सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांमध्ये हरवला
मोठ-मोठी शहरे समृध्दी महामार्गांनी जोडली जात असताना पूर्वी तयार केलेल्या महामार्गांची दुरावस्था झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच प्रकार सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर झाला असून रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...
रस्ते हे विकासाची साधने मानली जातात. जर रस्ते चांगले असतील तर कमी वेळात जास्त दूर जाता येते. शेती माल आणि कंपन्याच्या मालांची वाहतूक वेगाने होते. याच साठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी समृध्दी महामार्ग सारख्या ररस्त्यांचे नियोजन करून त्याला मूर्त स्वरूप दिले. देशभरातील महत्वाची शहरे या समृध्दी महामार्गानी जोडली जाणार आहेत. त्यामुळे दळणवळण वेगाने होण्यास मदत होणार आहे. मोठ-मोठी शहरे समृध्दी महामार्गांनी जोडली जात असताना पूर्वी तयार केलेल्या महामार्गांची दुरावस्था झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच प्रकार सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर झाला असून रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून सोलापूर पासून काही अंतरावर असणाऱ्या पाकणी ते शेटफळ या गावा दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
त्यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचल्याने या खड्ड्यांचा वाहन धारकाना अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या खड्ड्यात आदळल्या जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या खड्ड्यांमुळे पूर्वी अनेकदा अपघात होवून निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत आणि भविष्यात ही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे पदाधिकारी दशरथ काळे यांनी केली आहे. त्यांनी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकराणाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
वाहन धारकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राज्यासह देशभरामध्ये लाखो किलोमीटर रस्त्यांचे जाळे तयार करत नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दरम्यान मोहोळ हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची मात्र चाळण झाली असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अपघातांना निमंत्रणच मिळत आहे. दिवसेंदिवस अपघातातील मृतांचा, जखमींचा वाढणारा आकडा वाहन चालकांसाठी भीती निर्माण करणारा ठरत आहे. वारंवार वाहन चालकांनी पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात तक्रारी केल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते पाकणी गावच्या हद्दी दरम्यान असलेले खड्डे भरण्यासाठी आय. एल. एफ. एस. या कंपनीच्या माध्यमातून ठेकेदाराला कंत्राट देऊन सात ते आठ महिन्यांपूर्वी पडलेले खड्डे भरून घेण्यात आले.संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ते खड्डे पावसाळ्यात उघडे पडले आहेत.
त्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या ठेकेदाराला या अपघाताशी काही देणेघेणे नसल्याची भावना निर्माण होत आहे. तेच खड्डे, तोच ठेकेदार? यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तसेच आय.एल.एफ.एस. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहोळ तालुक्यात अपघातांमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन त्याच त्या ठेकेदारावर मेहरबानीची छत्री न धरता कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यासाठी काम करण्याची मागणी वाहनचालकांमधुन केली जात आहे.
सहा महिन्यात अपघातामध्ये अकरा जणांचा मृत्यू
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते पाकणीपर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना अंदाज येत नसल्याने मोठया अवजड वाहनाचा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वरांची अपघाताची मालिका सुरू असतानाही सावळेश्वर टोल प्लाझा कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी किती दिवस मर्जीतल्या ठेकेदारावर मायेची छत्री धरून सर्वसामान्य वाहन चालकांच्या जीवाशी खेळणार आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
1 जानेवारी ते 31 जुन 2022 पर्यंत सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेटफळ ते पाकणी दरम्यान सहा महिन्यांमध्ये अंदाजे 13 अपघातांमध्ये 11 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले नाहीत व रस्ता दुरुस्ती वेळेत पूर्ण न केल्याने एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या दुरुस्ती विभागाच्या तात्कालीन अधिकाऱ्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेकाचे जीव जात आहेत
वा काय रस्ता, काय खड्डे अन् खड्यात पाणी, काय ठेकेदार आणि टोल तर नुसता ओक्के मध्ये वसुली सुरु आहे. सोलापूर पुणे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे टोल प्रशासनाचे किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. काही महिन्यांपूर्वीच खड्डे बुजवले गेले होते. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे पुन्हा आहे तसे झाले आहेत. या खड्ड्यांवरती टोल प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, नागरिकांना वाटत आहे.
सर्व्हिस रस्त्यांची झाली दुरावस्था
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना भाजपचे पदाधिकारी दशरथ काळे यांनी सांगितले,की राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेला संबधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यांची ही दुरावस्था झाली असून त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे सर्व्हिस रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याच्या खालच्या स्तरातील डांबराचा स्तर खराब झाल्याने खड्डे पडू लागले आहेत. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी ते खड्डे पूर्ण उकरून काढले जात असून त्यात पुन्हा नव्याने डांबर भरण्याचे काम सुरू आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चिटणीस यांनी सांगितले.