर पालिकेच्या वतीने वस्तीगृहाच्या तपासणीसाठी कमिटी नेमण्यात आली होती
या वस्तीगृहाच्या तपासणीसाठी नगर पालिकेने एक कमिटी नेमण्यात आली होती. या कमिटीने वस्तीगृहाचे प्रशासन, खर्च,व्यवस्था अत्यंत चोक आणि पारदर्शक असल्याचा अहवाल तत्कालीन नगर पालिकेला दिला. तरीही नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. विनायकराव मुळे यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण मंडळाच्या कमिटीने या संदर्भात तपासणी केली. तेथे ही काही त्रुटी आढळल्या नाहीत. चोख व्यवहार आढळला तरीही गैरसमज दूर झाला नाही. अखेर नगर पालिकेच्या ठरावाच्या माध्यमातून अनुदान सुरू करण्याचे मान्य करण्यात आले आणि अनुदान पूर्ववत सुरू झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगराध्यक्ष डॉ.मुळे यांचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले
त्यावेळेस नगराध्यक्ष डॉ. मुळे यांचा गैरसमज जरी झाला असला तरी नंतरच्या काळात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनंतर दोघात देशभरातील अस्पृश्य समाजातील तत्कालीन उपेक्षित घटकांच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची चर्चा झाली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगराध्यक्ष मुळे यांच्यात ऋणानूबंध अधिक दृढ झाले. त्यांचे गैरसमज दूर झाले. दोघांची मैत्री अधिक समृद्ध झाली आणि त्यानंतर डॉ.मुळे यांनी वस्तीगृहाला मदत केली. इतकेच नाही तर सध्याच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या बाजूला मोठी जमीन घेऊन तेथे नव्याने वस्तीगृह सुरू करण्यात आले. याही ठिकाणी डॉ. मुळे यांनी भरभरून मदत केली.
थोरला राजवाडा येथील वस्तीगृहात 15 ते 20 मुले होती राहायला
या वस्तीगृहाचे व्यवस्थापक जिवाप्पा ऐदाळे होते. यांनी वस्तीगृहाचे अनुदान जरी बंद झाले तरीही इतर माध्यमातून लोकांच्या सहकार्याने वस्तीगृह नेटकेपणाने चालवले. तत्कालीन त्या वसतिगृहात 15 ते 20 विद्यार्थी रहायला होते. यामध्ये चर्मकार, मातंग,मेहतर,महार या अस्पृश्य वर्गातील मुलांचा समावेश होता. अशा पद्धतीने तत्कालीन अस्पृश्य समाजाचे अनेक विद्यार्थी रहायला आले. जिवाप्पा ऐदाळे यांच्यानंतर या वस्तीगृहाचा कारभार हरिभाऊ तोरणे गुरुजी आणि उध्दव धोंडो शिवशरण यांनी सांभाळला आणि वस्तीगृह शेवटपर्यंत पारदर्शकपणे चालवले. या वसतिगृहाचे ऑडीट, हिशोब तत्कालीन सोलापूर मधील स्थानिक वृत्तपत्र असलेल्या 'सोलापूर समाचार' या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जळगावच्या विद्यार्थ्यांला प्रवासासाठी 6 रुपये देऊन वसतिगृहात केले होते दाखल
जळगाव येथील डी.जी. जाधव नावाच्या विद्यार्थ्यांला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवासासाठी 6 रुपये देऊन सोलापूरला पाठविले होते. सोलापूरच्या वसतिगृहात प्रवेश मिळून त्या विद्यार्थ्यांने पुढील शिक्षण घेतले होते. अस्पृश्य वर्गातील दुरदूरचे विद्यार्थी या वसतिगृहात रहायला आले होते. या वसतिगृहाच्या माध्यमातून 1925 च्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊन क्रांतीची बीजे रोवत होती.