Save soil मोहिमेच्या जनजागृतीसाठी दिल्लीचा युवक निघाला कन्याकुमारीला ; सात हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर सुरू
दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता कमी होत चाललेली आहे. तिची नापिकता वाढत आहे. शेत जमिनीच्या मातीत जे नैसर्गिक घट आवश्यक आहेत,ते कमी होत चाललेले आहेत. त्याची जमिनीत वाढ व्हावी,यासाठी सरकारने पुढाकार घेऊन save soil ही मोहीम राबवावी. त्यासाठी शेतकरी आणि सर्व नागरिकांना यात सहभागी करून घ्यावे,यासाठी लोकांत जनजागृती करण्यासाठी सम्राट सिंग दिल्ली ते कन्याकुमारी पर्यंत सात हजार किलोमीटरचा प्रवास सायकलीवर करत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा सोलापूरवरुन ग्राऊंड रिपोर्ट..;
रस्त्यात वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या भागात व्हॉलींटिअर असून त्यांच्या मदतीने शाळा कॉलेज,गावात जनजागृती करत आहे. सध्या मातीची गुणवत्ता कमी होत चालली असून येणाऱ्या 35 ते 40 वर्षात लोक भूकबळीचे शिकार ठरू शकतात. त्यासाठी शासनाने लवकर प्रयत्न करून जमिनीचा कस सुधारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. भारताबरोबरच जगभरातील मातीची गुणवत्ता घटत चालली आहे. यासंदर्भाने जगभरात वेगवेगळ्या मोहिमा सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून मी दिल्ली ते कन्याकुमारी पर्यंत सायकलवर सात हजार किलोमीटर चे अंतर पार करून जात आहे. सायकलवर जात असताना लोकांत मातीच्या संदर्भात जनजागृती करत चाललो आहे. असे सायकल सफर करणाऱ्या दिल्लीच्या सम्राटसिंगने बोलताना सांगितले. सम्राटसिंगची सायकल सफर सध्या सोलापूर जिल्ह्यात आली असून त्यानिमित्ताने त्याच्याशी संवाद साधला असता. त्याने save soil मोहिमेची माहिती दिली.
जमिनीची वाढती नापिकता
कमी कालावधीत जास्त पीक घेण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन तिची नापिकतेकडे वाटचाल सुरू आहे. नैसर्गिक फळे,भाजीपाला,अन्न धान्य यांचे प्रमाण घटले आहे. भाजीपाला किंवा अन्न धान्य यांच्यावर फवारण्या केल्या असल्याने त्या पालेभाज्या,फळे,अन्न धान्य मानवी शरीरास म्हणाव्या तितक्या प्रमाणात पोषणतत्वे देत नाहीत. फक्त पोट भरल्यासारखे वाटते. पण त्यातून जी नैसर्गिक पोषणतत्वे मिळायला हवी ती मिळत नसल्यामुळे लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. सध्या लोकांना कमी वेळेत जास्त पैसा मिळावा हा हेतू असल्याने मानवी आरोग्याचा विचार केला जात नाही. अलीकडे कोणतीही फळे कोणत्याही ऋतूत मिळू लागली आहेत. पूर्वी जी फळे ठराविक ऋतूत खायला मिळायची ती आता बारा महिने उपलब्ध झाली आहेत. पूर्वी फळांचा हंगाम ठरलेला असायचा त्याच हंगामात ती फळे येत असत. त्या हंगामातील फळे,भाज्या चवीला आणि मानवास खाण्यासाठी अतिशय चांगल्या असायच्या. त्यातून मानवाच्या शरीराला पूर्ण पोषणतत्वे मिळत होती. पण सध्या ती कमी प्रमाणात मिळताना दिसत आहेत. त्यामुळेच मानवी शरीर विविष रोगांना बळी पडू लागले आहे. असे तज्ञांचे मत आहे.
शेत जमिनीच्या मातीत 3 ते 6 टक्के नैसर्गिक घटकांचे प्रमाण असायला हवे
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना साम्राटसिंगने सांगितले की, सात हजार किलोमीटरचा सायकलवर प्रवास करून दिल्लीवरून दक्षिण भारतातील कन्याकुमारी पर्यंत नापीक होत चाललेल्या शेत जमिनीच्या संदर्भाने लोकांत जनजागृती करत चाललो आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश माती बचाव असून याविषयी आपण कोठेतरी वाचले असेल किंवा ऐकले असेल याच्या समर्थनार्थ ही मोहीम मी करत आहे. माती वाचवा जे मी सांगतोय ते म्हणजे आपली माती कोणी चोरली नाही. याच्यात एक गोष्ट खरी आहे,ते म्हणजे आपली माती मरु लागली आहे. आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला दिसेल की, मातीची गुणवत्ता कमी होत चालली आहे. आपली शेतजमीन कशाप्रकारे नापीक होत चालली आहे. तिचे वाळूत रूपांतर होताना दिसत आहे. माती आणि वाळूत एकप्रकारे चे साम्य असून ते म्हणजे जिवाणूंचे प्रमाण होय. मातीचा कस कमी होत चालला असून नैसर्गिक मातीत 3 ते 6 टक्के नैसर्गिक घटकांचे प्रमाण असते. अशा शेजामिनीची गुणवत्ता चांगली असते. या नैसर्गिक घटकांचे प्रमाण कमी असेल तर ती शेत जमीन वाळूच्या बरोबर आहे. शेत जमिनीत 3 ते 6 टक्के नैसर्गिक घटकांचे प्रमाण असायला हवे होते,पण ते सध्या घटून 5 टक्के झाले आहे. नैसर्गिक घटकांचे शेतजमीनीत प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने जनजागृती मोहीम हाती घ्यायला हवी.
येत्या 35 ते 40 वर्षात 90 टक्के शेतजमिनी नापीक होण्याची भीती
दिवसेंदिवस मातीची गुणवत्ता घटत चालली आहे. त्यामुळे 2035 ते 2040 च्या दरम्यान 90 टक्के शेतजमिनी नापीक होतील. आपल्याकडे शेती लायक जमीन राहणार नाही. याच्या जनजागृतीसाठी save soil अभियान आहे. ही फक्त भारताची समस्या नसून पूर्ण जगाची आहे. मागील 30 वर्षात आपण आधुनिकीकरणाच्या नादात मातीच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. आपले म्हणणे ट्विटर,फेसबुक,इन्स्टाग्रामवर सुद्धा मांडू शकता. आपले म्हणणे हँश टँग save soil चा वापर करून सरकारपर्यंत पोहचवू शकता. सरकारने यासाठी पाऊले उचलली नाहीत,तर येणाऱ्या 30 ते 40 वर्षाच्या कालावधीत लोक भूकबळी ठरू शकतात. या अभियानाला घेऊन मी दिल्लीवरून कन्याकुमारी येथे चाललो आहे. आतापर्यंत मी राजस्थान, गुजरात येथील वेगवेगळ्या शाळा,कॉलेजमध्ये जनजागृती केली आहे. हजारो लोकांना भेटलो आहे. माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहचवले आहे. जगात माझ्यासारखे अनेक लोक मातीच्या संदर्भाने त्यांच्यापरीने लोकांपर्यंत माहिती पोहचवत आहेत. मी एक सायकलिस्ट असून त्यामुळे मी सायकलवर जनजागृती करत निघालो आहे. लोकांना सायकल घेऊन निघण्याची गरज नाही. लोक घरी बसून या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी save soil.org या वेबसाईटवर जाऊन लोक आपले म्हणणे मांडू शकतात, असे सम्राटसिंगने बोलताना सांगितले.
सरकारने save soil मोहीम हाती घेतल्यास मोहीम यशस्वी होऊ शकते
सरकारने save soil मोहीम हाती घेतल्यास मोहीम यशस्वी होऊ शकते. सरकारने झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली तर मातीची गुणवत्ता वाढू शकते. त्यासाठी फर्टिलायझरचे उत्पादन कमी करायला हवे. लोक त्यांच्या दररोजच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे save soil मोहीम सरकारने हाती घेतल्यास निश्चितपणे यशस्वी होऊ शकते, असे सम्राटसिंगला वाटते.