जिल्ह्याच्या मध्यवर्ती एसटी स्थानकाची जागेअभावी कोंडी

Update: 2022-03-20 11:54 GMT

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या मोहोळ शहरातील एसटी स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर आला असून एसटी स्थानकाच्या दोन्ही बाजूनी हायवे रोड गेल्याने एसटी स्थानकाची जागेअभावी कोंडी झाली आहे. काही वर्षांपूर्वी पुणे-सोलापूर हायवेच्या चौपदरीकरणावेळी मोहोळ एसटी स्थानकाची जागा भूसंपादीत करण्यात आली होती. राहिलेल्या अपुऱ्या जागेत एसटी स्थानकाचे कामकाज कसेबसे सुरू होते,पण मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गासाठी पुन्हा मोहोळ एसटी स्थानकाची जागा संपादित करण्यात आल्याने मोहोळ एसटी स्थानक अपुऱ्या जागेच्या कचाट्यात सापडले आहे. या एसटी स्थानकातून दिवसभरात 300 एसटी गाड्याची ये-जा असते. अपुऱ्या जागेमुळे एसटी गाड्या मोहोळ स्थानकात थांबण्यास व वळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसापासून मोहोळ एसटी स्थानकाचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचा आरोप प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे. अपुऱ्या जागेअभावी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागेचा प्रश्न लवकर नाही सुटल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रवाशी वर्गातून देण्यात येऊ लागला आहे. या एसटी स्थानकात एसटी गाडी घेऊन येत असताना किंवा जाताना एसटी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एसटी स्थानकासाठी पर्यायी जागा लवकर उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी जनतेत जोर धरू लागली आहे.

सोलापूर-पुणे , मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी महामार्गासाठी एसटी स्थानकाची जागा करण्यात आली संपादित

या एसटी स्थानकाच्या समोरून सोलापूर-पुणे व बाजूने गेलेल्या मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गासाठी मोहोळ एसटी स्थानकाची जागा संपादित करण्यात आली आहे. जागेची कोंडी झाल्याने एसटी चालक व प्रवाशांना अडचणीतून मार्ग काढत एसटी स्थानकात यावे लागते. मोहोळ एसटी स्थानकाच्या समोर सोलापूर-पुणे हायवेवर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. याच उड्डाण पुलाखालून कर्नाटकातील विजापूर येथे जाण्या-येण्यासाठी महामार्ग आहे. या मार्गावरून सतत अवजड वाहनांची रेलचेल असते. उड्डाण पूल बनवला असल्याने पुण्यावरून येणाऱ्या एसटी गाड्या वळसा घालून एसटी स्थानकात येतात. तर विजापूर रस्त्यावरून येणारी वाहने ब्रिजच्या बाजूने बनवलेल्या रस्त्याने एसटी स्थानकाच्या सर्व्हिस रस्त्याने जातात. याच ब्रिजच्या खालून पंढरपूर-आळंदीला जाण्यासाठी पालखी महामार्ग बनवला जात आहे. या रस्त्याचे काम सध्या प्रगीपथावर आहे. हा रस्ता एसटी स्थानकाच्या अगदी चिटकून गेला आहे. त्यामुळे एसटी गाड्या वळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एसटी स्थानकाच्या परिसरात खाण्या-पिण्याचे स्टॉल आहेत. या स्टॉल धारकानी ही एसटी स्थानकाची जागा व्यापली आहे.

मोहोळ- आळंदी पालखी मार्गाच्या चौपदीकरणामुळे मोहोळ बसस्थानक बनले बसस्टॉप

मोहोळ-पंढरपूर,मुंबई-हैद्राबाद असे दोन राष्ट्रीय महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजुने गेल्यामुळे मोहोळ शहरातील बसस्थानक अत्यंत मोजक्या जागेत राहिले असून इतर प्रशस्त अशा ठिकाणी बसस्थानक स्थलांतरित व्हावे,या मागणीसाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची येथील कै. शहाजीराव पाटील बहुउद्देशीय सभागृह येथे मोहोळ तालुका पत्रकार संघाच्यवतीने बैठक पार पडली होती. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग व  मोहोळ- आळंदी पालखी मार्गाच्या चौपदीकरणामुळे मोहोळ बसस्थानक हे आता फक्त बसस्टॉफच राहीले आहे. मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या बसस्थानकात प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते. तसेच शहरात ५ ते ६ शाळांचे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येतात. याच ठिकाणाहुन हजारो भाविक विविध तिर्थक्षेत्रासाठी ये-जा करीत असतात. या बसस्थानकातूनच लांब व जवळ पल्ल्याच्या अंदाजे 300 गाड्या ये-जा करतात. तालुक्यात मुक्कामाला जाणाऱ्या गाड्यांची संख्याही २० च्या जवळपास आहे. प्रवाशांची व वाहनांची कमी जागेमुळे मोठी अडचण होत असून सदरचे बसस्थानक प्रशस्त जागेत स्थलांतरित करावे,अशी मागणी नागरिकांची आहे.

आंध्र प्रदेश,गोवा,कर्नाटक,सोलापूर पुणे,मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,उस्मानाबाद,तुळजापूर,लातूर,परभणीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी गाड्या याच स्थानकातून जातात

मोहोळ एसटी स्थानक एसटी गाड्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. येथूनच गोवा,कर्नाटक, आंध्र प्रदेश, या राज्यातील एसटी बसेसची ये-जा असते. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यात याच एसटी स्थानकातून गाड्या जातात. कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मालवण,रायगड याठिकाणी येथूनच एसटी गाड्या जातात. नाशिक,अहमदनगर,शिर्डी येथे जाणाऱ्या गाड्यासाठी मोहोळ एसटी स्थानक महत्वाचे आहे. याच स्थानकातून मराठवाड्यातील उस्मानाबाद,तुळजापूर, लातूर,बीड,परभणी,नांदेड, येथे एसटी जातात. मोहोळ एसटी स्थानक जिल्ह्याच्या मध्यवर्ती असल्याने याठिकाणावरून सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात वाहतूक होते. येथूनच जिल्ह्यातील अकलूज,माळशिरस,बार्शी,वैराग,अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डुवाडी,करमाळा याठिकाणी एसटी वाहतूक होते. तसेच मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडेगावातील एसटी वातुकीसाठीचा भार ही याच एसटी स्थानकावर आहे. दिवसभरात मोहोळ एसटी स्थानकातून शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते. राजकीय अनास्थेमुळे या एसटी स्थानकाचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचे सांगितले जात आहे.

एसटी स्थानकासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेची जागा देण्याची मागणी

मोहोळ शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या तिन्ही रस्त्यांवरील एसटी गाड्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रशस्त जागा देण्यात,यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून करण्यात येत आहे. यावेळी मोहोळ एसटी स्थानकाच्या संदर्भात बोलताना पत्रकार भारत नाईक यांनी सांगितले,की मोहोळ एसटी स्थानक जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरला जाण्यासाठी भाविक याच एसटी स्थानकाचा वापर करतात. तसेच तुळजापूर,अक्कलकोट,शिर्डी येथे जाण्यासाठी याच एसटी स्थानकाचा उपयोग केला जातो. परंतु अपुऱ्या जागेमुळे सध्या मोहोळ एसटी स्थानकाची कोंडी झाली आहे. एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे आणि राजकीय अनास्थेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अपुऱ्या जागेमुळे वाहने पार्क करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एसटी स्थानकासमोर अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. त्यामुळे एसटी वाहतुकीस आणखीन जास्त अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोहोळ एसटी स्थानकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी या एसटी स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी पत्रकार भारत नाईक यांनी बोलताना केली.

एसटी ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी

एसटी ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजली जाते. याच एसटीने ग्रामीण भागातील लोकांचे जीवन बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गावापासून दूर शहरात शिक्षणासाठी राहणाऱ्या अनेक मुलांना खेडेगावातून जेवणाचा डबा पोहच करण्याचे काम एसटीने केले आहे. महाराष्ट्र्रातून लाखों लोक एसटीने प्रवास करत असून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या चार महिन्यापासून एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे लालपरी जाग्यावर काहीशा प्रमाणात थांबली आहे. काही कामगार कामावर हजर झाले असून एसटी रस्त्यावर धावू लागल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे,यासाठी कामगारांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. तूर्तास एसटीची थोडयाशा प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. तर ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू असल्याचे दिसते.

एसटी स्थानकाची कोंडी सोडवण्यासाठी जागेचा शोध सुरू - आमदार यशवंत माने

एसटी स्थानकाची कोंडी फोडण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या जागेची मागणी केली जात आहे,पण जिल्हा परिषद जागा देईल का नाही हे सांगता येत नाही. जागा मिळाल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठवू,असे मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.



Full View

Tags:    

Similar News