वाढत्या महागाईने कुक्कुटपालन व्यवसाय डबघाईला
कोंबडी खाद्याचे वाढते दर आणि इंधन आणि वाहतूक खर्च आवाक्याबाहेर गेला असून कुक्कुटपालन व्यवसाय डबघाईला गेला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...
सोलापूर : वाढत्या महागाईचा परिणाम इतर ही व्यवसायावर झाला असल्याचे पहायला मिळत असून लॉक डाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील युवकाने सुरू केलेला कुक्कुटपालन व्यवसाय सध्या वाढत्या महागाईच्या कारणाने अडचणीत आला आहे. कोंबड्यांच्या खाद्य अन्नाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून कोंबड्यांना बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने सध्या कुक्कुटपालन व्यवसाय डबघाईला आला आहे. शासनाने या व्यवसायिकांसाठी मदत करावी, अशी अपेक्षा कुक्कुटपालन व्यवसायिकांनी केली आहे.
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असताना इतर ही खाद्य अन्नाचे भाव वाढले आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे जनतेतून रोष व्यक्त करण्यात येत असताना काही महिन्यांपूर्वी खाद्य तेल 80 ते 90 रुपये किलोने मिळत होते. पण सध्या 200 रुपये किलोच्या आसपास पोहचले आहे. डाळींच्या किंमती वाढत चालल्या असून त्याचाही परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. सध्या वाढत्या महागाईच्या खर्चाने कुटूंब प्रमुख हतबल झाले असून ग्रामीण भागात रोजगाराची चणचण भासत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली असताना याच कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री केली जात होती. नागरिकांना नाइलाजास्तव या वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या. पण लॉकडाऊन उगडल्यानंतर तर महागाईवर नियंत्रण येईल असे वाटत असताना दिवसेंदिवस महागाईचा उच्चांक वाढतच चाललेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढतच चालल्या आहेत. महागाईवर नियंत्रण येणार की नाही असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च,दवाखाना,पाहुणे,लग्न समारंभ व इतर खर्चामुळे सध्या सर्वसामान्य जनता अडचणीत आली असल्याचे दिसते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती सर्वसामान्य वर्गाची झाली असून सध्या तरी मागाईच्या मुद्यावरून जनतेत रोष पहायला मिळत आहे. गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून उज्ज्वला योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य कुटुंबाना गॅस विकत घेणे परवडेना गेले आहे.
वाढत्या महागाईने गरिबांचे जगणे मुश्किल
सुरुवातीच्या काळात गॅस स्वस्त मिळत होता. त्यावेळेस त्याची किंमत 350 ते 400 रुपये होती. उज्वला योजनेतून सुरुवातीला गॅसचे फुकट वाटप करण्यात आले. परंतु त्यानंतर सातत्याने गॅसच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. आता तर त्याची किंमत 1 हजार रुपयांच्या वर गेली आहे. 10 लोकांचे कुटूंब असणाऱ्या कुटुंबाचा गॅस 15 दिवसाला गॅस संपत असून त्यामुळे गरीब कुटूंबातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. खाद्य तेल महागले असून काही महिन्यांपूर्वी 90 ते 100 रुपये किलो दराने मिळणारे खाद्य तेल आता 200 रुपये किलोने मिळू लागले आहे. खाद्य डाळींच्या किंमती वाढल्या असून महागाई सातत्याने वाढत असल्याने गरीब लोकांच्या समोर विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून रिमझिम पाऊस असल्याने लोकांच्या हाताला कामे नाहीत. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. खाद्य तेल एका आठवड्यात संपत असून डाळी,शेंगदाणे व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्व महाग होत चालले असून आधी गॅसवर सबसिडी देण्यात येत होती, ती बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी सर्वसामान्य लोकांच्या जवळ पैसे नसल्यास सबसिडीच्या पैशातून गॅस खरेदी करत होते. पण आता वांदे झाले आहेत. गॅस आणायला पैसे नसल्याने महिलांना चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने यावर उपाययोजना कराव्यात असे नागरिकांना वाटत आहे.
वाढत्या महागाईचा कुक्कुपालन व्यवसायाला फटका
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना कुक्कटपालन व्यवसायिक अविनाश मुसांडे यांनी सांगितले,की लॉक डाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. यासाठी शेड तयार करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च आला असून त्याच्या जाळीसाठी 15 हजार रुपये खर्च आला आहे. कोंबड्यांच्या औषधांसाठी 15 हजार रुपये खर्च आला होता तर कोंबड्यांची 500 पिल्ल 16 हजार रुपयाला विकत आणली होती. या कोंबड्यांच्या पिलांसाठी सुरुवातीला खाद्य अन्नाच्या पाच पिशव्या आणल्या होत्या. सुरुवातीला खाद्यान्न कमी प्रमाणात लागत होते. पण जस- जशा कोंबड्या मोठ्या होवू लागल्या तस-तसे खाद्य अन्न जास्त प्रमाणत लागू लागले आहे. खाद्य अन्न्नाची दिवसाला एक बॅग लागत असून या बॅगांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. बॅगा आणण्यासाठी गाडी भाडे 2 हजार रुपये लागत असून त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. तर या कोंबड्यांना बाजारात 150 ते 200 रुपये भाव मिळत आहे. कोंबड्यांच्या खाद्य अन्नासाठी महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने या व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी काहीतरी मदत करावी.
महागाई वाढत असताना सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरताना दिसत नाही
वाढत्या मागाईच्या संदर्भात जोरदार चर्चा होत आहे. पण ज्या सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसत आहे, ते रस्त्यावर उतरून आंदोलन,मोर्चे करताना दिसत नाहीत. याबाबत अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. महागाईच्या मुद्यावर फक्त राजकीय पक्ष राजकारण करताना दिसत आहेत. पण महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईचा फटका अनेकांना सोसावा लागत आहे. सर्वच क्षेत्रात मागाई वाढली आहे. एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, खासगी प्रवास ही महाग झाला आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. महागाईच्या नुसत्या चर्चा केल्या जात आहेत. पण सरकार उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे मागाईच्या मुद्यावर सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.