राज्यात मुद्रांक घोटाळा, २ घोटाळ्यांमुळे राज्य हादरले
तेलगी मुद्रांक घोटाळ्या प्रमाणे दोन घोटाळे सध्या राज्यात बाहेर आल्याने यंत्रणा हादरली आहे आणि एवढेच नाही तर असे प्रकार रोखण्यात सरकारही अपयशी ठरत आहे.
बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथील बहुचर्चित बनावट मुद्रांक, शिक्के, यासह इतर खोटे दस्तऐवज करून 1 कोटी 64 लाख रुपयांचा भूखंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रदीप राठी याला अखेर बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील तेलगी समजला जाणारा प्रदीप राठी याने घरीच बनावट मुद्रांक, विविध अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के, इतर दस्तावेज व स्वाक्षरी करून खोटे खरेदी खत करत लवलेश सोनी यांच्या मृत्यूनंतर 2007 ते 2021 दरम्यान त्यांच्या मालकीचे 14 प्लॉट परस्पर विकले होते. ही बाब लक्षात येताच लवलेश सोनी यांच्या पत्नीने सर्व मूळ कागदपत्रांसह खामगाव शहर पोलीस ठाण्यात प्रदीप राठी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
1 कोटी 64 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल करत प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. मात्र आरोपी प्रदीप राठी हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. दरम्यान त्याने खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालय व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील त्याचा अंतरिम जामीन फेटाळला होता. या आरोपीचा पोलीस शोध घेत असताना, हा आरोपी अकोला येथे नातेवाईकांच्या घरी लपलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्याला अकोला येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. बुलडाणा येथे त्याची कोविड चाचणी करत त्याला अटक केली आहे, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर पोलीस तपासात 1 कोटी 64 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रदीप राठी यांनी सेशन कोर्ट आणि हायकोर्टात जामिनासाठी अर्ज पण कोर्टाने हे अर्ज फेटाळले होते. त्यामुळे राठी फरार होता, पण आम्ही त्याला अकोल्यातून शोधून ताब्यात घेतले आहे अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी डी. एन. अंभोरे यांनी दिली.
कसा झाला घोटाळा?
लवलेश सोनी यांचा स्थावर मालमत्ता खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी 14 डिसेंबर 2000 रोजी वल्लभदास राठी यांच्याकडून खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा शिवारातील गट नंबर 24 मधील दहा प्लॉट विकत घेतले होते. पण 2007 साली लवलेश सोनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2007 ते 2021 दरम्यान प्रदीप राठी याने लवलेश सोनी यांच्या नावे असलेले 14 प्लॉट परस्पर आपल्या नावे केले. ज्यामध्ये प्रदीप राठी यांनी आपल्या घरीच बनावट मुद्रांक तयार केले, अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तयार करून स्वतः अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केल्या आणि या दस्तवेजांच्या आधारे अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करत बनावट खरेदी खत नोंदवून घेतले, आणि हे सर्व 1 कोटी 64 लाख रुपयांचे प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आले. लवलेश सोनी यांच्या मृत्यूनंतर 2021 मध्ये त्यांच्या पत्नीने प्लॉट संदर्भात चौकशी केली असता हे सर्व प्लॉट प्रदीप राठी यांनी बनावट दस्तवेज तयार करून परस्पर नावावर केल्याचे समोर आले. त्यावरून 25 जानेवारी रोजी लवलेश सोनी यांच्या पत्नीने खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण मूळ कागदपत्रे देऊन तक्रार दाखल केली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आणि पोलिसांनी चौकशी करून राठीने दिलेले दस्तवेवज बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यात इतरही ठिकाणी मुद्रांक घोटाळा
नाशिक जिल्ह्यात उघड झालेल्या अब्दुल करीम तेलगी याच्या मुद्रांक घोटाळ्याने संपूर्ण देश हादरला होता. हे प्रकरण आता विस्मृतीत गेले असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा असाच घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिववेशनात केला. भास्कर निकम हा शेतकरी त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणीसाठी गेले. त्यावेळी त्यांची जमीन विकली गेल्याचं त्याना लक्षात आले. एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्पवर ही विक्री करण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर भास्कर निकम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासात स्टॅम्प विक्रेते, दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालयात परिचय असलेल्या स्टॅम्प विक्रेत्यांनी हा घोटाळा केल्याचं स्पष्ट धालं. अनेक वर्षांपासून कोणताही व्यवहार, नोंद नसलेल्या जमिनीची माहिती स्टॅम्प वेंडर तलाठी कार्यालयातून मिळवायचा आणि बनावट शिक्के आणि बनावट स्टॅम्प वापर करुन खोटे खरेदीखत तयार करायचा आणि त्याची झेरॉक्स प्रत देऊन नोंदणीही करुन घ्यायचा. काही दिवसांत या जमिनीचा उतारा घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयात याच जमिनीची विक्रीही केली जायची.
हाच मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला होता. गोटू वाघ नावाच्या दुय्यम निबंधकाने घोटळा केल्याचा आरोप त्यांनी केला. याची चौकशी करुन तपासीच मागणी त्यांनी केली होती.
एकूण अधिवेशनात एका घोटाळ्याचा आरोप झाला तर बुलडाण्यात राठी याने केलेला घोटाळाही उघड झाला आहे. पण अधिवेशनात एवढा गंभीर आरोप झाल्यानंतरही सरकारी पातळीवर याची कितपत दखल घेतली गेली ते समजू शकलेले नाही, कारण गृहमंत्र्यांनी यावर काहीही उत्तर दिले नाही. दुसरीकडे तेलगी घोटाळ्याचा इतिहास ताजा असताना राज्यात असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. यावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होतना दिसत नाही. स्टँप विक्रेते एकट्याने असे घोटाळे करण्याची शक्यता कमीच आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची मदत असल्य़ाशिवाय असे घोटाळे शक्यत नाही हे तेलगी प्रकरणातून दिसून आले आहे.
एवढ्या प्रमाणात बनावट दस्तावेज, बनावट मुद्रांकांचे प्रकार वारंवार समोर येत असले तरी अजूनही यावर ठोस कारवाई होत नाही आणि कायम स्वरुपी उपाययोजनाही केल्या जात नाहीत. नाशिकमधल्या घोटाळ्याची व्याप्ती किती आहे तपासातून सिद्ध होईलच. पण लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. याचाच फायदा हा नोंदणीकृत स्टॅम्प वेंडर्सनीं उचलला असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
आतापर्यंत भास्कर निकम या एकड्या व्यक्तीने फवणुकीची तक्रार केली आहे. पण असे अनेक लोक असण्याची शक्यता असल्याने घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. त्यामुळ घोटाळे करणाऱ्यांवर कडक कारवाई तर झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर भविष्यात असे प्रकार होऊच नयेत यासाठी सरकारला धोरण तयार करण्याची गरज आहे.