जिजाऊंच्या माहेरात मावळ्यांनी उभारलाय शैक्षणिक सक्षमीकरणाचा गड!
लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटून सोशल भिंतीच्या कामातून उभारलेली शैक्षणिक चळवळी मांडलीय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी निखिल शाह यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....
लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटून सोशल भिंतीच्या कामातून उभारलेली शैक्षणिक चळवळी मांडलीय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी निखिल शाह यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....एकीकडॆ कोविड19 मुळे जग थांबलं असतांना सर्वसामान्य माणूस हा पोटाची खळगी कशी भरल्या जाईल याच विवंचनेत होता. लॉकडाऊनच्या काळात काय करावं हे सुद्धा कुणालाच काही कळत न्हवत, मात्र दुसरीकडे याच लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करत लोकवर्गणीतून बोलक्या भिंतीचे काम यागावातील तरुणांनी हाती घेतलं आणि बघता बघता शिक्षणासाठी उभारलेली ही लोकचळवळ उदयास आली. तर चला मग पाहुयात शिक्षणाचा झरा घरा-घरात पोहचवणार्या या आदर्श गावाची कहाणी.
महाराष्ट्रातील राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं हे छोटसं गाव. आता या छोट्याश्या गावातील ही शाळा बघून तुम्हाला सुध्दा प्रश्न पडला असेल खरंच का ही जिल्हापरिषदची शाळा? पण ही दिसणारी दृश्य वास्तव दर्शवणारी आहेत. याच जिल्हापरिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांन सोबत याचं छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोहचलेल्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा तेवढाच मोठा सिंहाचा वाटा आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून राज्यातील शिक्षणाचा कार्यभाळ सांभाळणारे सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यसमोर शिक्षण क्षेत्रातील हा शैक्षणिक सक्षमीकरणाचा गड राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरात या स्थानिक मावळ्यांनी रचलाय.
प्रायव्हेट शाळांमध्ये आकर्षक इमारत, विविध रंगाने रंगलेल्या भिंती आणि अत्याधुनिक सुख सुविधा दिसून येतात. मात्र ग्रामीण भागात छोट्याशा खेड्यात कोण अशी शाळा उभारणार? आणि उभारली जरी, तरी सुद्धा एवढी फी सामान्य शेतकरी व मजुरांची मुलं भरू शकतील का? त्यामुळे आजही ग्रामीण भागात पडझड झालेल्या, जीर्ण इमारत असलेल्या, जिल्हापरिषदच्या शाळा दिसून येतात. पण आता ताडशिवणी गाव याला अपवाद ठरलंय. गावातील जिल्हापरिषदच्या शाळेचा कायापालट करून त्याचबरोबर गावातील विविध घरे,शौचालय, व इतर भिंतीवर देखील शिक्षणाशी संबंधित आकर्षक पेंटिंग व स्लोगन सुविचार विविध चित्र काढून नव्या पिढी समोर शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.
जिल्हापरिषदची शाळा म्हंटली म्हणजे निधी कोण देणार? कधी मंजूर होणार? यासर्व गोष्टी मध्ये न पडता गावकऱ्यांनी 50,100,500 रुपये आप आपल्या परीने जमा करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षणाचं हे नंदनवन उभं केलंय. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्तेक गावांनी जर हा आदर्श घेतला तर नक्कीच ताडशिवणी पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी मजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांन मध्ये गावा गावात शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचं काम होईल. ओसाड आणि मृत पडलेल्या जिल्हापरिषदच्या शाळा मधून पुन्हा एकदा नवीन राष्ट्र निर्माण करणारे, मंत्रालयातील सिद्धार्थ खरात यांच्या सारखे वरिष्ठ अधिकाऱ्यांन सारखी उच्चशिक्षित अशी युवा साक्षर पिढी या बोलक्या भिंती बघून उदयास येत राहतील.