सोलापूरचे कुंकू विकले जातेय जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत

सोलापूर जिल्ह्यातील 'केम' नावाच्या एका छोट्याशा खेडेगावाला कुंकवाचे केम असेही म्हटले जाते. या गावात हळद,कुंकू आणि गुलालाचे 18 ते 20 कारखाने असून या उद्योगावर 400 ते 500 मुजरांची कुटूंबे चालतात. देशात जेथे देवस्थान तेथे केम च्या हळद,कुंकू आणि गुलालची विक्री होते. या उद्योगातून वर्षाला सुमारे 22 कोटी रुपयांची उलाढाल होते. या गावात हा उद्योग गेल्या 200 ते 250 वर्षापासून उभा आहे. यातून अविरतपणे कुंकू,हळद,गुलाल बनवण्याचे काम सुरू आहे. याची विक्री काश्मीरपासून ते कन्या कुमारीपर्यंत होते, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....;

Update: 2022-05-05 03:30 GMT

कुंकू हे सौभाग्याचे लेणं समजलं जातं. पूर्वीच्या काळी महिला कुंकवाचा वापर कपाळावर लावण्यासाठी करत असत. प्राचीन काळापाऊसून या कुंकवाला अनन्य साधारण महत्व भारताच्या संस्कृतीत आहे. पण अलीकडच्या काळात महिलांच्या कपाळावरचे कुंकू दुर्मिळ झाले असल्याचे दिसते. सध्या या कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे. परंतु आजही वयस्कर महिला कुंकवाचा वापर करताना दिसतात. हळद आणि कुंकवाचा वापर कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येतो. तर गुलालाचा वापर विजयी मिरवणूका व आनंदाच्या क्षणी केला जातो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गावोगावी देवतांच्या यात्रा असतात. यामध्ये ही या हळद,कुंकू, गुलाल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण हा गुलाल,हळद,कुंकू बनते, ते सोलापूर जिल्ह्यातील 'केम' नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात. हे करमाळा तालुक्यात असून या गावाला कुंकवाचे केम असेही म्हटले जाते. या गावात हळद,कुंकू आणि गुलालाचे 18 ते 20 कारखाने असून या उद्योगावर 400 ते 500 मुजरांची कुटूंबे चालतात. देशात जेथे देवस्थान तेथे केम च्या हळद,कुंकू आणि गुलालची विक्री होते. या उद्योगातून वर्षाला सुमारे 22 कोटी रुपयांची उलाढाल होते. या गावात हा उद्योग गेल्या 200 ते 250 वर्षापासून उभा आहे. यातून अविरतपणे कुंकू,हळद,गुलाल बनवण्याचे काम सुरू आहे. याची विक्री काश्मीरपासून ते कन्या कुमारीपर्यंत होते.

कुंकवाच्या उद्योगाला 200 ते 250 वर्षांचा इतिहास

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना येथील कारखानदार अरविंद वैद्य यांनी सांगितले की, केम गावातील कुंकवाच्या या उद्योगाला 200 ते 250 वर्षांचा इतिहास असून पूर्वी वनस्पतीचा पाला व बोंडं वाळवून तेलामध्ये मिक्स करून कुंकू बनवले जात होते. पण आता कोणी एवढी मेहनत घेत नाही. कालांतराने ही वनस्पती दुर्मिळ होत गेली. त्यामुळे केम गावातील एका व्यक्तीने हळदीमध्ये चुना मिक्स करून बैलाच्या घाण्यातून कुंकू बनवण्याचा शोध लावला. पूर्वीच्या काळी दगडाची जाती होती. ती बैलांच्या मदतीने फिरवली जात व हळद कुंकवाचे मिश्रण दळले जात असे. हळूहळू या उद्योगात बदल होऊन जात्याची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. त्यामुळे या उद्योगात मशीनरी आल्या. त्यानंतर या उद्योगात क्लोरायझेशन मशिन्स,मिक्सर या मशीनरी आल्या. या उद्योगात निरनिराळी उपकरणे आल्याने कुंकवाचे उत्पादन झपाट्याने वाढले आणि कुंकवाचा दर्जाही सुधारला. सध्या केम गावात 18 ते 20 कुंकवाचे कारखाने असून त्यामध्ये 400 ते 500 कामगार काम करत आहेत. केममध्ये तयार झालेले कुंकू पूर्ण भारतामध्ये विकले जाते. अगदी जम्मू काश्मीर पासून ते कन्या कुमारीपर्यंत जाते. तसेच कोलकता ते मुंबई पर्यंत जाते. या कुंकवाची विक्री छोट्या-छोट्या खेडेगावात ही होते. भारतातील प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी येथील कुंकू पाठवले जाते. येथून परदेशातही माल एक्सपोर्ट केला जातो. ज्या देशामध्ये जास्त प्रमाणात हिंदू धर्म पाळला जातो तेथे येथिल कुंकू पाठवला जातो. अमेरिका,नेपाळ,मॉरिशस, श्रीलंका या देशात कुंकू एक्सपोर्ट होते. या उद्योगाची वार्षिक उलाढाल 22 कोटीच्या आसपास आहे.

लॉकडाऊनचा या उद्योगावर परिणाम

कोरोनाच्या काळात बरीच मंदिरे बंद होती. यात्रांवर बंदी होती. लग्न सराईवर बंदी होती. म्हणजे जेथे कुंकवाचा खप होत होता तीच ठिकाणे कोरोनाच्या काळात बंद होती. त्यामुळे लॉकडाऊन च्या काळात जवळ-जवळ सर्वच कारखाने बंद होते. अशा अवस्थेत कामगराना काम देणे अशक्य होते. या काळात यूपी बिहारचे कामगार निघून गेले. या काळात 3 ते 4 स्थानिक कामगारांवर काम केले जात होते. या लोकांच्या कामावर थोडेफार उत्पादन घेतले जात होते. 23 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आली. गावोगावच्या यात्राना परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने आणि बाहेरच्या राज्याने लॉकडाऊन स्थितील केल्याने या उद्योगाला पुन्हा उर्जितावस्था आली. हा उद्योग अजूनही म्हणावा तितक्या प्रमाणात पूर्ववत झालेला नाही. कारण कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाटतेय. पूर्वी व्यापारी बिनधास्तपणे माल साठवून ठेवत असत. ते सध्या माल साठवून ठेवत नाहीत. दुकानदार मालाची खरेदी भीतभित करत आहेत. जेथे 10 टनाची गरज लागत होती तेथे 5 टन माल खरेदी करत आहेत. त्यामुळे या उद्योगाला आपोआप ब्रेक लागला आहे. पण अशाही परिस्थितीत हा उद्योग पूर्वपदावर येईल असे येथिल कारखानदारांना वाटत आहे.

भारतामध्ये जेथे-जेथे देवस्थान तेथे-तेथे जातो कुंकू

भारतामध्ये जेथे-जेथे देवस्थान आहेत. तेथे-तेथे केमचा कुंकू विकला जातो. यामध्ये उज्जेन, वाराणशी, अयोध्या, कालिका मंदिर कोलकता, मुंबई यांचा समावेश होतो. भारतामध्ये जी मोठं-मोठी देवस्थाने आहेत. तेथे-तेथे कुंकू पाठवला जातो आणि तेथून परत तो छोट्या-छोट्या खेडेगावामध्ये वितरित होतो. अगदी तिरुपती बालाजी,पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा केमचे कुंकू मोठ्या प्रमाणात विकले जाते. ग्रामीण भागातील यात्रा काळात येथील हळद ,कुंकू,गुलाल याला मोठी मागणी असते.

येथे ट्रान्सपोर्ट कंपन्या यायला तयार नाहीत

या गावाला जाण्या-येण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सोय नसल्याने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कंपन्या यायला तयार नाहीत. हे उद्योग ग्रामीण भागातील उद्योग आहेत. त्यामुळे भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. कधी-कधी 8 ते 9 तास लाईट नसते. पूर्वी केमच्या रेल्वे स्टेशन वरून कुंकू भरण्यासाठी पार्सल ची सोय होती. भारतात रेल्वेने कोठेही माल पाठवता येत होता. परंतु सध्या रेल्वेने ही सुविधा बंद केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. रेल्वेने ब्रिज लहान केले आहेत. त्यामुळे मालाचे ट्रक येऊ शकत नाहीत. ट्रक दुसऱ्या मार्गांने लांबून आणावे लागतात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. भारनियमनामुळे उत्पादनाला ब्रेक लागला आहे. याठिकाणी जाण्या-येण्यासाठी मेन रस्त्याची सोय नाही आणि आहेत ते सर्व रस्ते खड्यांचे आहेत. त्यामुळे याठिकाणी बाहेरच्या ट्रान्सपोर्ट कंपन्या येथे यायला तयार नाहीत. परिणामी येथील व्यापाऱ्यांना छोटी-छोटी वाहने करून कुंक टेंभुर्णी, बार्शी,सोलापूर येथे स्वखर्चाने पाठवावा लागतोय. याकडे शासनाने लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावावेत. अशी मागणी येथील कारखानदारांची आहे.

Full View


केमच्या कारखान्यात तयार झालेले कुंकू भारताच्या विविध भागात रेल्वेने पाठवले जात होते. त्यासाठी केमच्या रेल्वे स्टेशनवर गोडाऊनची सुविधा करण्यात आली होती. रेल्वेने कुंकू जात असल्याने माल व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणी कमी खर्चात पोहचत होता. पण रेल्वे विभागाने अचानक ही सुविधा बंद केल्याने येथील व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भारतात रेल्वेने पुन्हा कुंकू पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कुंकू पाठवण्याची सुविधा सुरू करावी,अशी मागणी येथील व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे. त्याला रेल्वे प्रशासन कसा प्रतिसाद देते याकडे येथील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यात राज्य सरकारने ही लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा असे येथील नागरिकांना वाटत आहे.

Tags:    

Similar News