Ground Report : भर पावसाळ्यात पाण्यासाठी ३ किमी पायपीट

रायगड जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पण याच जिल्ह्यातील काही वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यातही संघर्ष करावा लागतो आहे. त्यांचा संघर्ष काय आहे आणि या लोकांच्या यातनांना कोण जबाबदार आहे हे दाखवणारा आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....;

Update: 2021-08-18 11:43 GMT

रायगड : कोकणात सध्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तर काही दिवसांपूर्वी महापुरामुळे हाहाकार उडाला होता. पाण्यात लोकांचे संसार वाहून गेले आणि अनेक कुटुंब, व्यवसाय उध्वस्त झाले. पण याच कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या काही वाड्या आणि वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट आहे. इथल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे तालुक्याचे मुख्यालय. मात्र मुख्यालयापासून 10 ते 12 किमी अंतरावर असलेली गावे आजही प्राथमिक व मूलभूत सोयी सुविधांसाठी झुंजत आहेत. अलिबाग तालुक्यातील रेवस पंचक्रोशीला पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. मुंबईपासून तासभराच्या अंतरावर असलेल्या रेवस विभागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झिराड, रेवस, कोप्रोली, मिळतखार, सारळ, डावली रांजनखार, नवखार ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अनेक गाव व वाड्या वस्त्यां पाणीटंचाईचा सामना करतायेत. झिराड ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावे देखील तहानलेली आहेत. हा प्रश्न आजचा नाही, तर गेली अनेक वर्ष इथले नागरिक पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.



 

पाण्यासाठी उपोषण पण दखल नाहीच

अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागात रेवस, झिराड, मांडवखार, सारळ, मिळकत खार, रांजणखार डावली यासह 17 गावांसाठी एमआयडीसीच्या पाण्यावर रेवस ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. बहुतांश घरांमध्ये नळ जोडणी झाली आहे. मात्र, या नळांना पंधरा पंधरा दिवस पाणीच येत नाही, अशी तक्रार इथल्या महिलांनी केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी आजही भर पावसाळ्यात या महिलांना वणवण करावी लागते आहे. पाण्याच्या या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. या योजनेमुळे पाणी येईल म्हणून मांडव खार, सारळ, मिळकत खार, रांजण खार डावली, रेवस या गावांमधील नळ कनेक्शन घेतले. पण पाणी आलेच नाही. पाण्याच्या या समस्येसाठी खारेपाट भागातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते.



 

खारेपाट भागासाठी रेवस ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून पाणीही सोडले जाते, पण ते पाणी या गावांना मिळत नाही. पंधरा दिवस ते महिन्याभरातून एकदाच पाणी मिळत असल्याची माहिती इथल्या महिलांनी दिली. पुढच्या काही गावांना पाणी मिळावे यासाठी पाझर तलाव करून टाकी बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिला आहे, त्यामुळे 25 लाख लिटर पाणी साठा उपलब्ध होईल अशी माहिती समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी दिली.

पाण्यासाठी रात्री बेरात्री धावपळ

या वाड्या वस्त्यांवरील महिलांना आणि पुरूषांना दिवसा आणि रात्री जेव्हा पाणी येईल तेव्हा धावपळ करावी लागते. किमान २ किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागते आहे. उत्कर्षनगर येथील महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, पावसाळ्यातही आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. आम्हाला हंडाभर पाण्यासाठी भला मोठा चढ चढून जावे लागते.

तब्बल अडीच कोटींची पाणीपुरवठा योजना राबवून देखील रेवस पंचक्रोशी तहानलेली आहे. या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून रेवस पाणीपुरवठा योजना राबवली गेली. गावांना पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला, पण या योजना अपयशी ठरल्या आहेत. कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

एकीकडे पाण्यासाठी उपोषणाची वेळ आलेली असताना या ठिकाणी अनधिकृत नळजोडणी झाले असल्याची बाब देखील समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ हा पाणी प्रश्न भेडसावत आहे. डोंगराळ व उंचवट्यावर असलेल्या लोकवस्तीला पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने महिलांची पाणी मिळवण्यासाठी मोठी धडपड सुरू असते. त्याचे खूप हालसुद्धा होत आहेत.

जि.प. पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे काय?

या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात आमच्या प्रतिनिधीने जेव्हा रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए.डी.येजरे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी शासकीय उत्तर दिले. " रेवस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजना जीवन प्राधिकरण मार्फत झालेल्या योजना आहेत. रेवस झोन 1 मध्ये 20 गावे व 14 वाड्या आहेत. या लोकवस्तीसाठी एमआयडीसी पाईपलाईनमधून पाणी पुरवठा होतो. परंतु एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी चढविणे अशक्य झाले आहे. पाणी साठवण टाकीत पाणी पोहोचतच नाही. सोगाव ते कणकेश्वर फाटा येथील सिमेंट पाईपलाईन 30 वर्ष झाली आहेत. ही पाईपलाईन दुरूस्त करण्याची गरज आहे. लवकरच ही पाईपलाईन बदलवण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे आणि टेंडरही पास झालेले आहे. त्यामुळे पाईपलाईन बदलली की पाणीपुरवठा सुरळीत होईल.", अशी माहिती त्यांनी दिली.

इथल्या ग्रामस्थांना घरापासून दूर असणाऱ्या एमआयडीसीचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हापशी व विहिरींमध्ये उपलब्ध असणारे पाणी अत्यंत गढूळ असते. ते पिण्यायोग्य नसल्याने पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी येथील ग्रामस्थांना कोसो दूर भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभार या पाणीटंचाईला मुख्यत्वे जबाबदार असल्याचा आरोप समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी केला आहे.



 


रेवस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 10 ऑक्टोबर 2013 मध्ये आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात आली होती. 12 कोटी रुपये निधी खर्चून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील देखभाल व दुरुस्ती केली जात नाही, शिवाय याठिकाणी अवैध नळ जोडणी करून पाणी घेतले जात आहे, पाण्याची विक्री देखील केली जात आहे, असा आरोपही दिलीप भोईर यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांचे म्हणणे काय?

यासंदर्भात आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, "आपल्याकडे पाणीटंचाईचा हा विषय कधीच आलेला नाही. गावकऱ्यांची तक्रार आली किंवा ग्रामस्थांन भेचून यासंदर्भात मागणी केली तर तातडीने बैठक बोलावून आवश्यक ते सहकार्य करू," असे त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. आता येत्या काळात हा प्रश्न सोडवला जातो की नाही याचाही पाठपुरावा मॅक्स महाराष्ट्र सातत्याने करत राहणार आहे.

Tags:    

Similar News