रायगड - जिल्ह्यात सर्वत्र भाताचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र परतीच्या मुसळधार आणि वादळी पावसाने अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वारा व विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे भाताची उभी पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली. भारतीय हवामान खात्याने पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून सतर्कतेचा इशारा दिला आहे, त्यामुळे शेतकरी पुरते धास्तावले आहेत. अतिवृष्टीमुळे रायगडसह कोकणात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिके व नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झाली. याच पार्श्वभूमीवर, दिलासा देत आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात केला आहे. पण झालेल्या नुकसानीचे वस्तुस्थिती नुसार पंचनामे व प्रत्यक्षात भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसामुळे काढणीला आलेला भात व काढून ठेवलेला भात दोन्हीचे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतर एकूण नुकसानीची आकडेवारी मिळेल, अशी माहिती रायगड जिल्हा कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर यांनी दिली. परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड, रोहा, माणगाव, कर्जत, खालापूर, महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, मुरुड, पोलादपूर ,उरण, म्हसळा आदी सर्वच तालुक्यात शेतीचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने व भात अडवा पडल्याने भाताला मोड येऊन तो खराब होण्याची शक्यता आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील शेतकरी तुषार केळकर म्हणतात की शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यात वादळी व मुसळधार पाऊस कोसळल्याने अस्मानी संकट आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कापणी करावी. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विम्याचा लाभ घेता येईल, जिथे जिथे नुकसान होते तिथे 24 तासांच्या आत पंचनामे करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर यांनी दिली आहे.