GroundReport : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र लॉकडाऊनमध्येच !
राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा कोरोनाने उघड केल्या आहेत. पण ग्रामीण भागात अनलॉकनंतरही प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे स्वयंघोषित लॉकडाऊन सुरू आहे. पाहा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र फक्त कागदोपत्री सुरू असून, प्रत्यक्षात मात्र कुलूपबंद असल्याची गंभीर बाब मॅक्स महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळं कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या आरोग्य खात्याला जाग आणण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या टीमने मोहीम हाती घेतली असून, फुकटचा पगार घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा पर्दाफाश करण्याचे काम मॅक्स महाराष्ट्र करत आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यासाठी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील येथे गेलो असता धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेली ही इमारत रुग्णांच्या नव्हे तर वैदयकीय अधिकाऱ्याची वाट पाहतेय...आरोग्य केंद्राचा मुख्य गेट अर्धा उघडा होता तर अर्धा बंद... पुढे आत गेल्यावर मुख्य दरवाज्याला भलं मोठं कुलूप लावलेलं.
बाजूला काही खिडक्या उघड्या असल्याने त्यातून आत पाहिले तर डॉक्टर तर नव्हे मात्र त्यांच्या टेबलवर एक मांजर आराम करताना दिसून आली...एवढ्या मोठ्या रुग्णालयात डॉक्टर किंवा परिचारीका सोडा साधा शिपाईही आढळला नाही. ग्रामीण भागातील गरीब आणि सामन्य लोकांना चोवीस तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन उपकेंद्र बांधण्यात आलीत, गरोदर महिला आणि गरीब बालकांना तात्काळ सेवा मिळावा या उद्देशानं या उपकेंद्रात परिचारीकेनं चोवीस तास राहणं बंधनकारक असतानाही एकही परिचारीका (नर्स) इथं दिवसा आढळून आल्या नाही त्यामुळे रात्रीच्या आरोग्यसेवेच तर न विचारलेलच बरं...त्यामुळं शासानाचा यांच्यावर होणारा खर्च व्यर्थ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
मुलानी वडगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आमच्या पाहणीत ओपीडीच्या वेळात बंद असल्याच्या आढळून आल्यानंतर,आम्ही संबंधीत अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समुदाय अधिकारी गणेश शिंदे यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आपली बाजू मांडून,स्वतःचा बचाव जरी करीत असतील,पण प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेला 'लॉकडाऊन' लागले आहे की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे...