रायगडात अतिवृष्टी व ढगफुटीने भातशेती व पिके उध्वस्त

Update: 2022-09-11 11:57 GMT

रायगड़ जिल्ह्यात अतिवृष्टी , ढगफुटी व महापुराने पेण, सुधागड, अलीबाग महाड , पोलादपुर , माणगाव व अन्य तालुक्यात भात शेतीची जमिन पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेलेली आहे. त्यामुळे भातशेती सह नाचणी, वरी , पालेभाजी या पिकांचे मोठे नुकसान झालेय. इथली शेती पाण्याखाली बुडाली आहे. काही ठिकाणची पिके झोपली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर झालाय, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट..

काही ठिकाणी पाषाणयुक्त जमिन झालेली आहे . तर काही ठिकाणी प्रवाहाच्या पाण्याने धुपुन गेलेली माती शेतीत दगड गोटयासह जाऊन उंचवटे तयार झालेले आहेत . शेतकऱ्यांची पिक जमिनीखाली गाडली गेलेली आहेत . हे मातीचे ढीगारे मनुष्य बळाने निघणारे नसुन मोठी अवजारे लावून काढावे लागणार आहेत . जमिनी पुर्णपदावर आणण्यासाठी तज्ञांच्या सल्याने योजना तयार करुन नुकसान झालेली सर्व शेती पुर्वत पिकाखाली आणावी . तसेच आजघडीला भातशेती व अन्य पीक शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जलद नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलीय.



 



एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याची ही ओळख आता पुसते की काय अशी चिंता सतावू लागलीय. पेण तहसील कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात 2671.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गडब, रोडे, कांदळे या गावांना लागुन असलेल्या डोंगरावर ढगफुटी झाल्याने विजांच्या कडकडाने पावसाला सुरुवात झाली. आणि अशरक्षः ज्या भागात ढगफुटी झाली त्या गावांना पावसाने झोडपुन काढले. भातशेती पूर्णपणे जमिनीत गाडली गेली, पिके उध्वस्त झाली. कित्येक घरांमध्ये पाणी शिरले. घरातील जीवनावश्यक वस्तु भिजल्या. पेण शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी जाऊन लाखोंचे नुकसान झाले. पेण तालुक्यातील भाल येथील देवीदास म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून सर्व इलेक्ट्रानिक वस्तू निकामी झाल्या. देवीदास म्हात्रे व त्यांच्या पत्नीचे नशीब बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या.





 


नैसर्गिक व आस्मानी संकटाने शेतकरी शेतीपासून दूर चालला आहे, अतिवृष्टी, महापूर, ओला , कोरडा दुष्काळ, ढगफुटीने पिकांचे मोठे नुकसान होतेय. भातशेती करणारा शेतकरी भातशेती का सोडत आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती संघटीत करावी . समितीमध्ये प्रगतशिल , अभ्यासु शेतकऱ्यांचा तज्ञांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या शेतीचा , शेतकऱ्यांचा राहणीमानाचा , व त्याला कशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याचा अभ्यास होऊन समितीच्या शिफारशीनुसार भातपिक शेतकऱ्यांना सोई सुविधा व भात पिकाचा योग्य मोबदला देण्यात यावा . अशी मागणी रायगड़ जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे यांनी केलिय.

कृषीव्यवस्था भक्कम करण्यासाठी शेतकरी वर्गाला सरकारी योजना व निधीचा थेट लाभ मिळण्याची आवश्यकता आहे. जिल्हयातील शेतीकरीता दुबार पिकाच्या अपूर्ण असणाऱ्या सर्व सिंचन योजना पुर्ण करण्यात याव्यात . काळव्यांची रखडलेली कामे पुर्ण करुन शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावेत . मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतावर जाण्या येण्यासाठी गाडी ट्रॅक्टर जाईल असे रस्ते निर्माण करावेत . अशी मागणी शेतकरी वर्गातून होतेय.




 


रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे गडब, डोलवी, कांदळे, कांदळेपाडा, रोडा, निधवळी, गागोदे, करोटी, कासु, पाबळखोरे, खारेपाट, या भागांमध्ये शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे असे पेण रायगडच्या तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

रायगडात खरीपासाठी १ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण 1 लाख 14 हजार 443 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली असून भात पेरणी 1 लाख 5 हजार 261 हेक्टर इतक्या क्षेत्रावर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्या खालोखाल 7128 हेक्टरवर नाचणी, 975 हेक्टर इतर तृणधान्य, 906 हेक्टर तूर, 173 हेक्टर इतर कडधान्य लागवड करण्यात आलीय.




 


रायगड जिल्ह्यातील कृषि विषयक सर्वसाधारण माहिती

रायगड जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 6 लाख 86 हजार 892 हेक्टर इतके आहे.

निव्वळ पेरणीखालील क्षेत्र 2 लाख 1 हजार 322 हेक्टर इतके आहे.

खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 41 हजार 200 हेक्टर

रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 21 हजार 100 हेक्टर इतके आहे.

Tags:    

Similar News