एसटी चालकावर म्हशी भादरण्याची वेळ
तीन महिन्यांच्या संपानंतरही राज्यातील एसटी कामगारांचा संप शासकीय विलिनिकरणासाठी सुरु आहे. या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली असून पडेल ते कामाबरोबरच एका कर्मचाऱ्यांवर म्हशी भादरण्याची वेळ आली आहे, अशोक कांबळेंचा रिपोर्ट ..;
एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे.यासाठी गेल्या तीन महिन्यापासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. या संपत राज्यातील एसटी कामगार सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने संपात सहभागी झालेल्या कामगारांना कामावर हजर राहण्याच्या सूचना देऊन पगार वाढवण्याची घोषणा केली.परंतु एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे. या मागणीवर एसटी कामगार ठाम आहेत.यासाठी एसटी कामगारांचा न्यायालयीन लढा ही सुरू आहे.
एसटी कामगारांच्या वतीने ऍड.गुणरत्न सदावर्ते कामगारांची बाजू न्यायालयात मांडत आहेत.एसटी महामंडळाचा पगार कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी परवडत नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेक एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या असल्याचे सांगितले जात आहे.एसटी कामगारांच्या म्हणण्यानुसार आम्ही संपात सहभागी नसून आमच्या कामगारांनी केलेल्या आत्महत्यांच्या दुखवट्यात सहभागी झालो आहोत.त्यामुळे आम्ही कामावर जात नाही.एसटी कामगार कामावर येत नसल्याचे पाहून सरकारने कंत्राटी कामगारांची भरती सुरू केली आहे.त्यांच्या माध्यमातून एसटी वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.परंतु तो तेवढ्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येत आहे.आणखीन ही ग्रामीण भागातील एसटी वाहतूक सुरळीत झालेली नाही.
एसटी कर्मचाऱ्याचा गेल्या तीन महिन्यांपासून संप सुरूच
एसटी कामगारांचा गेल्या तीन महिन्यापासून संप सुरू असल्याने त्यांना पगार मिळालेला नाही.त्यामुळे एसटी कामगारांची कुटुंबे आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. काही दिवसांपूर्वी एसटी कामगाराच्या मुलाने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते.त्यामुलाने वडिलांकडे पैशाची मागणी करुन देखील वडील मुलाला पैसे देऊ शकले नव्हते.त्यामुळे मुलाने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते.ही घटना जिल्ह्यातील कोंडी या गावात उघडकीस आली होती.या घटनेवरून एसटी कामगारांची कुटंब मोठया प्रमाणात आर्थिक टंचाईला सामोरे जात असल्याचे दिसून येते.या आर्थिक अडचणीतून आपल्या कुटूंबाला बाहेर काढण्यासाठी राज्यातील एसटी कामगारांनी हाताला मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली आहे.गेल्या तीन महिन्यापासून एसटी कामगार कामावर गेले नाहीत.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे.या मागणीवर कामगार ठाम आहेत.एसटी कामगारांच्या म्हणण्यानुसार त्यांना कमी पगार मिळत असून तेवढ्या पगारात कुटुंबाच्या गरजा भागत नाहीत.त्यामुळे शासनाने लवकरात-लवकर विलीनीकरणाची घोषणा करावी.असे एसटी कर्मचाऱ्यांना वाटते.
कुटूंबाच्या उदरनिर्वाहसाठी एसटी कामगार करतोय म्हशी भादरण्याचे काम
एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने अनेक कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सोलापूर एसटी आगारात एसटी चालक या पदावर कार्यरत असणारे सोमनाथ अवताडे यांनी कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चक्क गावात म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.एक म्हैस भादरण्यास सोमनाथ अवताडे 150 रुपये घेतात.तसा अवताडे यांचा म्हशी भादरण्याचा पारंपरिक व्यवसाय नाही.परस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्यांनी हा धंदा सुरू केला आहे.या मिळालेल्या पैशातून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह चावतात.सोमनाथ अवताडे यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुली आहेत. एक भाऊ,आई-वडील यांचा ते सांभाळ करीत आहेत. त्यांना वडिलोपार्जित 3 एकर शेती आहे. पण त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत नसल्याचे ते सांगतात.त्यामुळे हाताला मिळेल ते काम करत आहे. त्याच्यातून दिवसाला 400 ते 500 रुपये रोजगार त्यांना मिळत आहे. सोमनाथ यांचे गाव मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक आहे. याच गावात त्यांनी म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.
दुसऱ्याच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून जातो कामाला
एसटी कामगारांचा दुखवटा सुरू असल्याने त्यामध्ये सहभागी झालो आहे. हाताला काम नसल्याने मिळेल ते काम करीत आहे.कधी द्राक्षांच्या बागते तर कधी दुसऱ्याच्या वाहनांवर बदली ड्रायवर म्हणून कामाला जात आहे.त्यातून काही पैसे मिळतात.त्याचा उपयोग कुटूंबासाठी करतो.कुटूंबाला आर्थिक अडचणीला सामोरे जाऊ लागू नये.यासाठी विहीर फोडण्याचे काम देखील करीत आहे.दुखवट्यात असूनही कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी काम करीत आहे. शासनाने एसटी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून लवकरात-लवकर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे व कामगारांना न्याय द्यावा असे सोमनाथ अवताडे यांना वाटते.
शासनाने एसटी महामंडळाचे लवकरात-लवकर करावे विलीनीकरण
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सोमनाथ अवताडे यांनी सांगितले की,आमचा गेल्या तीन महिन्यापासून संप सुरू आहे. एसटीच्या विलिनीकरणावर आम्ही ठाम असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ती कामे करत आहे. कधी म्हशी भादरण्याचे तर कधी दुसऱ्याचा शेतात शेतमजूर म्हणून कामाला जात आहे.ड्रायव्हिंग येत असल्याने कधी-कधी दुसऱ्याच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून कामाला जातो. त्यातून एका खेपेला 3 ते 4 दिवसात 4 ते 5 हजार रुपये मिळतात.बदली ड्रायव्हर म्हणून कामाला गेल्यानंतर चेन्नई,बेंगलोर,तामिळनाडू,महाराष्ट्र या राज्यात गाडी घेऊन जातो.तेथून गावात आलो की,हाताला मिळेोल ते काम करतो. शासनाने एसटी महामंडळाचे लवकरात-लवकर विलीनीकरण करावे व कामगारांना न्याय द्यावा असे सोमनाथ अवताडे यांना वाटते.