सोलापूर : ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डीसले यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत.ग्लोबल टीचर अवार्ड बोगस असून तो घेण्यासाठी गुरुजींनी दिलेली माहिती खोट असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुभास माने यांनी केला आहे.ग्लोबल टीचर अवार्ड या पुरस्कारासाठी दिलेली माहिती व डीसले गुरुजीनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी.ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डीसले यांनी कामावर तीन वर्षे गैरहजर राहून पगार उचलला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावेत.अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी दिली.
रजा मागितली पण कागदपत्रे दिली नाहीत
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने म्हणाले की,रणजित डीसले यांनी रजा मागितली पण कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत.उलट गुरुजींनी प्रसार माध्यमासमोर जाऊन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा व मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता.संबंधित अधिकाऱ्यांनी रजेबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी गुरुजीकडे केली होती.पण ती त्यांनी दिली नाहीत.डीसले गुरुजी यांच्यावर खर्च अन्याय झाला आहे का याची माहिती घेतली असता,तो पुरस्कारच बोगस असल्याचे निदर्शनास आले.अमेरिकेतील वार्की फाउंडेशनने पुरस्कार दिला असल्याची माहीती समोर आली असून ते त्या फाउंडेशनचे सभासद आहेत. पुरस्कार मिळवण्यासाठी गुरुजींनी माढा तालुक्यातील परितेवाडी शाळेची दिलेली माहिती खोटी आहे.असा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी केला आहे.
परितेवाडी गाव आदीवासी नाही गुरुजींनी पुरस्कार मिळवण्यासाठी दिली चुकीची माहिती
जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने म्हणाले की,परितेवाडी गाव माढा तालुक्यात असून ते गाव आदिवासी नाही तर पुरस्कार मिळवण्यासाठी गुरुजींनी चुकीची माहिती दिली आहे.परितेवाडी येथील लोक कन्नड बोलतात.शाळा गुरांच्या गोट्यात भरते.अशी खोटी फाइल बनवून अमेरिकेला पाठवली व पुरस्कार मिळवला.डीसले गुरुजी सरकारी नोकरदार आहेत.त्यांनी पुरस्कारासाठी फाइल पाठवताना शिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र शासना मार्फत अमेरिकेला पाठवायला पाहिजे होती.गुरुजींना शासन,प्रशासनाच्या परस्पर त्यांना माहिती देता येत नाही.असे माने यांनी सांगितले.
पुरस्कार मिळायच्या आधीच चित्रलेखात बातमी कशी छापून आली
सुभाष माने यांच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल पुरस्कार मिळण्याच्या आधी चित्रलेखा मासिकात जून महिन्यात बातमी कशी छापून आली होती.तर त्यानंतर डिसेंबर महिन्यात गुरुजींना लाइव्ह पुरस्कार मिळाला होता.फाउंडेशनने त्यांना 7 कोटी रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली होती.पुरस्कार मिळाल्यानंतर गुरुजी नाचायला लागले होते.पुरस्कार मिळण्याच्या 5 महिने अगोदरच गुरुजींना पुरस्कार मिळाल्याचे कसे माहीत झाले ? पुरस्कार हा देवघेव करून मिळवला आहे.हा पुरस्कार शासकीय संस्थेने अथवा अमेरिका सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या पुरस्काराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली असल्याची माहिती सुभाष माने यांनी दिली.
रजेसाठी इमोशनल ब्लकमेलिंग करणे चुकीचे
अमेरिकेला जाण्यासाठी गुरुजींनी रजेसाठी केलेले इमोशनल ब्लकमेलिंग चुकीचे आहे.त्यांनी कोणतीही कागदपत्रे अधिकाऱ्यांना दिली नाहीत.आता ते माध्यमांसमोर अनावधानाने म्हणालो होतो.असे म्हणून माफी मागत आहेत.त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेची बदनामी केली आहे.त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.गुरुजींना पगारी रजा कशाच्या आधारे दिली होती.डायटकडे त्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी 19 हजार विद्यार्थ्यांना व 4 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले असल्याचे सांगतात.पण डायटच्या मुख्याध्यापकानी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रानुसार गुरुजी 3 वर्षात डायटच्या ऑफिसमध्ये कधी ही आले नाहीत.गुरुजी तेथे गेलेच नाहीत तर प्रशिक्षिण कोणाला दिले.असा प्रश्न सभेत उपस्थित केला गेला.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी सीईओना आदेश देणे चुकीचे
शालेय शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी याना रजा मंजूर करण्याचा दिलेला आदेश चुकीचा असून त्यांनी तसा संचालकांना आदेश देणे जरुरीचे होते.रजा देताना रजा कशासाठी पाहिजे आहे.त्यासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करायला पाहिजे होती.गुरुजी कागदपत्रे प्रशासनाला देत नाहीत आणि अधिकाऱ्यांवर आरोप करतात.गुरुजींनी 3 वर्षे घेतलेला पगार त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा.त्यांची पगारी रजा नामंजूर करण्यात यावी.त्यांना रजाच द्यायची असेल तर बिनपगारी देण्यात यावी.असे मत सुभाष माने यांनी मांडले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय राज्यपालांना निमंत्रण देणे अयोग्य
राज्यपालांनी परितेवाडी येथील शाळेला भेट द्यावी.यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच गुरुजींना राज्यपालांना परस्पर निमंत्रण देता येते का ? ही लोकशाहीमधील अधिकाराची पायमल्ली आहे.त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा अहवाल मागवला असून तो 4 दिवसात देतो असे प्रशासनाने सांगितले असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी सांगितले.
गुरुजींना पुरस्कार मिळाला असेल तर आम्हाला अभिमानच
डीसले गुरुजींना पुरस्कार मिळाला असेल तर त्यांनी त्यासंबंधीची माहिती सार्वजनिक करावी.केलेल्या आरोपांचे खंडन करावे.जर आरोप खोटे असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो.केलेले आरोप आम्ही माघारी घेतो.गुरुजींनी शासकीय यंत्रणा आणि शासनाला गोलमाल केले आहे.त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी सुभाष माने यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. यांसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रानं आदर्श शिक्षक रणजित दिसले यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी या विषयावर मी आता माध्यमांशी बोलणार नसल्याची प्रतिक्रीया दिली.