भिकारी, मनोरुग्णांचा आधार रवींद्र बिरारी!
सार्वजनिक ठिकाणी दिसणारे भिकारी, मनोरुग्ण यांना आपण सर्रास दुर्लक्षित करतो. ते दिसले की त्यांच्यापासून चार हाताचं अंतर राखून चालतो. अशा गरजू लोकांची सेवा करणारा अवलिया म्हणजे सोशल बार्बर रवींद्र बिरारी.... ;
रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणारे भिकारी, मनोरुग्ण हे तसे कुणाच्याही खिजगणतीत नसतात...त्यांचे अस्तित्वच लोकांना माहित नसले असे म्हटले तरी चालेल....पण समाजाने नाकारलेल्या या लोकांना आपुलकीने जवळ घेणारा सोशल बार्बर सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे.... रविंद्र बिरारी... कुणीही आपलं नसलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेत रविंद्र बिरारी हे अनोखी समाजसेवा करत आहेत.
रवींद्र बिरारी यांचे मुंबईतील भांडुपमध्ये स्वतःचं सलुन आहे. आठवड्यातील सहा दिवस पोटासाठी काम केल्यानंतर ते एक दिवस सलून बंद ठेवतात आणि तो दिवस समाजकार्यसाठी देतात... त्यांचा तो दिवस सुरू होतो कल्याण, ठाणे, घाटकोपर, महालक्ष्मी या उपनगरांमध्ये....इथं असलेल्या गरीब, अनाथ लोकांची मोफत दाढी-कटिंग करण्याची सेवा ते देतात.
पण हे सगळं ज्यांच्यासाठी करत आहेत ती लोकं सहजासहजी तयार होतातच असं नाही. बऱ्याचदा त्यांना या लोकांकडून त्रास देखील सहन करावा लागतो. अनेकदा त्यांना अशा मनोरुग्णांकडून नाहक मार देखील खावा लागला आहे. त्यांना खाऊच, पैशाचं आमिष देऊन त्यांचे केस आणि दाढी कापावी लागली आहे.
कोरोनामुळे ग्लोव्हजचा वापर अशा कामांसाठी सगळेच करतात, पण रवींद्र बिरारी यांना मात्र हे काम करताना जीवावर बेतले म्हणून तेव्हापासून ते ग्लोव्हज वापरतात. अशाच एका व्यक्तीचे केस कापताना त्या व्यक्तीच्या केसांमधील जंतुंचा रवींद्र यांना त्रास झाला. पुढचा काही काळ ते आजारी होते. यानंतर त्यांनी धडा घेत ही सेवा करताना हातात ग्लोव्हज घालण्यास सुरुवात केली. जास्तीत जास्त सेवा करायची असेल तर आरोग्य देखील जपायला हव असं ते म्हणतात.
रविंद्र बिरारी यांच्या या कामाची अनेक सेलिब्रिटींनीही दखल घेतली आहे. दिवंगत सिंधूताई सपकाळ यांनीही बिरारी यांना खास संदेशच पाठवला होता. रवींद्र तूनिर्त असलेलं काम हे फार मोठं आहे. आणि हे काम करताना तुझ्या मार्गात अनेक काटे येतील ते पार करतच तुला पुढे चालायचं आहे. तुझ्या या बहुमूल्य कार्याला माईच्या शुभेच्छा! असा संदेश कोरोना काळात सिंधूताईंनी रवींद्र बिरारी यांना पाठवला होता.
सध्या या वाढत्या महागाईच्या काळात देखील गरजवंतांना अशी सेवा मोफत पुरवण्याचे कार्य रवींद्र करत आहेत...आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवसाची सुट्टी आरामात घालवण्याऐवजी त्या दिवसात किमान १० जणांची सेवा करण्याचा ध्यास रविंद्र यांनी घेतला आहे. या कार्यामुळेच त्यांना आज सोशल बार्बर अशी नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या अमुल्य कार्याला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम !