`जलयुक्त`च्या शिवारात `झोल`
जलयुक्त शिवार योजनेने फायदा झाल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. पण भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात या योजनेतून बांधलेल्य़ा बंधाऱ्याची परिस्थिती पाहिली तर पाणी कुठं मुरतंय असा प्रश्न पडतो. आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत झोल झाल्याचा ठपका महालेखापालांनी ठेवल्यानंतर महाविकास आघाडीने एसआयटी स्थापून चौकशीची घोषणा केली आहे. आघाडीच्या आरोपांना फडणवीसांनी झोल झाला नाही हे शिवारात सिध्द करु असे प्रतिआव्हान दिले आहे. प्रत्यक्षात औरंगाबादच्या पैठण तालुक्यात भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील म्हारोळा गावात जावून मॅक्स महाराष्ट्रनं प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर काय आढळले हे सांगणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....
औरंगाबादचा पैठण तालुका आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील म्हारोळा गावातील बंधारा. दीड-दोन वर्षापुर्वी काम सुरु झालेला बंधारा नदीला आलेल्या पहिल्याचा पुरात उखडून पडला आहे. बांध जरी अजून दम धरून असला तरीही त्याची खालची बाजू पूर्णपणे उखडून पडली आहे. अशीच काही परिस्थिती गावात तयार झालेल्या इतर बंधाऱ्यांची आहे. बंधाऱ्याच्या बाजूला बांधलेल्या भिंती पाण्यात वाहून जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व बंधारे जलयुक्त शिवार योजनेत बांधली गेली आहे. कामे बोगस होत असल्याचं गावकऱ्यांनी वेळीच सांगितले सुद्धा होते, मात्र अधिकारी आणि कंत्राटदारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेतील बंधाऱ्याचे काम त्या गावात कसे झाले ते दिसले. पण त्याच गावातील आणखी एक बंधारा आहे जो थोडाही खराब झालेला नाही. प्लॅस्टर केलेल्या ठिकाणी साधा तडासुद्धा गेलेला नाही. हे काम जलयुक्त शिवार योजनेत नाही तर ग्रामपंचायतच्या निधीतून करण्यात आले. विशेष म्हणजे या कामाला पाच वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे.
गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत काम चांगल्या पद्धतीने करून घेतले. मात्र दुसरीकडे याच गावातील जलयुक्तमध्ये झालेल्या बांधऱ्यांची अवस्था दयनीय आहे.