शाहरुख खान लता मंगेशकारांच्या अत्यंविधीच्या ठिकाणी खरचं थुंकला का?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो व्हायरल होत असून तो अत्यंविधीच्या ठिकाणी थुंकला असा दावा केला जातोय. अंत्यदर्शन घेताना दुआ पठणानंतर शाहरुख खान थुंकला असा प्रचार करणाऱ्यांवर देखील टीका होत आहे. नेमकी काय विधी आहे खरचं शाहरुख थुंकला का?;

Update: 2022-02-07 10:05 GMT

6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. तर संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र लता मंगेशकर यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना अभिनेता शाहरूख खान याचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. तर शाहरुख खान अंत्यविधीच्या ठिकाणी थुंकल्याचा दावा करण्यात येत आहे. अंत्यदर्शन घेताना दुआ पठणानंतर शाहरुख खान थुंकला असा प्रचार करणाऱ्यांवर देखील टीका होत आहे. मात्र अंत्यदर्शनावेळी शाहरुख खान खरचं शाहरुख थुंकला का? वाचा काय आहे व्हायरल होत असलेल्या फोटोमागील सत्य...

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभर दोन दिवसाचा दुखवटा जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः शिवाजी पार्कवर येऊन आदरांजली वाहीली. यावेळी प्रमुख नेते अभिनेत्यांबरोबरच भारताचा सुपरस्टार किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान देखील होता. लता मंगेशकर यांचं पार्थिव त्यांचा बंगला प्रभूकुंज इथून शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं. अंत्यसंस्कारांपूर्वी ते काही काळ दर्शनासाठी ठेवलं गेलं होतं.

शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता. दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते.

त्याची खाजगी सचिव पुजा दादलानी सोबत लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी वाचलेली दुआ आणि त्यानंतर हात जोडून केलेला नमस्कार केल्याच्या फोटोचे देशभरातून कौतूक होत आहे. तर याबाबत सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे. मात्र त्यावेळी शाहरुख खान याचा दुसरा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये शाहरुख खान थुंकल्याचा दावा करत त्याच्यावर टीका केली जात आहे.

शाहरुखनं नेमकं काय केलं ?

शाहरुखने आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. त्यानंतर दोन्ही हात जोडून लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली. या संपूर्ण प्रकरणावरुन सोशल मीडियात एका नवा वाद सुरु आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी केला होता.

लता दिदींच्या पार्थिवावर शाहरूख थुंकला नाही, तर त्यानं दुआ फुंकली. असे वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भाषेत उत्तर दिलंय. समाज म्हणून आपण कुठे चाललोय? टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं. अशा कडक शब्दात उर्मिला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या निधनाने अवघा देश हळहळला. लतादिदी सदैव स्मरणात राहतील असे उर्मिला यांनी सांगितले

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी म्हटलं की शाहरुखवर थुंकण्याचा आरोप करत टीका करणाऱ्या लोकांना लाज वाटायला हवी. त्यांच्या पुढच्या प्रवासात त्यांचं रक्षण व्हावं आणि त्यांना आशीर्वाद मिळावेत यासाठी शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर दुवा मागून फुंकर मारत आहे. असल्या सांप्रदायिक घाणीला देशात जागा नाही.

एवढे कसे जन्मतःच मूर्ख होऊन जन्माला येतात देव जाणे! इस्लाममध्ये दुवा हातावर फुंकर देऊनच केली जाते आज शाहरूखखाननं दुवा मागितली लता मंगेशकर यांच्यासाठी तर कोणी निश्चलानंद नावाचा गर्दभ आहे, त्यानं पोस्ट लिहीली की म्हणे शाहरूख थुंकला. भाजपाच्या यादव नावाच्या नेत्यानं री ओढली, झाला येड्यांचा बाजार सुरू. आली बाकीची माकडं मागोमाग आणि अपप्रचार सुरू. हिंदू धर्मातल्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवानं यांना अक्कल दिली नसल्यानं वांधे झालेत. द्वेषांधळे लोक आहेत हे, यांना माणसामाणसात प्रेम, आदरभाव असू शकतो हेच मान्य नाही. मराठवाड्यात अशा लोकांचं वर्णन 'माणूस म्हणावं तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही' अस॔ करतात, असं विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

शाहरुख खान हा मुस्लिम आणि त्याची पत्नी गौरी ही हिंदू आहे. शाहरुख दुवा करताना आणि त्याच्याशेजारची महिला प्रार्थना करताना दिसत असल्याने अनेकांनी भिन्न धर्माचे हे पती-पत्नी धार्मिक सलोख्याचं प्रतीक असल्याचं म्हणताना दिसले. त्यांनी स्वतःच नंतर ही चूक दुरूस्तही केली. पण इतर अनेक लोक ही महिला गौरी खान असल्याचं म्हणताना दिसले. पण शाहरुख बरोबर पत्नी गौरी नसून शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी होती.

खरं तर, फुंकणे आणि थुंकणे यात खूप फरक असतो, हे आता तुमच्या लक्षात आले असेल. पण, यात थुंकताना किंवा फुंकताना आपल्या ओठांची हालचाल जवळजवळ सारखी असते, त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे. ही गोष्ट अनेकांनी समजून न घेता लोकांनी टीका सुरू केली आहे. थुंकणे आणि फुंकणे यातील फरक आपण जाणतो. शाहरुखने केलेल्या कृतीला 'फुंकणे' किंवा 'फातिहा पढणं'असं म्हणतात. आपण याला त्याने त्याच्या पद्धतीने आदरांजली वाहिली, असे ही म्हणू शकतो. फतिहा पूर्ण होण्यासाठी शेवटी एक फुंकर मारावी लागते.

Full View

अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांनी या विषयावर लिहताना मुस्लिमांवर यापूर्वी अशाप्रकारचे आरोप कधी केले गेले होते याबद्दलचे काही दाखले दिले आहेत. त्यात मार्च 2020 मध्ये तबलिगी जमातबद्दल अपप्रचार करताना लोकांनी ते थुंकतात असं म्हटल्याचंही झुबेर म्हणतात.

शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी दिल्लीहून आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते आमिर खान, रणबीर कपूर, गायक शंकर महादेवन, यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी लतादीदींचं शिवाजी पार्कमध्ये अंत्यदर्शन घेतले.

निष्कर्ष : मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पडताळणीत  लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी अभिनेता शाहरुख खान पार्थिवावर थुंकला असल्याचा दाव्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. तर मुस्लिम समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकारे दुवा पठण करून फुक मारतात. परंतू चुकीच्या समजातून शाहरुख खानने केलेल्या दुवा पठणबद्दल सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यात येत होते. ते पुर्णतः खोटे असल्याचे आढळून आले आहे.

Tags:    

Similar News