प्रतिकुल परीस्थितीत ग्रामीण भागातील मंजीलीची आंतराष्ट्रीय स्पर्धेत निवड
ग्रामीण भागात लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती असते. या शेतीवर शेतमजूर,लोहार,सुतार अवलंबून असतात. याच लोहार समाजातील मंजीली नवघन मुलीने चक्क कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसताना किक बॉक्सिंग स्पर्धेत मलेशिया पर्यंत मजल मारली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;
भारत हा खेड्यापाड्यांचा देश समजला जातो. या देशात प्रत्येक प्रांतानुसार विविध भाषा बोलल्या जातात. प्रत्येकाचे पेहराव वेगवेगळे आहेत. हा देश डोंगर,दऱ्या,नद्या,नाले,जंगले या मध्ये विभागला आहे. त्यामुळे या देशातील अनेक भागात सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. ज्या सोयी-सुविधा सध्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या भारतातील मेट्रो शहारापुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत. त्या ग्रामीण भागात म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात पोहचलेल्या नाहीत.
आजही ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे दिसते. दलित वस्त्या बकाल असल्याच्या दिसतात. येथेच हजारो वर्षापासून जातीय व्यवस्था अस्तित्वात असल्याने येथील लोकांच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक जीवनात गेल्या हजारो वर्षापासूनच्या जातीय व्यवस्थेचा प्रभाव आजही येथील लोकांच्या जीवनात दिसून येतो. त्यामुळे येथे सर्व जणांना समान संधी उपलब्ध होताना दिसत नाही. प्रत्येकजण जाती,धर्म यामध्ये अडकला आहे. त्यामुळे येथील समाज जीवनात बरेच चढ उतार दिसून येतात. महाराष्ट्राच्या अनेक गावात जायचे म्हटले तर रस्त्यावरून जात असताना खड्यांचे मोठे दिव्य पार करून जावे लागते.
ग्रामीण भागात दवाखान्यांच्या सुविधा उपलब्ध नसल्याने रात्री-बेरात्री रुग्णांना दवाखान्यात घेवून जात असताना लोकांना खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसे पाहिले तर ग्रामीण भाग अनेक सोयी-सुविधा अभावी उभा असल्याचे दिसतो. या ग्रामीण भागात लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती असते. या शेतीवर शेतमजूर,लोहार,सुतार अवलंबून असतात. याच लोहार समाजातील मुलीने चक्क कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसताना किक बॉक्सिंग स्पर्धेत मलेशिया पर्यंत मजल मारली आहे. ही मुलगी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) या गावची रहिवाशी असून तिचे नाव मंजीली नवघन आहे. ती गेल्या पाच वर्षापासून किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असून तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करून तिला पैसे पुरवत आहेत. पण तिची मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याने तिला मदतीची गरज असल्याचे तिच्या आई-वडिलांनी बोलताना सांगितले.
दररोज दहा किलोमीटरचा प्रवास करून मंजिली जाते सरावाला
मंजिली सध्या इययत्ता नववीच्या वर्गात शिकत असून ती गेल्या पाच वर्षापासून किक बॉक्सिंगचा सराव करत आहे. तिची शाळा आणि बॉक्सिंगच्या सरावाचे ठिकाण मंजिलीच्या गावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत जाण्यासाठी तिला सकाळी लवकरच तयारी करावी लागते. ती पहाटे रनिंगला जात असून बॉक्सिंगचा सराव करते. त्यानंतर ती थोडावेळ अभ्यास करते व एसटीने सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास करून वैराग येथे शाळेला जाते. या ठिकाणी सकाळी आठ ते तीन वाजे पर्यंत ती शाळेचे तास करते. त्यानंतर तीन ते पाच या वेळेत किक बॉक्सिंगचे धडे गिरवते. ग्रामीण भागात सरावासाठी कोणत्याही अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध नसताना सराव करून तिने राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तुंग,अशी कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत तिची निवड मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. नुकत्याच मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने पदक मिळवले आहे. याबद्दल तिचा विविध ठिकाणी सन्मान होत आहे.
मंजीलीचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून करतात काम
मंजीलीच्या घरची परस्थिती हलाखीची आहे. तिचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. यामध्ये कधी काम असते तर कधी नसते. मिळेल त्या कामावर सध्या त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाह सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या लोहार कामावर संक्रात आल्याचे दिसून येते. आज बाजारात आधुनिक यंत्रे आल्याने शेतकरी वर्ग या यंत्रांच्या मदतीने शेती करू लागले आहेत. असाच प्रकार गावात असणाऱ्या सुताराच्या कामावर ही झाला असल्याचे दिसते. शेतीत पेरणीसाठी आधुनिक ट्रॅक्टर आले आहेत. त्यामुळे पूर्वी बैलावर चालणारी पिकांची पेरणी दुर्मिळ झाले आहे. अशीच परस्थिती सध्या लोहार या व्यवसायिकांची झाली आहे. पूर्वी पार,खुरपी,कुऱ्हाडी, कुदळ या अवजाराना धार लावण्याचे काम केले जात होते. पण आधुनिक यंत्रे शेतकरी खरेदी करू लागल्याने गावातील हा व्यवसाय अडचणीच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे मंजिलीच्या आई-वडीलाना दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून कामाला जावे लागत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करून पैसे पुरवत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन ते तीन लाख रुपये किक बॉक्सिंग साठी खर्ची घातले आहेत. मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी मंजीलीला लोकांनी मदत करावी,अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत.
मंजीली राहते पत्र्याच्या शेडमध्ये
मंजिली ही देगाव या गावात पत्र्याच्या शेड मध्ये राहत असून त्यातच ती अभ्यास करते. या मध्ये उन्हाळ्यात प्रचंड असा उकाडा तिच्या कुटुंबाला सहन करावा लागतो. तिच्याकडे दोन गाई आहेत. त्यांचे पालन पोषण करण्याचे काम तिचे कुटुंब करते. ती सध्या किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे सराव करत असून तिला तिचे प्रशिक्षक डेंगळे सरांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या गावापासून दहा किलोमिटर अंतरावर तिची शाळा असल्याने सकाळपासून धावपळ सुरू असते. अशाही परस्थितीत ती शाळा आणि बॉक्सिंगचे मैदान गाठते. तिच्या या मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला पुढे जावून देश सेवा करायची आहे. यासाठी तिला मिलिटरीत भरती व्हायचे आहे. त्यासाठी ती सध्या कसून सराव करत आहे. सराव करत असताना योग्य आहाराची काळजी घ्यावी लागते. त्याबाबत ही मंजिली अधिक जागृत आहे.
शाळेचा अभ्यास सांभाळत मंजीली बॉक्सिंगचा करते सराव
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना मंजीली नवघन हिने सांगितले,की आमच्या शाळेत स्पर्धा सुरू होत्या. त्यावेळेला या स्पर्धा पाहण्यासाठी तेथे गेले होते. त्या मैदानात किक बॉक्सिंगच्या स्पर्धा सुरू होत्या. तेव्हा त्या खेळाविषयी आवड निर्माण झाली. तेथेच प्रशिक्षक डेंगळे सरांची भेट घेवून किक बॉक्सिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि तेथूनच सरावाला सुरुवात झाली. किक बॉक्सिंगसाठी गेल्या पाच वर्षापासून सराव करत आहे. त्यात लॉकडाऊन मुळे दोन वर्षे वाया गेली. आता नव्याने प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. आताच राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून आले असून पुढील निवड इंटरनॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी पहाटे रनिंगला जात आहे. त्यानंतर सकाळी आठ ते तीन पर्यंत शाळेचे तास करून परत तीन ते पाच प्रॅक्टिस सुरू असते. पण हे सर्व सुरू असताना शाळेचा अभ्यास ही सुरू असतो. शाळा आणि सराव झाल्यानंतर पाच ते सहाच्या दरम्यान अभ्यासाला बसते. तो अभ्यास रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असतो. आतापर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा जिंकल्या असून खर्च घरच्यांनी केला आहे. विविध प्रकारच्या स्पर्धासाठी आतापर्यंत दोन ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. पण आता आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी शासनाने मदत करावी,असे वाटते.