नेत्यांची राजकीय उणीधुनी; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

शासन वर्षाला करोडो रुपये खर्च करीत असते,पण त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला कितपत मिळतो,याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. राज्यातील नेते एकमेकांची उणीधूनी काढत असताना जनेतेच्या रस्ते,पाणी गटार, लाईट या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे असून असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात घडला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट;

Update: 2022-09-19 11:17 GMT

 राज्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक महिन्यांपासून गरमागरम असून एकमेकांवर टीका करण्याचे संधी एकही राजकीय नेता सोडताना दिसत नाही. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे मेळावे घेतले जात आहेत. राज्यातील सर्वच पक्षांचे नेते सुसाट झाले असून सातत्याने त्यांचे दौरे सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जावून भाजपा आणि बंडखोर शिवसेना नेते यांच्या मदतीने स्थाप न झालेले सरकार किती दिवस टिकेल,याबाबत जनतेत मात्र संभ्रम आहे.

कोणत्याच जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत. त्या-त्या विभागाच्या सचिवांवर सध्या राज्यकारभार सुरू आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची कधी स्थापना होईल याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मंत्रिमंडळाची स्थापना झाली नसल्याने संबधित विभागाचे अधिकारी सुसाट झाले आहेत. एकीकडे राजकीय नेत्यांकडून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना आता अधिकारीही दुर्लक्ष करू लागले आहेत,अशी भावना जनसामान्य नागरिकांची झाली आहे. त्यामुळे न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न जनतेला पडला आहे. वर्षानुवर्षे रस्ते,पाणी,गटार, लाईट याची मागणी करूनही त्या सुविधा जनतेला व्यवस्थितरीत्या मिळत नाहीत.


 



यावर शासन वर्षाला करोडो रुपये खर्च करीत असते,पण त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला कितपत मिळतो,याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. राज्यातील नेते एकमेकांची उणीधूनी काढत असताना जनेतेच्या रस्ते,पाणी गटार, लाईट या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे असून असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात घडला आहे. येथील कुंभार गल्लीत पाणी आणि गटारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या वर्षभरापासून या गल्लीतील लोकांना पाणी मिळत नसल्याचे येथील महिला सांगतात. पाण्यासाठी तासनतास बसून राहावे लागत आहे. या गल्लीतील गटारी उघड्या असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोहोळ नगर परिषदेकडे याबाबत सातत्याने तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने या गल्लीतील महिलांनी थेट मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना ऑफिस मध्ये जावून जाब विचारला. त्यामुळे काही काळापुरती प्रशासनाला जाग आली असून येणाऱ्या काळात प्रशासन येथील नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवते,याकडे मोहोळ शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

कुंभार गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मोहोळ शहरातील कुंभार गल्ली ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दाट लोकसंख्या आहे. येतील गटारी या उघड्या असून त्यात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून मोहोळ नगर परिषदेचे सफाई कर्मचारी गटारी साफ करण्यासाठी येत नाहीत. गटारी साफ केल्या नसल्याने पावसाच्या पाण्याने गटारी ताबडतोब भरल्या जात असून त्यामुळे या गटारातील घाण आणि घाण पाणी रस्त्यावर येते. येथील उघड्या गटारात डुकरे फिरत असून त्यामुळे दुर्गंधीत आणखीनच भर पडली आहे. या गटारीच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले या गटारीच्या आसपास सातत्याने खेळत असल्याने तेही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण सापडले होते. याबाबत मोहोळ नगर परिषदेला वारंवार सांगून देखील दखल घेतली जात नसल्याने महीलातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.





 


पाण्यासाठी बसावे लागते तासनतास ताटकळत

या गल्लीत पाण्याचा वाणवा असून एक ते दोनच सार्वजनिक नळ आहेत. त्या नळाना अगदी कमी प्रमाणात पाणी येत असून या पाण्यासाठी महिलांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. गल्लीत पाण्यासाठी सातत्याने भाडणे ही होत आहेत. सध्या दसरा आणि दिवाळी सारखे सण तोंडावर असून या सणासाठी कपडे धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे नगर परिषदेने पाण्याचे नियोजन लवकरात-लवकर करण्याची मागणी येथील महिलांची आहे. येथील वृध्द महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांना वेळेवर पाणी भेटत नाही. त्यांचाही याठिकाणी संताप अनावर झाला होता. गल्लीतील नळाना व्यवस्थित पाणी येत नसल्याने मोठ-मोठे खड्डे करून येथील नागरिकांनी जमिनीतून गेलेल्या पाईप लाईन मधून पाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या खड्ड्यात ही व्यवस्थित पाणी येत नाही. त्यामुळेच येथील महिलांनी अखेर वैतागून थेट मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांच्या कार्यालयावर धडक दिली.




 


बंदिस्त गटारी करण्याची महिलांची मागणी

या गल्लीत उघड्या गटारी असल्याने लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यामुळे येथील महिलांनी बंदिस्त गटारी करण्याची मागणी केली आहे. या उघड्या गटारीत डुकरे,कुत्री फिरत असून त्यामुळे गटारीची जास्त दुर्गंधी येते. गटार ही वाहती नसल्याने येथे घाण साचून काळीकुट्ट झाली असून पाण्याचा रंग ही अधिक गडद झाला आहे. वृध्द महिला आणि पुरुष यांना ही या गटारीच्या पाण्याचा त्रास होत असून त्यांना घराच्या बाहेर सुद्धा निघणे अवघड झाले आहे. वर्षानुवर्षे गटारी उघड्या असल्याने या गटारीच्या घाण पाण्यात काही वेळेस लहान मुले खेळत आहेत तर काहीजण या गटारीत तोल जावून पडले देखील आहेत. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त गटार बनवण्यात यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आदर्श चौक व कुंभार गल्ली परिसरातील महिलांनी नगर परिषदेवर काढला घागर मोर्चा

मोहोळ येथील आदर्शचौक व कुंभार गल्ली येथील महिलांनी पाण्यासाठी नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढला. पन्नास हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारा अष्टे,कोळेगाव बंधारा भरून वाहत असताना शहराला मात्र भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ऐन दिवाळी,दसरा या सणासुदीच्या काळात महिलांना मोर्चे काढावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गल्लीतील लोकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असून कुठल्याही प्रकारचे फिल्टर पाणी सध्या नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. पाणीपुरवठा करणारे पाणी हे केवळ वापरासाठीच असून पिण्यासाठी त्याचा उपयोग करता येत नाही. वापरायचे पाणी सुद्धा न मिळाल्याने संतापून महिलांनी थेट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर घागर मोर्चा काढत ठिय्या मांडला. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी हे विकतच घ्यावे लागत असून पिण्याच्या पाण्याचा दररोजचा खर्च 500 रुपयांच्या आसपास असून नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. यावर नगर परिषदेने उपाय काढावा,असे त्यांना वाटत आहे.




 



कुंभार गल्लीत तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची सोय करण्यात आली असून त्याठिकाणी वाल बसण्यात आला आहे. गटारीच्या प्रश्नाबाबत बोलायचे झाल्यास मोहोळ शहरातील सर्वच गटारी उघड्या आहेत. त्या दररोज साफ करण्याचे काम कर्मचारी करत आहेत. मोहोळ शहरातील गटारी जमिनीच्या खालून बनवण्यासाठी सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च येईल. असे मुख्याधिकारी योगेश डोके यांचे म्हणणे आहे.

डीपी प्लॅन नुसार मोहोळ शहराची नगर रचना होणार

दोन दिवसांपूर्वी डीपी प्लॅन संदर्भात मीटिंग झाली असून यानुसार पुढील 50 वर्षांचा आराखडा तयार करून मोहोळ शहराची नगररचना करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील भाजी मार्केट,मटण मार्केट,तहसील कार्यालय,नगर परिषदेची इमारत,रस्ते,गटारी, लाईट आदींचे पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करण्याचे काम करण्यात येणार असून येत्या 15 दिवसात डिपी चा प्लॅन देणार आहे. त्यानुसार त्यावर नागरिकांच्या हरकती मागविण्यात येणार असून त्या हरकती योग्य असतील तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. असे मुख्याधिकारी योगेश डोके यांनी बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News