अंड्याच्या उत्पादनातून युवक कमावतोय महिन्याकाठी चार लाख रुपये

Update: 2022-07-21 15:18 GMT

सोलापूर  : चांगल्या पगाराची नोकरी सोडत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील शेतकरी कुटुंबातील प्रसाद सातपुते या तरुणाने पोल्ट्री व्यवसायात भरारी घेतली असून बोव्हन्स कोंबडीच्या ब्रिड पासून ते अंडी उत्पादित करत आहे. त्यांच्या पोल्ट्रीमध्ये अंडी देणाऱ्या 10 हजार कोंबड्या असून दररोज जवळपास 10 हजाराच्या आसपास अंडी निघत आहेत. ही अंडी 400 रुपये शेकडा विकली जात आहेत. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकल मार्केटचा उपयोग केला जात आहे. या पोल्ट्रीची उभारणी आधुनिक पद्धतीने केली असून उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळ्यात कोंबड्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने तसे त्याचे नियोजन ही केले आहे. कोंबड्यांच्या विष्टे पासून ही त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. सर्व खर्च जावून प्रसाद सातपुते यांना महिन्याकाठी ४ लाख रुपयांच्या आसपास फायदा होत आहे. त्यांच्या या उद्योगाची सर्वत्र चर्चा होत असून शेतकरी वर्ग,उद्योजक त्यांच्या पोल्ट्री फॉर्मला भेट देवू लागले आहेत.

चांगल्या पगाराची नोकरी सोडत प्रसादने उभारला पोल्ट्रीचा व्यवसाय



 


प्रसाद सातपुते यांनी फिजिक्स या शाखेतून एमएससी आणि अॅग्री मधून बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचे धडे मिळाले. ऍग्री मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर मालेगाव येथील पतंजली फिडच्या प्लांट मध्ये सहा महिने त्याने काम केले. त्या ठिकाणी प्रीमियम कंपनीचा पोल्ट्रीचा फार्म होता. या ठिकाणी प्रसाद ला 22 हजार रुपये पगार होता. त्याच ठिकाणी प्रसादला पोल्ट्रीच्या व्यवसाया संबधी माहिती मिळाली. तेथूनच प्रसाद पोल्ट्रीच्या व्यवसायाकडे वळला. त्याने मालेगाव येथील चांगल्या पगाराची नोकरी सोडत पोल्ट्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याचे ठरवून त्या संबंधी सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली. करकंब ता. पंढरपूर येथे प्रसाद च्या मित्राचा पोल्ट्रीचा फार्म होता. या मित्राकडे प्रसादने मदत मागितली आणि मित्राने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यासाठी त्याने कर्ज उभारणीसाठी मदत केली. शेतीवर मोर्गेज करून सुमारे दीड कोट रुपयांचे कर्ज मंजूर केले. प्रसादने आणि त्याच्या मित्राने पोल्ट्री संबधित कंपनीशी संपर्क करून त्यांच्या प्लॅन प्रमाणे कोंबड्यांच्या शेडची उभारणी केली. या शेडची उभारणी उंचावर केली असून कोंबड्यांची विष्टा जमिवर पडते. कोंबड्यांना बसण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. एका जाळीमध्ये कमीत कमी ५ कोंबड्या बसतात,पण प्रसादने एका जाळी मध्ये तीनच कोंबड्या ठेवल्या आहेत. याचे कारण सांगताना प्रसाद म्हणतो,की जर पाच कोंबड्या एका जाळीत ठेवल्या तर त्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही. तीन कोंबड्या एका जाळीत ठेवल्या तर त्यांना अन्न,पाणी चांगल्या प्रकारे मिळते. त्यामुळे त्यांचा अंडी देण्याचा कालावधी वाढतो. कोंबड्यांच्या शेडची उभारणी करत असताना कोंबड्यांना पाणी पिता यावे यासाठी त्यांना पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कोंबड्यांना लहानशा नळाची सोय करण्यात आली आहे.

वर्षातील 365 दिवसांपैकी 340 दिवस कोंबड्या देतात अंडी



 


कटिंगचा पक्षी आणि अंडी देणारा पक्षी यातील फरक सांगताना प्रसाद म्हणतो,की कटिंगचा पक्षी प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी वापरला जातो. अंड्याच्या पक्षाचा मुख्य हेतू हा असतो,की अंड्याच उत्पादन घेणे. कटिंगचा पक्षी हा 42 दिवसात शेडमधून विक्रीसाठी बाहेर पडतो. अंड्याचा जो पक्षी आहे त्यामध्ये प्रामुख्याने चार ते पाच प्रकारची ब्रीड आहेत. त्यामध्ये वेंकिज,स्कायलार,हायमन,लोहमन, बोव्हन्स या कंपनीच्या ब्रीडचा समावेश होतो. आपल्या भागामध्ये ब्रीव्हीं 300 आणि बोव्हन्स या ब्रीडचा वापर केला जातो. आपण बोव्हन्स ब्रीड निवडण्यामागे हे कारण आहे,की हा पक्षी इतर पक्षांपेक्षा जास्त अंडी देतो. आपल्या भागात याच पक्षाच्या अंड्याचे उत्पादन जास्त आहे. शिवाय हा पक्षी कोणत्याही वातावरणात चागल्या प्रकारे सुट होतो. हा पक्षी मिरजवरून 182 रुपयाला आणला असून आणताना 12 आठवड्याच्या म्हणजे तीन महिन्याचा होता. हा पक्षी शेडवरती आणल्यानंतर 18 ते 20 आठवड्यापासून अंडी देण्यास सुरुवात करतो. साधारण पाचव्या महिन्यापासून अंड्याचे उत्पादन सुरू होते. हा पक्षी 26 ते 28 तासात एक अंडे देतो आणि 365 दिवसांपैकी 340 अंडी देतात.

शेडमध्ये दहा हजार तीनशे पक्षांचे केले पालन



 


बोव्हन्स या कोंबडीला मिर्याकल ब्रीड म्हटले जाते. याचे कारण म्हणजे हा पक्षी इतर ब्रीड पेक्षा जास्त अंडी देतो. प्रसादच्या शेड मध्ये 10 हजार 300 पक्षी आहेत. यामध्ये ट्रान्सपोर्टचा वेगळा खर्च असतो. कोंबड्या शेडवर आणल्या जात असताना 100 ते 150 कोंबड्यांची मर होते. सद्या प्रसादच्या शेडमध्ये 10 हजार 100 पक्षी आहेत. या मधून 97 ते 98 टक्के अंड्याचे उत्पादन होत आहे. दररोज कोंबड्या पासून 9 हजार 700 अंडी मिळतात. ही अंडी लोकल मार्केटला विकली जातात. यामध्ये मोहोळ,माढा,टेंभुर्णी,पंढरपूर,कुर्डुवाडी,सोलापूर येथील व्यापाऱ्यांना समावेश होतो. या अंड्याचे भाव वेगवेगळ्या ऋतूनुसार ठरतात. उन्हाळ्यामध्ये याचे दर कमी होतात. तर इतर सिझन मध्ये दर वाढतात. सद्या अंडी शेकडा 400 ते 600 रुपये च्या दरम्यान विकली जात आहेत.

वेळच्या वेळी केले जाते लसीकरण

या कोंबड्या 100 आठवड्या पेक्षा जास्त काळ अंडी देतात. मॅनेजमेंट चांगले असेल तर याच कोंबड्या 110 ते 120 आठवडे अंडी देतात. याच्या प्रामुख्याने तीन लसी असतात. त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. कन्सल्टिंग आणि डॉक्टर त्याच्या वेळा ठरवतात. त्या वेळा फॉलो करणे गरजेचे आहे. या पक्षाचा अंडी देण्याचा कालावधी संपतो,असे म्हणता येत नाही. हा पक्षी अंडी देतच राहतो. या पक्षाच्या उत्पादनातून चांगले पैसे राहतात. ज्या वेळेस याची अंडी देण्याची क्षमता कमी होते. त्यावेळेस हा पक्षी शेडमधून बाहेर काढावा लागतो. त्यावेळेस हा पक्षी कटिंग साठी 100 ते 150 रुपये किलोने विकला जातो.



 


कोंबड्यांच्या विष्टेपासून वर्षाला मिळतात पंधरा ते वीस लाख रुपये

कोंबड्यांच्या विष्टेचा वापर शेतकरी शेतात खत म्हणून करतात. प्रसाडच्या पोल्ट्री मधून वर्षाला अडीचशे ते तीनशे टन खत निघतो. हा खत पाच रुपये ते साडे पाच रुपये किलोने विकला जातो. वर्षाकाठी या खतांच्या विक्रीतून प्रसादला पंधरा ते वीस लाख रुपये मिळतात.


वाढत्या महागाईचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम

अंड्यांचा भाव हा बाजारात स्थिर नसतो. याच्या खाद्याचे भाव वाढत चालले आहेत. सुरुवातीला मका सोळा रुपये किलो होती तीच मका आता अठ्ठावीस रुपये किलो झाली आहे. मार्केट मध्ये रॉ मटेरियलवर अंड्यांची किंमत ठरते. वाढत्या महागाईचा परिणाम या व्यवसायावर झाला असल्यानेच अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच कामगारांच्या हजेरीत ही वाढ झाली असल्याने त्याच्या परिणाम या व्यवसायावर झाला असल्याचे प्रसादने सांगितले.

Full View

Tags:    

Similar News