बीडमधील मागासवर्गीयांच्या वस्तीवरील हल्ल्याचे वास्तव काय?

बीड जिल्ह्यातील हिवरा गावात मागासवर्गीय वस्तीवर हल्ला करुन मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचे नेमके कारण काय हे शोधून काढणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2020-12-23 11:45 GMT

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावात दलित वस्तीवर शेतीच्या वादातून हल्ला करुन मारहाण कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना 11 डिसेंबर रोजी घडली होती. गोदावरी पात्रातील गाळपेऱ्याची जमीन काढण्यावरून झालेल्या वादातून मागासवर्गीय वस्तीतील अवघडे कुटुंबातील स्त्री-पुरुषांवर गावातील काहींनी लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाडींनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या रिपोर्टमधून करणार आहे.

जिल्हापासून 80 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या कडेला असलेलं हिवरा हे गाव. याच गावात अंदाजे 10-15 कुटुंब राहत असलेली दलित वस्ती आहे. यातीलच एक अवघडे कुटुंब असून ते मोलमजुरी आणि पावसाळा संपल्यावर शेती करतात. नदीचे पाणी कमी झाल्यास हे कुटुंब गाळपेरा जमिनीवर शेती करतात. गेली 10-15 वर्षांपासून हरभरा,गहू, खरबूज, टरबूज सारखी पीक लावून आपला उदरनिर्वाह हे कुटुंब करत आहे.

गावातील इतर समाजातील गावकऱ्यांनीही त्यांना कधीच विरोध केला नव्हता. जुनी लोकं एकमेकांना समजून घेऊन गावातील गाडा हाकण्याचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून गावातील काही तरुणांनी या कुटुंबाला गाळपेरा जमिनीवर करत असलेल्या शेतीला विरोध दर्शवणे सुरू केले होते. याचाच भाग म्हणून नेहमी शिवीगाळ करणे, शेतात जनावरे सोडणे असे प्रकार सुरूच राहायचे. मात्र उगाच वाद नको आणि आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने प्रत्येकवेळी ह्या सर्व गोष्टींकडे हे कुटूंब दुर्लक्ष करत असे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतात जनावरे येत असल्याने ह्या कुटुंबाने पिकांना काट्याचे कुंपण लावण्याचे ठरवलं होतं. त्याप्रमाणे 11 डिसेंबरला त्यांनी तसा प्रयत्न केला असता गावातील तौर नावाच्या कुटुंबातील काही लोकांनी विरोध केला. यावरून दोन्ही कुटुंबात सकाळी वादही झाला, मात्र तो मिटवण्यात आला. परंतु नंतर काही वेळाने काही तरुणांनी अवघडे कुटुंबातील लोकांवर हल्ला केला.

लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडीने अवघडे कुटुंबातील लोकांना मारहाण करण्यात आली. घरातील लहान मुलं आणि महिलांनासुद्धा जबर मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील विष्णु अवघडे यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना केला. तर ह्या हल्ल्यात दोन महिला, एक लहान मुलगा आणि चार पुरुष जखमी झाले. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने अवघडे कुटुंब आणि वस्तीवरील इतर दलित बांधव दहशतीखाली आहेत. मारहाणीच्या वेळी महिला आणि मुलं जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत असल्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.

घोळक्याने केला हल्ला...

अवघडे कुटुंबाने आपल्या पिकाला जनावरांपासून वाचवण्यासाठी कुंपण लावण्याचा प्रयत्न केला असता,त्यांच्यावर गावातील काही लोकांनी हल्ला केला. विशेष म्हणजे हा हल्ला 35-40 जणांनी घोळका करून केला. अचानक एवढे लोकं लाठ्या-काठ्या घेऊन घरात घुसून मारहाण करत असताना अवघडे कुटुंब मदतीसाठी आरडाओरडा करत होते. मात्र त्यांना वेळेवर कोणतेही मदत मिळाली नाही.

अवैध वाळू ठरलं कारण...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवघडे कुटुंबाला मारहाण करणाऱ्यांपैकी काही लोक वाळू माफिया आहेत. नदीत वाळू काढण्यासाठी आणि वाहतुकीसाठी अवघडे कुटुंब शेती करत असलेल्या गाळपेरा जमिनीत रस्ता आहे. त्यामुळे ही जमीन आपल्या ताब्यात मिळावी म्हणून यातील काही जण गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. म्हणूनच अवघडे यांच्या पिकात जनावरे सोडणे, शिव्या देणे आणि इतर त्रास देऊन जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र या कुटुंबाने थेट कुंपणच करण्याचा प्रयत्न केल्याने आपली वाळू वाहतूक बंद होऊ शकते म्हणून वाळू व्यवसायातील काहींनी वाद घालून भांडण उभे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

अवघडे कुटुंबावर झालेल्या हल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातीला साधा गुन्हा दखल करण्यात आला,मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनंतर आणि परिस्थितीची दखल घेत पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटकही केली असून, काही मात्र अजूनही फरार आहेत.

पीडित कुटुंबावर केला खोटा गुन्हा दाखल

अवघडे या कुटुंबातील लोकांना मारहाण तर झालीच मात्र त्यांच्यावर खोटा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या तौर कुटुंबातील लोकांनी अवघडे कुटुंबातील काही लोकांवर 30 हजार रुपये चोरी आणि गळ्यातील लॉकेट चोरी केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला।असल्याचं विष्णू अवघडे यांनी म्हंटलं आहे.

कडक कारवाई व्हावी- सचिन खरात

महाराष्ट्र हे शिवाजी महाराज, संभाजी राजे फुले-शाहू,आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात काही जातीवादी लोक चुकीच्या घटना घडवत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातील काही अशाच काही जातिवाद यांनी दलित कुटुंबावर शेतीच्या वादातून हल्ला केला आहे. या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

संघटीत हल्ला करणं हे कोणत्या कायद्यात बसतं?

कारण काही असेल पण कायदा हातात घेऊन एका दलित कुटुंबावर अशाप्रकारे हल्ला करणं चुकीचं आहे. कुणाच्या वस्तीत घुसुत घरातुन ओढत बाहेर काढत तसेच बाहेर गावच्या लोकांना बोलावत असा संघटीत हल्ला करणं हे कोणत्या कायद्यात बसतं का?असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी उपस्थित केला आहे.


शेतीच्या वादातून मागासवर्गीय वस्तीवर हल्ला, चौघे गंभीर जखमी


Tags:    

Similar News