प्रयत्नाने वाळूचे कणही रगडता शेणही गळे
कडेगांव तहसील कार्यालयात वाळूचे शेण झाले का ?;
प्रयत्नाने वाळूचे कणही रगडता तेलही गळे अशी एक म्हण आहे. प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही या अर्थाची हि म्हण आहे. मात्र प्रयत्न केल्यावर वाळूच्या कणाचे शेणात रुपांतर करण्याची हि किमया प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रथमदर्शनी प्रकार सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील तहसील आवारात घडला असल्याचे सरकारी कागदपत्रांमधूनच समोर आलेला आहे. या मागील तथ्यता तपासण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला.
वडिये रायबाग येथून वाळू तस्करीच्या बाबत एक वाहन गस्ती पथकाने तहसील कार्यालयात आणले होते. हे वाहन आणताना त्या ठिकाणी स्थळ पंचनामा करण्यात आलेला होता. या पंचनाम्यानुसार वाळू चोरीबाबत संशय आल्याने सदर वाहन तहसील कार्यालयात आणन्यात आले होते.
या पंचनाम्यात नेमक काय म्हटलंय हे पाहुयात.
आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ४ वाजून ५५ वाजता. मौजे वडिये रायबाग येथील वडिये रायबाग ते शेळकबाव या रस्त्यालगत वाडीचा माळ या ठिकाणी वाळुवाहतुक प्रतिबंधक गस्ती पथकाने ढंपर वाहन क्र. Mh 10 AW 6061 पकडला असून सदर वाहन हे गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे संशय आल्याने गस्ती पथकाने थांबवून त्यामध्ये गौण खनिज वाळू आहे का ? याची ढंपरवर चढून पाहणी केली असता सदर वाहनामध्ये वाळू दिसून आली नाही. परंतु गस्ती पथकास सदर वाहनाने वाळू वाहतूक करीत असल्याचा संशय आलेने सदर वाहनाच्या चालकास श्री रोहित पवार यास सदर वाहन कोणाच्या मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदर वाहन हे बबन लक्ष्मण माने राहणार शिवनी तालुका कडेगांव यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. मा. मंडल अधिकारी नेवरी (पथक प्रमुख) यांनी सदर ढंपरचे चालकास वाहन तहसील कार्यालय कडेगांव येथे घेऊन येण्यास सांगितले. व तसे त्याने कबूल करून ढंपर वाहन तहसील कार्यालयाचे आवारात आणून लावले.
या पंचनाम्यानंतर कडेगांव तहसीलदार डॉ शैलेजा पाटील यांनी सदर वाहन मालक बबन दोन लाख रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली. सदर दंड आपल्याकडून का वसूल करू नये याचा खुलासा मागितला.
या खुलाशात सदर बबन लक्ष्मण माने यांनी मी शेती करत असून माझे सदर वाहन हणमंत किसन वाघमोडे याच्या शेतात शेणखत वाहतूक करण्याकरिता गेला होता. तरी काम चालू असताना अचानक टायरचा घोटाळा झाला. तो दुरुस्त करण्यात खूप वेळ गेला . तो दुरुस्त करून घरी घेऊन येत असताना गस्ती पथकाने पकडला. तसेच माझा वाळू उत्खननाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत सदरचा दोन लाख रुपयाचा दंड माफ करून वाहन ताब्यात देनेची विनंती केली.
सदर खुलासा प्राप्त होताच तहसीलदार शैलेजा पाटील यांनी तात्काळ खालील आदेश देऊन सदर वाहन सोडून दिले. मंडल अधिकारी नेवरी यांनी केलेला पंचनामा तसेच सदर व्यक्तीने दिलेला खुलासा मधील बाबींचा विचार करता इकडील कार्यालयाच्या ताब्यात असलेले वाहन डंपर क्र. MH १० AW 6061 सोडून देण्यात येत आहे.
हा आदेश देत असताना ज्या मंडल अधिकारी यांनी सदर पंचनामा केला होता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा अहवाल तहसीलदार यांनी मागितला नाही. वाहन सोडत असताना सदर पंचनाम्यातील पंच असलेले खेराडे विटा, खेराडे वांगी येथील तलाठी, खेराडे वांगी येथील कोतवाल यांचे निरीक्षण म्हणणे मागितले नाही. दिलेल्या आदेशात कोणत्याही प्रकारचा तपास केलेला दिसून येत नाही. यावरून या प्रकरणामध्ये मोठा गोलमाल झाला असल्याची शंका उपस्थित होते.
सदर सोडण्यात आलेल्या वाहनात वाळू असल्याचा खालील मुद्द्यांमुळे बळावतो. सदर वाहन मालक बबन लक्ष्मण माने, त्याचा मुलगा गणेश बबन माने याने वाळू चोरीचा दंड न भरल्याने त्याच्या जमिनीच्या लिलावाची नोटीस जाहीर झालेली आहे. त्याच्यावर या अगोदर अवैध वाळू तस्करी बाबत दंड झालेला आहे. तो ज्याचे शेतात शेण खत भरण्यासाठी गेला असे सांगतो तो हणमंत किसन वाघमोडे हा देखील वाळू तस्करिशी संबंधित आहे.
या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी केलेला पंचनामा सकाळी ४.५५ या वेळेचा असून खुलाश्यामध्ये काम चालू असताना अचानक टायरचा घोटाळा झाल्याने दुरुस्त करण्यास खूप वेळ गेला असे तो म्हणतो. याचा अर्थ सकाळी ४ वा. ५५ मिनिटांपूर्वी रात्रीचेच त्याचे काम चालू होते. शेतकरी रात्री शेणखत भरतात का ?
या प्रकरणी केलेल्या पंचनाम्यातून देखील काही लपलेल्या गोष्टींचा खुलासा होतो. गस्ती पथकाला सदर वाहनात चढून पाहिल्यानंतर वाळू आढळली नाही. तरी देखील त्यांना या वाहणाबाबत वाळू चोरीचा संशय आला. व त्यांनी ते वाहन तहसील कार्यालयात आणले. याचा अर्थ वाळू चोरिशी संबंधित काही पक्की निरीक्षणे त्यांच्या निदर्शनास आली होती.
पंचनाम्यात गस्ती पथकाने डंपरवर चढून पाहणी केली असता वाळू दिसून आली नाही असे म्हटले आहे. मग गाडी तहसील कार्यालयात आणायला का सांगितली ? जर गाडीत शेणखत भरण्याचेच काम सुरू होते तर पंचनामा करतेवेळी गाडीला चिकटलेल्या शेणाचा, शेणाच्या येत असलेल्या दुर्गंधीचा तपास करून खात्री करून गाडी का सोडली नाही ?
सदर गस्ती पथकाला त्यावेळी वाहन चालकाने शेण खत वाहतूक करत असल्याचे सांगितल्याचे पंचनाम्यामध्ये कुठेही नमूद नाही. मग शेणखत भरत असल्याचा खुलासा तहसीलदार यांनी केवळ वाहन मालकाच्या म्हणण्यानुसार मान्य का केला ? यामध्ये सदर पंच मंडळ अधिकारी यांचे चौकशी अहवाल, म्हणणे का मागवले नाही ?
या पंचनाम्यात डंपर मध्ये वाळू आढळून आली नसल्याचे म्हटले आहे. पण या गाडीला आतून वाळू चिकटलेली होती का ? आत संडलेली वाळू होती अथवा नव्हती याचा स्पष्ट उल्लेख का केला नाही ? पंचनामा केलेल्या ठिकाणापासून ते नदीचे अंतर साधारण चारशे ते पाचशे मीटर आहे. त्या परिसरातून वाळू चोरीच्या वाटा आहेत. हे अंतर तसेच निरीक्षण पंचनाम्यात का नमूद केले गेलेले नाही ?
पंचनाम्यामध्ये जाणीवपूर्वक ढील ठेवली गेली का ?
या प्रकरणातील पंचनामा , तहसीलदार यांनी पाठवलेले नोटीस त्यांनी वाहन सोडण्याचा काढलेला आदेश या तिन्ही सरकारी कागदपत्रांचा अभ्यास केला असता यामध्ये काही लिंक दिसून येते. सदर वाहन मालक हा अगोदर देखील वाळू व्यवसायाशी संबंधित असलेला कंगोरा तहसीलदार यांनी तपासात का तपासला नाही ? मंडळ अधिकारी तसेच पंचांचे म्हणणे आदेश काढताना विचारात का घेतले नाही ? आरोपीने खुलासा केला आणि तहसीलदारांनी तो इतर कोणताही तपास न करता मान्य केला असे स्पष्ट दिसून येते. या प्रकरणामध्ये या वाहनाला सोडण्यासाठी काही डील तर झाली नाही ना ? असा संशय बळावतो. याच तहसीलदार शैलेजा पाटील यांच्यावर या अगोदरही वाळू तस्करांना मदत करत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. या प्रकरणात तर त्यांनीच तयार केलेली आदेश दिलेली कागदपत्रे यांच्यामध्ये विसंगती तसेच त्रुटी दाखवत आहेत. यामध्ये जर त्या डंपरमधील वाळूचे शेणात रुपांतर करण्याची किमया कुठल्या अधिकाऱ्याने केलेली असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे...