ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवून अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले रणजीत डिसले गुरूजी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परदेशातील शिष्यवृत्ती मिळाल्याने संशोधनासाठी जाण्याकरीता त्यांनी मागितलेल्या रजेचा मुद्दा बराच गाजला आहे. पण आता रणजीत डिसले यांनी ते शिकवत असलेल्या शाळेत नेमके काय काम केले, याचीही चौकशी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी उपस्थित केले आहेत.
डिसले गुरूजी यांना जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळाल्यानंतर राज्य सरकार, राज्यपाल यांनी त्यांचा सत्कार केला होता. पण डिसले यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत राज्य सरकारने कोणतीही पडताळणी केलेली नाही, केवळ रणजीत डिसले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर, माध्यमांमधील बातम्यांवरुन त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे उत्तर राज्यपाल, राज्य सरकारतर्फे देण्यात आल्याची माहिती दीनानाथ काटकर यांनी दिली आहे.
बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी ग्लोबल टीचर अवार्ड व त्यांच्या कामाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.डीसले गुरुजींनी या प्रश्नांची उत्तरे प्रसार माध्यमासमोर येऊन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.अशी जनतेची ही मागणी आहे.पण डीसले गुरुजी प्रसार माध्यमासमोर येतील की नाही,याबाबत ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रणजीत डिसले यांना सवाल
डीसले गुरुजी यांना पुरस्कार मिळालेला आहे तो नक्की कशासाठी मिळालेला आहे? त्यांनी कोणतं काम केले आहे की ज्यामुळे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे मुख्य काम शालेय शिक्षणाचे आहे, ते करताना आणखी दुसरे काही उपक्रम त्यांनी केले का, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे का किंवा त्यांना शालेय शिक्षणासाठी पुरस्कार मिळालेला आहे का? पुरस्कार घेताना प्रशासन,शासन यांची परवानगी घेतली होती का, असे सवाल काटकर यांनी उपस्थित केले आहेत.
वार्की फाउंडेशनकडून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्या फाउंडेशनचे डिटेल्स त्यांनी सार्वजनिक करावे कारण त्याचा इतरांना देखील फायदा होईल, त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी त्या फाउंडेशनच्या काय-काय अटी शर्ती होत्या? त्या पुरस्काराची रक्कम परत देण्याबाबत किंवा वितरित करण्याबाबत तो इतरांना देण्याबाबत काही अटी-शर्ती होत्या का? या प्रश्नांची उत्तरे देखील देणे गरजेचे आहे, असेही काटकर यांचे म्हणणे आहे. डीसले गुरुजी यांनी 7 कोटी रुपये जिंकले आहेत. त्यापैकी त्यांना त्यातील किती रक्कम मिळाली आहे, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे, असे काटकर यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारलाही सवाल
राज्यपाल यांचे कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, शिक्षण मंत्री कार्यालयाला या पुरस्काराबाबत कोणती माहिती आहे, असे देखील त्यांनी माहिती अधिकारात विचारले होते. पण मंत्री महोदयांनी मीडियाच्या बातम्यांवर त्यांना सत्कार केला, असे उत्तर देण्यात आल्याचे काटकर यांचे म्हणणे आहे.
जर डीसले गुरुजी परितेवाडी या शाळेमध्ये गैरहजर होते, तर याबाबतचे रिपोर्ट संबंधित गट शिक्षण अधिकारी किंवा संबंधित व्यवस्थेकडे आहेत. तसेच वेळापूर या ठिकाणी देखील ते उपस्थित नाहीत. तर ते नक्की कुठे होते आणि त्या अहवालाचे किंवा रिपोर्टचे पुढे काय झाले, त्याच्यावर काय कारवाई झाली किंवा नाही याचा देखील खुलासा प्रशासनाने व सरकारने करणे गरजेचे आहे,असे काटकर यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात आम्ही रणजीत डिसले यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्या प्रतिनिधीला प्रतिसाद दिला नाही.