रस्त्याच्या कामासाठी जगावे की मरावे? ग्रामस्थांचा टाहो
राज्यात अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जावून काहींचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली असून याला संबधित बांधकाम विभागचे अधिकारी आणि शासन जबाबदार असल्याचे नागरिकाचा आरोप आहे, सोलापूर वरुन प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट..
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून संबधित बांधकाम विभाग आणि आमदारांच्या कामावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावा-गावाना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी,ग्रामस्थ यांना खड्डेमय रस्त्यांचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामस्थ,राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी आवाज उठवून ठिकठिकाणी आंदोलने ही केली आहेत. पण प्रशासनाला लोकांच्या जीवनाचे गांभीर्य नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त केली जात आहे.
अनेक निष्पाप लोकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि शासनाला जाग येईल का ? असा प्रती सवाल करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जावून काहींचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली असून याला संबधित बांधकाम विभागचे अधिकारी आणि शासन जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
अशीच अवस्था जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनुर-येवती-रोपळे या रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्याला नागरिक वैतागले असून गेल्या 25 वर्षापासून रस्ता असाच असल्याचे सांगितले जात आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा,यासाठी या भागाच्या आमदाराना वारंवार निवेदन देवून ही या रस्त्याच्या कामाकडे आमदार लक्ष देत नसल्याने जगावे की मरावे असा प्रश्न ग्रामस्थांतून केला जात आहे. या रस्त्यावरून गरोदर महिला दवाखान्यात घेवून जात असताना खड्ड्यांमुळे मध्येच बाळंतीण होत आहेत. संबधित महिलेच्या जीवाला कमी जास्त झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना अनेक शाळकरी मुले जखमी झाली आहेत. शेतकरी शेतातील माल मार्केटला घेवून जात असताना अनेकदा चार चाकी वाहने पलटी होवून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. येणाऱ्या काळात हा रस्ता लवकर दुरुस्त नाही झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा येवती येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता
पेनुर-येवती-रोपळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहन धारकांना या रस्त्यावरून जात असताना कोणता खड्डा चुकवावा आणि कोणता नको,अशी स्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना वाहन वेगाने चालवता येत नाही. परिणामी ज्या गावात दहा मिनिटात पोहचायचे तेथे अर्धा तास लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून गाडी घेवून जात असताना वाहन धारकांना सातत्याने ब्रेक मारावा लागत आहे. नोकरदार वर्गाला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचता येत नाही. खड्डेमय रस्ता असल्याने गाडीला लागणारे पेट्रोल,डिझेल ही जास्त प्रमाणात जात असून परिणामी वाहन धारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाहन मोठ्या खड्ड्यात आदळल्याने वाहनाच्या एखाद्या पार्टचे नुकसान होवून संबधित वाहन धारकाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा माल या रस्त्यावरून चांगल्या प्रकारे मार्केटला पोहचत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार,असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
रस्त्याच्या कामाबाबत आमदारांना सांगूनही आमदार ऐकत नाहीत
येवती गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले,की या रस्त्याची स्थिती पाक बिघडलेली आहे. आमची कोणी दखल घेईना गेले आहे. आमदार,खासदार रस्ता बघून निघून जात असून मी विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष असतानाही आमदार आमच्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावत नाहीत. या रस्त्यावरून शाळेला जात असताना शाळकरी मुलांचे अपघात होवू लागले आहेत. शेतकऱ्यांना दूध,वैरण,घेवून जाणे सुद्धा अवघड झाले असून आमच्या समोर जगायचे का मरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात घेवून जात असताना त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. डीलेव्हरीला आलेली महिला या रस्त्यावरून घेवून जात असताना मध्येच बाळंतीण होत आहे. काय करायचे सांगा,वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडले असल्याने ड्रायव्हर सुद्धा खड्डा चुकवू शकत नाही.
पेनुर-येवती-रोपळे रस्ता दोन्ही महामार्गाना जोडणारा रस्ता
पेनुर-येवती-रोपळे हा रस्ता 14 किलोमीटरचा रस्ता असून पेनुर आणि रोपळे या गावावरून हायवे जातात. पेनुर येथून मोहोळ-आळंदी पालखी महामार्ग जातो तर रोपळे येथून पंढरपूर-बीड हायवे जातो. पेनुर-येवती-रोपळे हा रस्ता दोन्ही हायवेना जोडणारा रस्ता असून यावरून चांगल्या प्रकारे वाहतूक होवू शकते. येवती गाव या रस्त्यावर असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास या गावातील ग्रामस्थांना जास्त प्रमाणात सहन करावा लागत आहे. हा रस्ता खराब झाल्याने यावरून वाहने वाहण्याचे प्रमाण कमी असून पावला गनिक खड्डे आहेत. या रस्त्याची दुरावस्था गेल्या 20 ते 25 वर्षापासून अशीच असून अशाच बिकट अवस्थेत हा रस्ता पडलेला आहे. हा रस्ता महामार्गाना व्यवस्थित जोडला गेला नसल्याने दळणवळणची स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल मार्केटला नेहन्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. या रस्त्यावरून माल घेवून जात असताना शेतकऱ्यांचा माल खराब होत असून अनेकदा शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्याही पलटी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी वाहतूक बंद
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून वाहणारी एसटी वाहतूक ही बंद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात सरकारी दवाखाना असताना रस्त्यावरून येत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने तेही गावात येण्याचे टाळत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून दुधाचे नुकसान होवू लागले आहे. रस्ता खराब असल्याने व्यापारी शेतातील माल खरेदी करण्यासाठी येईना गेले आहेत. रस्त्याची दुरावस्था असल्याने सर्वच दळणवळण ठप्प असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
कामाच्या मंजुरीचा प्रस्ताव लवकरच पाठवू
मोहोळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यादव यांनी पेनुर-येवती-रोपळे या रस्त्याविषयी बोलताना सांगितले,की रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून खेण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. तसा प्रस्ताव ही मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.