Ground Report : बीडचे रस्ते गेले खड्ड्यात...जबाबदार कोण?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजतो आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल चर्चा होते, बातम्या येतात पण ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल कुणीही बोलत नाहीत...असाच प्रकार समोर आला आहे बीड शहराबद्दल...राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे बीड शहर मुलभूत सुविधांच्या बाबतीत किती पिछाडीवर आहे हे दाखवणारा ग्राऊंड रिपोर्ट..;
राज्यभरात गेल्या काही महिन्यात जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे राज्यभरातील अनेक रस्त्यांची दूरवस्था झाली. यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री पद भूषवणाऱ्या धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांचा हा जिल्हा....एवढे मोठे नेते या जिल्ह्यात असूनही बीड शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे पाहून शहरातील नागरिकांना लोकप्रतिनिधी याबद्दल काही का करत नाहीत, असा सवाल पडला आहे.
बीड शहरातून जाणारे महामार्ग आहेत की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न बीड शहरातून प्रवास करताना आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. बीड शहरातील मुख्य महामार्गांवर अर्धा ते एक फुटापर्यंतचे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी तर 5 फूट लांब खड्डे पडले आहेत. यामुळे बीडकरांसह प्रवाशांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बीड शहरातून तीन मुख्य मार्ग जातात. यामध्ये बीड-सोलापूर, बीड-अहमदनगर, बीड-जालना हे मुख्य मार्ग शहरातून जातात. मात्र या मार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर जवळपास अर्धा ते एक फुटांपर्यंत खोल असे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे वाहनाचे तर नुकसान होतच आहे पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी खड्डा चुकवताना एका नर्सला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीदेखील या मार्गावरील खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही.
या रस्त्यांवरी खड्ड्यांमुळे काय त्रास होतो, याबाबत रिक्षाचालक रघुनाथ डोळस यांनी सांगितले की, "या बीड शहरांमधील मुख्य महामार्गावर एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनांचे तर नुकसान होतेच आहे. मात्र वृद्ध प्रवासी, डिलिव्हरी पेशंट असले तर मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतो. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले तर अनेक वाहनधारक त्या खड्ड्यांमध्ये पडलेले देखील आहेत. कोणाचा पाय मोडला तर कोणाचा हात मोडलेला आहे तर कुणाला मणक्याचा त्रास सुरू झाल आहे. मात्र एवढे मोठे आमदार-खासदार पालकमंत्री असताना देखील या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत. सगळे आपापल्या मार्गाने जात आहेत. याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे तात्काळ मार्ग दुरुस्त करावे" अशी मागणी रिक्षाचालक रघुनाथ डोस यांनी केली आहे.
तर आणखी एक नागरिक दिनेश ढेंगे आपला संताप व्यक्त केला आहे. "बीड शहरातील मुख्य मार्गावर एक-एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत. याच खड्ड्यामध्ये एका नर्सचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाहीत. लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरते येतात आणि नंतर नागरिकांकडे लक्ष देत नाहीत. फक्त राजकीय पोळी भाजण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. सगळ्याच मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्ड्यातच मी उपोषणाला बसणार आहे" असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर रस्त्याच्या कडेला बसणारे विक्रेते सय्यद मुस्तफा सांगतात, " नगर रोडला सर्व खड्डेच आहेत. रस्ता कमी आणि खड्डे जास्त, यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला व फ्रुटवाले यांच्या फळांवर मोठ्या प्रमाणात धुळ बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवावेत अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
छञपती शिवाजी महाराज चौक ते बालेपिरपर्यंत जवळपास दोन हजार खड्डे आहेत, त्यामुळे लोकांना कंबरेचा त्रास व्हायला लागला आहे. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यासाठी लवकर रस्ता चांगला करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
यासंदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इंजीनिअर राजेंद्र भोपळे य़ांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "गेल्या काही दिवसांपासून पाऊस होता. त्यामुळे हे खड्डे पडले आहेत, त्याचा लोकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे. पण आम्ही चार ते पाच दिवसात खड्डे बुझवुन बीड शहरवाशियांसह बीड शहरात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना दिलासा देऊ. थोड्याच दिवसात बीड शहर खड्डेमुक्त करू" असे आश्वासन त्यांनी दिले.
तर याविषयी बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना विचारणा केली तेव्हा, "बीड शहरातील रस्ते चांगले केले आहेत. मात्र शहरातून जाणारे मुख्य महामार्ग पूर्णपणे खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. एक एक फुटापर्यंत खड्डे या महामार्गावर पडलेले आहेत. याकडे मात्र स्थानिक आमदार-पालकमंत्री दुर्लक्ष करतात. या ठिकाणी ते फक्त श्रेय घेण्याचे काम करत असून राजकारण करत आहेत. त्यामुळे याची तक्रार संबंधित मंत्र्यांकडे करणार असल्याचं नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.
एकूणच आपण पाहिले तर, शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या दुरूस्तीची जबाबदारी कुणाची हा प्रश्न आहे. त्यामुळेच बीडकरांना या खड्डयांमध्ये लोटण्यास जबाबदार कोण आहे ? बीडकरांचा खड्डेमय प्रवास कधी थांबणार ? खड्ड्याने एका नर्सचा बळी घेतल्यानंतर आणखी किती बळी गेल्यावर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग येणार ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. आता पालकमंत्री धनंजय मुंडे हा प्रश्न किती लवकर सोडवतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.